
Pune News: मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाने जोरदार दणका दिला आहे. तसेच राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. खानदेश, कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत वर्ध्यातील देवळी मंडलात सर्वाधिक १७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांत वेगाने आवक सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील धरणांतील पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
कोकणात जोर वाढू लागला
कोकणातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत. प्रामुख्याने ठाणे, रायगड जिल्ह्यांत चार मंडलांत अतिवृष्टी झाली असून या भागातील ओढे, नाले पुन्हा भरून वाहू लागले आहे. मागील दोन दिवस या भागात पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यामुळे शेतीकामांना वेग येऊ लागला होता. अनेक ठिकाणी भात रोपवाटिकेची व भात लागवडीच्या कामांना सुरुवात झाली होती. परंतु पुन्हा जोर धरू लागल्याने शेती कामांमध्ये अडथळे येत असल्याने भात लागवडी खोळंबू लागल्या आहेत.
मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक भागाच्या पश्चिम भागात म्हणजेच धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. त्यामुळे धरणांतील आवक कमीजास्त होत आहे. पुणे जिल्ह्यातील वडिवळे, मुळशी, टेमघर अशा काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. शिरगाव घाटमाथ्यावर सर्वाधिक १६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. परंतु गुरुवारी रात्रीपासून पुन्हा जोर वाढला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. आंबोणे या घाटमाथ्यावर १५४ मिलिमीटर पाऊस पडला.
दावडी घाटमाथ्यावर १२७ मिलिमीटर, लोणावळा १०१, डोंगरवाडी ९९, ताम्हिणी ७५ मिलिमीटर पावसाची पाऊस पडला. तर मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ७३ मिलिमीटर पाऊस पडला असून टेमघर ४८, वडिवळे, पवना ४४, गुंजवणी ३५, कासारसाई ३०, नीरा देवघर, वडिवळे २६ तर इतर धरणक्षेत्रात हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग कमीजास्त करण्यात येत आहे. खानदेशातील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने पिकांना चांगलाच आधार मिळाला आहे.
मराठवाडा, वऱ्हाडात जोरदार
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. तर बुलडाणा जिल्ह्यात २० मंडलांत अतिवृष्टी असून जिल्ह्यातील मेहकर, सुलतानपूर, डोणगाव, अंजनी मंडलांत सर्वाधिक १८३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी अधूनमधून पावसाची उघडीप आहे. त्यामुळे शेतीकांमाना वेग आला असून अनेक ठिकाणी खुरपणी, आंतरमशागतीचे कामे सुरू झाली आहेत. ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे. तेथे पिकांना दिलासा मिळाला आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी
विदर्भातील दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने विदर्भात अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यांतील काही मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये अकोल्यातील सात मंडलांत अतिवृष्टी झाली. वाशीम मधील वीस मंडलांत अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम सरी कोसळल्या. अमरावतीतील चार मंडल, यवतमाळमधील दोन, वर्ध्यातील अकरा, नागपूर चार मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले असून तुरळक ठिकाणी पाणी पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यात अतिवृष्टी झालेली मंडल (स्रोत - कृषी विभाग)
कोकण : देहरी ८६, जांभुळपाडा ८८, कोलाड, सोनसाडे ७०.
मध्य महाराष्ट्र : लोणावळा, कुसगाव, बोदवड ८७, आंबेगाव ८६, तामसवाडी, मालदाभाडी ६६.
मराठवाडा : पिशोर, चिंचोली, करंजखेड ८८, जळगाव, जामोद, पी, आसलगाव ७२, देऊळगाव शहर, कल्याण ६६, जानेफळ, वरंवड, शेळगाव १२९, हिवरा, देऊळगाव ६५, लोणी १४७, डोनगाव, अंजनी, सुलतानपूर, मेहकर १८३, नायगाव १३४, मलकापूर १०७, शेंदुर्जन ९१, अंजनी १६३.
विदर्भ : पारस ११६, आलेगाव ८०, चन्नी, वाथोडा, चांदस, वाढोना १०३, कौलखेड, धानोरा ७२, महन, मुंगळा ८२, पिंजर, करंजी १०५, खेर्डा १०६, वाशीम, कोंढळा, चिखलदरा, सेमडोह ७०, नागथाना १०५, वाकड ८५, केनवड १२९, मालेगाव ७८, शिरपूर १२५, किन्हीराजा ६८, जवळका, मंगळूरपीर, पार्डी ७१, पोटी ६८, कौठळ, इंझोरी, कुपटा, शिरखेड, चांदूर, गोवर्धन ८६, मांगकिन्ही, गिरोली ७६, वायफड १०७, सिल्लोड १२२, वायगाव ६६, देवळी १७१, कानडगाव, वडनेर, सिरसगाव, सेलू, वाधोना ६७, काटोल, येनवा ६५, कोंढळी, मासोड ६९.
पाऊस दृष्टिक्षेपात...
- कोकणातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस.
- घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला.
- मध्य महाराष्ट्रात पुण्यातील तीन मंडलांत अतिवृष्टी.
- खानदेशातील जळगाव जिल्ह्यात तीन मंडलांत अतिवृष्टी.
- मराठवाड्यात २३ मंडलांत अतिवृष्टी.
- विदर्भात अनेक मंडलांत अतिवृष्टी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.