IMD Rainfall Prediction 2023 : आयएमडीच्या अंदाजानुसार यंदा देशात सर्वसाधारण मॉन्सून; पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार...

यंदा देशात मॉन्सून सर्वसाधारण (नॉर्मल) राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD- आयएमडी) मंगळवारी (ता. ११) जाहीर केला.
IMD Rainfall Prediction 2023
IMD Rainfall Prediction 2023Agrowon
Published on
Updated on

Monsoon Update : यंदा देशात मॉन्सून (Monsoon) सर्वसाधारण (नॉर्मल) राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD- आयएमडी) मंगळवारी (ता. ११) जाहीर केला. यंदा सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे आयएडीने म्हटले आहे.

आयएमडीचा अंदाज ढोबळमानाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात असला तरी महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujrat) आणि मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढवणारा आहे. कारण आयएमडीच्या अंदाजानुसार पश्चिम-मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.

सोयाबीन-कापूस उत्पादक पट्ट्यात कमी पाऊस?

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील व खानदेशचा काही भाग पश्चिम-मध्य भारतात येतो. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागाचा या पट्ट्यात समावेश होतो. एकंदर देशातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक पट्ट्यात यंदा पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

IMD Rainfall Prediction 2023
Monsoon Rain : पावसाच्या अंदाजासाठी ‘एल निनो‘ घटक महत्त्वाचा...

अर्थात आयएमडी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचा अद्ययावत अंदाज जाहीर करणार आहे. त्यामध्ये पावसाबद्दलचे चित्र आणखी स्पष्ट होईल. तोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची धाकधुक कायम राहणार आहे.

सरासरीच्या ९६ टक्के पाऊस

यंदा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या(Long Period Average-LPA) तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे आयएमडीने म्हटले आहे. यात ५ टक्के कमी किंवा अधिक तफावत गृहित धरली आहे. मॉन्सूनचा कालावधी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा असतो.

१९७१ ते २०२० या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे संपूर्ण देशासाठीची दीर्घ कालावधीची पावसाची सरासरी (LPA) ८७ सेमी आहे. आयएमडीच्या निकषांनुसार सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण (नॉर्मल) मानला जातो.

एल-निनोची धास्ती नको

यंदाच्या मॉन्सूनमध्ये एल-निनोची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. एल-निनोचा परिणाम जुलैनंतर दिसून येईल, असे आयएमडीने म्हटले आहे.

परंतु एल-निनोच्या बाबतीत आयएमडीने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. एल-निनो आला म्हणजे पाऊस कमीच पडणार, असे समजणे चुकीचे आहे.

१९५१ ते २०२२ या कालावधीतील एल-निनो वर्षांपैकी ४० टक्के वर्षांमध्ये सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, असे आयएमडीने म्हटले आहे.

दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पाऊस होण्याचा अंदाज सोमवारी (ता. १०) वर्तवला होता.

दीर्घकालिन सरासरीच्या ९४ टक्के पाऊस होईल, तसेच महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील, असे स्कायमेटने म्हटले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com