Weather Forecast : महाराष्ट्रावर या आठवड्यात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. आज आणि उद्या (ता.२६,२७) महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. तसेच राजस्थान व काश्मीर भागावर ९९२ ते ९९८ इतके कमी हवेचे दाब राहतील. त्यामुळे वारे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात ताशी २५ ते ३० किमी वेगाने वाहतील.
कमाल व किमान तापमानात घसरण होईल. विदर्भात मात्र कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते नैऋत्येकडून वाहण्यास सुरुवात होईल. सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ होण्यास सुरुवात होईल.
मॉन्सूनची प्रगती श्रीलंकेपर्यंत होऊन पुढील वाटचालीसाठी हवामान घटक मुख्यतः हवेचे दाब अनुकूल बनतील. मॉन्सूनची प्रगती अरबी समुद्राकडील नैऋत्य दिशेने व बंगालचे उपसागराचे शाखेकडून म्हणजेच दोन्ही बाजूने होण्यास सुरुवात होईल. यावर्षी मॉन्सून आगमनासाठी या दोन्ही दिशेने व दोन्ही शाखांकडून प्रगतीची वाटचाल सुरू राहील.
प्रशांत महासागराच्या इक्वेडोरजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २६ अंश सेल्सिअस, तर पेरूजवळ १८ अंश सेल्सिअस इतके आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी असल्याने एल-निनोचा प्रभाव संपुष्टात येऊन ला-निनोचा प्रभाव सुरू झाल्याचे दिसून येत आहे. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३२ अंश सेल्सिअस तर बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. यावर्षी मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण सुरुवातीपासून अधिक राहण्याची शक्यता आहे.
कोकण :
आज आणि उद्या (ता.२६,२७) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत प्रतिदिन १ ते २ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैऋत्येकडून, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग पालघर जिल्ह्यात १९ किमी, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी १२ ते १५ मिमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६५ टक्के इतकी राहील.
उत्तर महाराष्ट्र :
उद्या (ता.२७) नाशिक जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे. या आठवड्याचे उत्तरार्धात सर्वच जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. नाशिक व धुळे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ३१ ते ३७ किमी राहील. कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत ३९ ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७५ टक्के, तर दुपारची २६ ते ३२ टक्के राहील.
मराठवाडा :
मराठवाड्यात या आठवड्याच्या उत्तरार्धात अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल. वाऱ्याची दिशा सुरुवातीला वायव्येकडून राहील. मात्र त्यात नंतर बदल होऊन ती नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होऊन ताशी ताशी २५ ते ३४ किमी वेगाने वारे वाहतील. कमाल तापमान हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. किमान तापमान धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड व जालना जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यांत आकाश पूर्णपणे ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, जालना, बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५० ते ६० टक्के, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ३४ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १४ ते २० टक्के राहील.
पश्चिम विदर्भ :
या आठवड्याचे उत्तरार्धात पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वाऱ्याचा ताशी वेग ३४ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४४ ते ४८ टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ ते ३७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १७ टक्के राहील.
मध्य विदर्भ :
आठवड्याचे उत्तरार्धात पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा वायव्य व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात ९ कि.मी. तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ताशी १८ ते २३ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते ११ टक्के राहील.
पूर्व विदर्भ :
आज (ता.२६) गडचिरोली जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे. तसेच आठवड्याचे उत्तरार्धात सर्वच जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४४ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ३२ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १० टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८९ टक्के, सातारा जिल्ह्यात ८० टक्के, सांगली व पुणे जिल्ह्यांत ७४ ते ७८ टक्के तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५३ ते ६५ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३४ ते ४० टक्के, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत २२ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३० ते ३५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला :
- भात रोपे तयार करण्यासाठी पूर्वतयारीस सुरुवात करावी. गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत शेणखत मिसळावे.
- उन्हाळी भुईमूग, तीळ, सूर्यफूल, मूग या पिकांची पक्वता होताच काढणी करावी.
- हळद, आले, सुरण यांच्या बागायत क्षेत्रात लागवडीचे काम करावे.
- जनावरांना रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
- कुक्कुटपालन शेडमध्ये योग्य वातावरण निर्मिती राखण्यावर अधिक भर द्यावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.