Monsoon Rain : पावसाच्या अंदाजासाठी ‘एल निनो‘ घटक महत्त्वाचा...

प्रत्येक ३ ते ६ वर्षांनी डोकावणारा आणि भारतीय मॉन्सूनला दणका देणारा हा एल निनो २०१८ मध्ये भारतात हजेरी लावून त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस देऊन गेला होता.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon

माणिकराव खुळे

अमेरिकेतील हवामान खात्याने (US Meteorological Department) या वर्षी काही महिन्यांच्या अंतराने दोनदा एन्सो (एल निनो साऊथ ओसिलेशन्स) म्हणजेच एल-निनोचे पॅसिफिक समुद्रात पूर्व व मध्य विषुववृत्त दरम्यान ‘एल निनो’चे अस्तित्व आणि सक्रियता असण्याची शक्यता अधिक (६० टक्के) आहे, असे वर्तविले आहे.

प्रत्येक ३ ते ६ वर्षांनी डोकावणारा आणि भारतीय मॉन्सूनला (Moonson) दणका देणारा हा एल निनो २०१८ मध्ये भारतात हजेरी लावून त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) देऊन गेला होता. भारतात याचा परिणाम २००४, २००९, २०१४ व २०१८ दिसून आला होता.

या अगोदर ट्रीपल ‘ला निना’मुळे २०२० पासून आपण कमकुवत का होईना, पण सक्रियता अनुभवली आहे. म्हणून लागोपाठ तीन वर्षे चांगला मॉन्सून झाला. आता कुठे ‘ला निना’ तटस्थेकडे जात आहे.

येत्या काही दिवसांची निरीक्षणे ‘एल निनो‘कडे घेऊन जाण्यासाठी झपाट्याने बदल होत असतानाची दिसतील.

‘एल निनो‘च्या सकारात्मकतेमुळे जर कदाचित या वर्षी २०२३ मधील जूनपासून भारतीय उपखंडात सुरू होणाऱ्या मोसमी पावसावर उशिरात म्हणजे चार महिन्यांच्या हंगामाच्या उत्तर्धात म्हणजे साधारण ऑगस्ट २०२३ नंतर तो नकारात्मक परिणाम घडवून आणण्याची शक्यता नकळत वर्तवली जात आहे.

या महिन्याच्या अखेरीस भारतीय हवामान खात्याकडून अंदाज दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र जागतिक अंदाजानुसार ‘एल निनो‘ची शक्यता ५० टक्के असू शकतो.

Monsoon Rain
‘मान्सून’ला परवाना देण्याचे धागेदोरे मंत्रालयात

१) जून ते सप्टेंबर महिन्यातील देशातील पावसाचा पूर्ण आणि अंतिम अंदाज व्यक्त करण्याच्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी हवामान तज्ज्ञ जागतिक पातळीवरील विविध ठिकाणच्या तसेच विविध प्रकारच्या हवामान घटकांची निरीक्षणे नोंदवितात.

भारतीय हवामान विभागातील तज्ज्ञ प्रत्येक वर्षी मागील वर्षांच्या ऑक्टोबरपासून ते त्यापुढील वर्षातील एप्रिल महिन्यापर्यंतच्या कालावधीत जागतिक पातळीवर विविध हवामान घटकांचे निरीक्षण करून माहिती संकलित करतात.

त्याआधारे त्या वर्षी येणाऱ्या पावसाळ्याचा पहिला अंदाज एप्रिलच्या मध्यावर, तर दुसरा ४५ दिवसांनंतर म्हणजे मेअखेर आणि तिसरा अंदाज ६० दिवसांनंतर म्हणजे जुलै अखेरचा अंदाज सुधारितपणे सांगितला जातो. १ ऑक्टोबरला अंदाजांचे पूर्वालोकन केले जाते.

दुसऱ्या व तिसऱ्या शेवटच्या केवळ ४५ व ६० दिवसांच्या लघू अवधीतील निरीक्षणे महत्त्वाची आहेत. म्हणून १५ एप्रिलनंतर ३१ मेपर्यंत ४५ दिवसांचा आणि ३१ मेनंतर ३१ जुलैपर्यंत ६० दिवसांचा कालावधी ठरविलेला आहे.

२) हवामानाचा पहिला अंदाज व्यक्त करण्यास ६० दिवसांची निरीक्षणे बाकी आहेत. त्यानंतरची ४५ + ६० अशी १०५ दिवसांची निरीक्षणे बाकी आहेत. १५ एप्रिल, ३१ मे २०२३ मधील सुधारित अंदाजातील बदल हे जागतिक वातावरणातील निरीक्षणावर अवलंबून असतात.

काही महत्त्वाची निरीक्षणे ः

२०२३ मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करावयाचा आहे, असे समजून एक उदाहरण समजून घेऊयात.

१) नॉर्वे, फिनलॅंडपासून ते फ्रान्स, स्पेनपर्यंतच्या युरोप खंडातील देशातील जानेवारी २०२३ महिन्यातील जमिनीवरील विसंगत तापमानाची नोंद.

२) विषुववृत्तावरील पॅसिफिक समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाण्याची वाढलेल्या पातळीची फेब्रुवारी, मार्च २०२३ या दोन महिन्यांतील घडलेल्या विसंगतीची नोंद.

३) डिसेंबर २०२२, जानेवारी २०२३ महिन्यात डेन्मार्क देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीजवळील वायव्य अटलांटिक महासागर, तसेच कॅनडा देशाच्या वायव्य पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्र पाण्याच्या तापमानात वेगाने घडून येणाऱ्या बदलाची नोंद.

४) फेब्रुवारी २०२३ महिन्यातील इंडोनेशियाच्या पश्‍चिम किनारपट्टीकडील विषुववृत्तीय आग्नेय भारतीय महासागरीय पृष्ठभागीय समुद्र पाण्याच्या तापमानाची नोंद.

५) इंडोनेशिया, सिंगापूरपासून ते व्हिएतनाम, म्यानमारपर्यंतच्या पूर्व आशियायी देशांच्या फेब्रुवारी, मार्च २०२३ मधील जमिनीवरील हवेच्या दाबाची नोंद.

६) मार्च, एप्रिल, मे २०२३ तसेच डिसेंबर २०२२, जानेवारी, फेब्रुवारी
२०२३ ते मार्च, एप्रिल, मे २०२३ पर्यंतचे निनो ३.४ च्या समुद्राच्या पृष्ठभागीय पाण्याच्या तापमानाच्या दोन्ही नोंदीचे परिणाम.

७) अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी समोरील उत्तर अटलांटिकवरील मे २०२३ महिन्यातील समुद्रसपाटीचा हवेचा दाबाच्या नोंदी.

८) रशिया, चीन, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीपासून ते उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीपर्यंतच्या उत्तर मध्य पॅसिफिक भागावरील समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवरील मे २०२३ मधील वाऱ्याची स्थितीच्या नोंदी.

काही दिवसांच्या मध्यंतरानंतर भारतीय मॉन्सूनवर परिणाम करणारे घटक तसेच जागतिक पातळीवरील घटकांचे निरीक्षणांच्या मदतीने झालेले हवामानातील बदल नोंद करण्यास या थोड्या अवधीतील निरीक्षणांच्या नोंदी अंतर्भूत करण्यास वाव मिळतो.

त्यानंतर अंदाज सुधारित होऊन अचूकतेकडे नेला जातो. ‘एन्सो’संबंधीचे विशेष बदल उन्हाळ्यातच अधिक जाणवतात, त्यामुळे एप्रिल- मेमधील निरीक्षणे अधिक महत्त्वाची असतात.

Monsoon Rain
‘मान्सून फर्टिलायझर्स’ला मुख्य गुणवत्ता नियंत्रकांचीच शिफारस

‘एल निनो’चा परिणाम ः

१) एल निनो हा फॅक्टर भारत देशाबरोबर इतर आशियायी देशावरील पावसाळी हंगामावर परिणाम करत असतो.

परंतु भारताच्या पावसाळी हंगामावर एल निनोबरोबरच सर्वांत महत्त्वाचा ‘नोआ’ने अचर्चित ठेवलेला ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ (इंडियन ओशन डायपोल), की जी त्या वेळच्या अरबी आणि बंगाल उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकावर ‘धन’ किंवा ‘ऋण’, किंवा ‘तटस्थ’ अवस्थेत आहे.

त्यावरून भारताच्या पावसाळी हंगामावर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करणार आहे, हे ठरवले जाते.

२) भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता स्थितीला केवळ भारताचा ‘एल निनो’ समजतात. त्याची म्हणजे ‘आयओडी’ची धन अवस्था कधी तरी पावसाळी हंगामावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या मूळ ‘एल निनो’च्या प्रभावाला मारक ठरते.

त्या वर्षी ‘एल निनो’ असूनही देशात चांगला पाऊस पडतो. तो मुद्दाही येथे गौण ठेवलेला जाणवतो. त्याचा ऊहापोह झालेला दिसत नाही. म्हणून ‘एल-निनो’चा देशाच्या पावसावर विपरीत परिणाम होईल, हा काढलेला निष्कर्ष आज तरी निराधार आहे, असे वाटते.

३) ‘एल निनो’च्या अस्तित्वामुळे भले पावसाचे प्रमाण काहीसे कमी असेल तरी देशात दुष्काळच पडेल किंवा सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडेलच असेही नाही. त्यामुळे आपण या बातमीने विचलित होण्याची गरज नाही. त्यामुळे येणारा उन्हाळा कडक असू शकतो असा अंदाज आहे.

४) आजमितीला निरीक्षणाचा कालावधी अजून पूर्ण व्हावयाचा आहे. त्यासाठी अजून दोन महिने बाकी आहेत. अंतिम निष्कर्ष गोपनीय आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्या घाबरून जाण्याचे काही कारण नाही.

माणिकराव खुळे, ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५ (लेखक भारतीय हवामान विभागातील निवृत्त हवामान तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com