Pune Weather News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता. १९) उर्वरित महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला. दक्षिण भारतात पुढील दोन ते तीन दिवसांत ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. देशामध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल ४ महिने ११ दिवस मुक्काम संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे.
यंदाच्या हंगामात मॉन्सूनचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात ११ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. २३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत (२५ जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच म्हणजेच २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात पोचला होता.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वायव्य भारतात यंदा २ महिने २३ दिवस मुक्काम करत मॉन्सूनने २५ सप्टेंबर रोजी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला. मजल दरमजल प्रवास करत ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून निरोप घेतला. त्यानंतर मॉन्सूनची परतीची वाटचाल काहीशी अडखळली. गुरूवारी (ता. १९) मॉन्सून संपूर्ण देशातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
यंदा मॉन्सून हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) देशात ८२० मिलीमीटर (९४.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात ९६५.७ मिलीमीटर (९७ टक्के) पाऊस पडला आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. १ ऑक्टोबरपासून गुरूवारपर्यंत (ता.१९) राज्यात १८.९ मिलीमीटर (उणे ६८ टक्के) पाऊस झाला आहे.
मॉन्सूनची परतीच्या प्रवासाची वाटचाल
वर्ष---तारीख
२०१९---१६ ऑक्टोबर
२०२०---२८ ऑक्टोबर
२०२१---२५ ऑक्टोबर
२०२२---२३ ऑक्टोबर
२०२३---१९ ऑक्टोबर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.