Maharashtra Rain Update : राज्यात सर्वत्र हलक्या पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्याचा परिणाम या आठवड्यात पावसाचे प्रमाणावर होऊन आठवडाभर अल्प प्रमाणात पावसाची शक्यता राहील.
 Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on


डॉ. रामचंद्र साबळे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्याचा परिणाम या आठवड्यात पावसाचे प्रमाणावर होऊन आठवडाभर अल्प प्रमाणात पावसाची शक्यता राहील. वाऱ्याच्या दिशेतही बदल जाणवेल. पश्‍चिमी चक्रवाताचा प्रभाव जाणवेल. त्यामुळे वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. अरबीसमुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३०.६ अंश सेल्सिअस राहील तर बंगालचे उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३०.५ अंश सेल्सिअस राहील. हिंदी महासागराचे व प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढेल. त्यानुसार ‘एल निनो’चा प्रभाव अद्याप तरी सुरू झालेला नाही. मात्र हवामान बदलामुळे उत्तर भारतातील काही भागांत अतिवृष्टी तर दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत दुष्काळी परिस्थिती हाच हवामान बदलाचा परिणाम असून याही आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणे शक्य आहे. याचा परिणाम म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नगर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत जून ते ऑगस्ट या काळात २० ते २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. सातारा, सांगली, हिंगोली जिल्ह्यांत ३० ते ३७ टक्के कमी पाऊस झाला असून, जालना जिल्ह्यात ४८ टक्के कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम खरीप पिकांच्या वाढीवर झाला आहे. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे वाहत आहेत. मात्र त्यामुळे ईशान्य भारतात पाऊस होत आहे. कोकणात विस्तृत स्वरूपात, तसेच पूर्व व मध्य विदर्भातही मध्यम स्वरूपात आणि दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात अल्प ते हलक्या स्वरूपात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

१) कोकण ः
पालघर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी ७ ते ८ मि.मी. पावसाची शक्यता आहे, तर ठाणे जिल्ह्यात रविवारी व सोमवारी २० ते २१ मि.मी., सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी १९ मि.मी. व सोमवारी ९ मि.मी., रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २० मि.मी. रविवारी व २६ ते २८ मि.मी. सोमवारी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील, तर ठाणे जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८० टक्के राहील.

 Rain Update
Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता

२) उत्तर महाराष्ट्र ः
नाशिक जिल्ह्यात रविवारी व सोमवारी २.५ मि.मी. पावसाची शक्यता आहे, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत रविवारी ०.४ ते ०.८ मि.मी व सोमवारी पावसात उघडीप राहील. जळगाव जिल्ह्यात रविवारी ०.८ मि.मी. व सोमवारी ०.२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस आणि धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८७ टक्के व दुपारची ७३ ते ७८ टक्के राहील.

३) मराठवाडा ः
परभणी जिल्ह्यात रविवारी ११ मि.मी. व सोमवारी ४ मि.मी. लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत रविवारी ५ ते ६ मि.मी. व सोमवारी ३.१ ते २ मि.मी., धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत रविवारी २.५ मि.मी. व सोमवारी ०.५ मि.मी., जालना व हिंगोली जिल्ह्यांत रविवारी २ ते ४ मि.मी. व सोमवारी २ मि.मी., तर नांदेड जिल्ह्यात रविवारी ६ मि.मी. व सोमवारी २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग वाढेल, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस आणि धाराशिव जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के, तर दुपारची ६८ ते ८८ टक्के राहील.

 Rain Update
Weather Update : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

४) पश्‍चिम विदर्भ ः
अमरावती जिल्ह्यात रविवारी ७.४ मि.मी. बुलडाणा जिल्ह्यात ५.५ मि.मी., अकोला व वाशीम जिल्ह्यांत २.८ मि.मी. पावसाची शक्यता आहे, तर सोमवारी सर्वच जिल्ह्यांत २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची ८१ ते ८७ टक्के राहील.

५) मध्य विदर्भ ः
यवतमाळ जिल्ह्यात रविवारी १५ मि.मी. व सोमवारी ७.१ मि.मी. पावसाची शक्यता आहे, तर वर्धा जिल्ह्यात रविवारी व सोमवारी १६ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस वर्धा जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस आणि नागपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.

६) पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत रविवारी २० मि.मी. पावसाची शक्यता असून, सोमवारी ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत रविवारी २५ मि.मी. आणि सोमवारी २२ ते २८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ टक्के राहील.

७) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः
सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत रविवारी व सोमवारी १.५ ते १.७ मि.मी. पावसाची शक्यता आहे, तर नगर व सांगली जिल्ह्यांत ३.५ मि.मी. आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५.५ मि.मी. रविवार, सोमवारी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सांगली, कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील, तर सातारा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७८ टक्के सर्वच जिल्ह्यांत राहील.

कृषी सल्ला
१) हिरव्या चाऱ्यासाठी अफ्रिकन टॉल या मका जातीची पेरणी करावी.
२) सर्वच पिकांत आंतरमशागतीसाठी कोळपणी व खुरपणी करावी.
३) रांगडा कांदा लागवडीसाठी रोप तयार करावे.
४) फळभाज्यांच्या रोपवाटिका तयार करून लागवडीसाठी रोपे तयार करावीत.
५) भात खाचरात ५ सेंमी उंचीपर्यंत पाणी साठवण करावी.
६) सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com