
Latest Weather Forecast : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. ३१) जाहीर केला.
ऑगस्ट महिन्यात मात्र देशात सरासरीपेक्षा कमी (९४ टक्यांपेक्षा कमी) पावसाचा अंदाज वर्तविला आहे. उर्वरित हंगामात सरासरी पावसाचा अंदाज असला तरी तो कमी पावसाकडे झुकणारा आहे.
हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील दोन महिन्यात देशात ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे.
हिमालयाच्या पायथ्याकडील भाग, पूर्व मध्य भारत, पूर्व भारत आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण द्वीपकल्प, वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिमेकडील भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
एल-निनो होतोय तीव्र
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या कमजोर एल-निनो स्थिती असून, उर्वरित मॉन्सून हंगामात आणखी तीव्र होणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत एल-निनो स्थिती कायम राहणार आहे. भारतीय समुद्रात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सर्वसाधारण स्थितीत आहे. उर्वरित मॉन्सून हंगामात आयओडी धन (पॉझिटिव्ह) होण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनमध्ये खंड, ऑगस्टमध्ये कमी पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात मॉन्सून मध्ये खंड पडणार असून, मध्य आणि दक्षिण भारतातील राज्यात मॉन्सून कमजोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
१९७१ ते २०२० कालावधीत ऑगस्ट महिन्याची पावसाची दीर्घकालीन सरासरी २५४.९ मिलिमीटर आहे. ऑगस्टमध्ये हिमालयाचा पायथा, पूर्व मध्य भारत, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, वायव्य भारताच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रासाठी ऑगस्ट कमी पावसाचा
मॉन्सूनच्या उर्वरित कालावधीतील पावसाचा विचार करता, विदर्भ वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर ऑगस्ट महिन्यातही राज्यात बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. यात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.