
डॉ. रामचंद्र साबळे
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर रविवारी १००२ ते १००४ हेप्टापास्कल, तर सोमवार ते बुधवारपर्यंत १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. त्याचवेळी बंगालचे उपसागराच्या उत्तरेकडील भाग आणि त्यालगतच्या राज्यावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तिथे रविवारी १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहून चक्राकार वाऱ्यांची तीव्रता अधिक राहील. हा दाब तसाच पुढे सोमवारपर्यंत राहील.
यामुळे रविवार आणि सोमवारी पावसाचा जोर महाराष्ट्राच्या पूर्व भागात अधिक, तर मध्य भागात मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून महाराष्ट्रावरील आणि बंगालच्या उपसागरावरील हवेच्या दाबात वाढ होताच पावसाचे प्रमाण आणि तीव्रता कमी होईल. प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस असून, हिंदी महासागराचे ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे एल निनोचा प्रभाव यापुढेही सुरूच राहील.
रविवारी व सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मात्र पावसाचा जोर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अधिक राहणे शक्य आहे. याच कालावधीत पूर्व मध्य विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कोकणात मध्यम स्वरूपात, तर उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भात अधिक राहण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर जिल्हावार अंदाज पुढील प्रमाणे...
कोकण
रविवारी रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ९ ते १२ मि.मी., तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात १२ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात २१ ते २६ मि.मी. व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात ५ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ९१ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
पावसाची शक्यता रविवारी नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात २ ते ५.८ मि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ३४ मि.मी. आहे. सोमवारी धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात २४ ते ३० मि.मी., तर नाशिक जिल्ह्यात ३८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील, तर धुळे व जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २६ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८७ टक्के राहील.
मराठवाडा
पावसाची शक्यता रविवारी लातूर व धाराशिव जिल्ह्यात ६ ते ९ मि.मी., नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ ते २८ मि.मी., बीड व जालना जिल्ह्यात ४० मि.मी., तर परभणी व हिंगोली जिल्ह्यात ७० ते ८८ मि.मी. आहे. सोमवारी जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५० मि.मी., तर धाराशिव नांदेड व बीड जिल्ह्यात ६८ ते ७६ मि.मी., आणि लातूर, हिंगोली व परभणी जिल्ह्यात ११० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा धाराशिव व लातूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर उर्वरित जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २८ ते ३२ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के तर दुपारची ८५ ते ८९ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
रविवारी बुलडाणा जिल्ह्यात ४२ मि.मी. अमरावती जिल्ह्यात ७७ मि.मी. अकोला जिल्ह्यात ८२ मि.मी. व वाशीम जिल्ह्यात १११ मि.मी. पावसाची शक्यता असून, सोमवारी पावसाचा जोर कमी होईल. बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात २४ ते ३६ मि.मी. आणि अमरावती जिल्ह्यात १३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेय व वायव्येकडून राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ९६ ते ९८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८७ टक्के राहील.
मध्य विदर्भ
रविवारी नागपूर जिल्ह्यात १८ मि.मी., वर्धा जिल्ह्यात ३२ मि.मी व यवतमाळ जिल्ह्यात ८१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी वर्धा व नागपूर जिल्ह्यात २५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९६ ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८७ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
पावसाची शक्यता रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात १३ मि.मी., गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ८ ते ९ मि.मी. इतकी आहे. सोमवारी या सर्वच जिल्ह्यात ५ ते ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ कि.मी. राहील. कि.मी. राहील. कमाल तापमान गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान या सर्व जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८७ टक्के राहील.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र
पावसाची शक्यता रविवारी कोल्हापूर, सांगली सातारा व सोलापूर जिल्ह्यात ३ ते ४ मि.मी., पुणे जिल्ह्यात ८ मि.मी. व नगर जिल्ह्यात १५ मि.मी. इतकी आहे. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात ५ मि.मी., सांगली, पुणे व सातारा जिल्ह्यात १८ ते २० मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ३६ मि.मी. आणि नगर जिल्ह्यात ४४ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
वाऱ्याची दिशा या सर्व जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ कि.मी. राहील. सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. पुणे, नगर व कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के राहील.
कृषी सल्ला ः
- शेतात ६५ मि.मी. ओलावा होताच करडई व रब्बी ज्वारीची पेरणी करावी.
- जनावरांसाठी हिरवा चारा मिळावा म्हणून बागायत क्षेत्रात आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करणे फायदेशीर राहील.
- सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीचा वेळीच बंदोबस्त करावा.
- घेवडा पिकाची काढणी करावी. झोडणी करून दाणे उफणून व्यवस्थित साठवण करावी.
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य दक्षिण आशिया फोरम ऑन ॲग्रिकल्चर मेटिरॉलॉजी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.