Pune News : जूनमध्ये सरासरी गाठल्यानंतर जुलै महिन्यात सर्वदूर मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात ७४०.८ मिलिमीटर म्हणजेच ३९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाने धुमशान घातले, तर विदर्भात जोरदार सरींनी हजेरी लावली. उर्वरित राज्यात पावसाचे वितरण असमान असले तरी राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
यंदा केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही मॉन्सूनचे आगमन लवकर झाले. मॉन्सूनच्या पावसासाठी सर्व प्रणाली पोषक असतानाही यंदा पावसाने नवे रंग दाखवले. कोकण, घाटमाथ्यावर धुवाधार बरसणाऱ्या मॉन्सूनने घाट उतरण्यास विलंब केल्याने शंकेची पाल चुकचुकली. सह्याद्रीच्या उतारावरील मध्य महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रासह पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाने वाट पाहायला लावली. तर दुसरीकडे लेट खरीप आणि रब्बीचे जिल्हे असलेल्या भागात पावसाला थांब म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली. अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसाने सर्व परिस्थिती बदलून टाकली.
तत्पूर्वी जून महिन्यात राज्यात २११.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १ टक्का अधिक पाऊस पडला होता. केवळ जुलैचा विचार करता राज्यातील महिन्याची पावसाची सरासरी ३२४.२ मिलिमीटर आहे. यंदा तब्बल ५२९.५ मिलिमीटर (तब्बल ६३ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात नद्यांना पूर आला. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहिले.
महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागात पडलेल्या पावसाची स्थिती पाहता गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा जुलैअखेर मध्य महाराष्ट्र विभागात सर्वाधिक ४६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण आणि गोवा विभागात ४२ टक्के अधिक, विदर्भात ३७ टक्के अधिक, तर मराठवाड्यात २८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. एकूणच महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाने हजेरी लावल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
...या प्रणालींनी आणला पाऊस
जून महिन्यात राज्यात सरासरी गाठल्यानंतर जुलै महिन्यात सर्वदूर दमदार मॉन्सून बरसला. अखेरच्या टप्प्यात सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. जुलै महिन्यात प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान (एल-निनो स्थिती) सामान्य पातळीवर होते. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील सामान्य स्थितीत होता.
मॉन्सूनचा आस बराच काळ त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे राहिला. जुलै महिन्यात तीन कमी दाबाची क्षेत्र तयार झाली. यात एक तीव्र कमी दाब क्षेत्राचा समावेश असून, एकूण ११ दिवस या प्रणाली सक्रिय होत्या. मेडियन जूलियन आसोलेशनदेखील पूरक ठरल्याने ढगांची निर्मिती होत चांगला पाऊस झाला. पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा (ऑफ शोअर ट्रफ), महाराष्ट्रात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र (ईस्ट वेस्ट शेअर झोन) पोषक ठरल्याने घाटमाथ्यासह पश्चिम किनारपट्टीवर दमदार पाऊस झाला.
जिल्हानिहाय पडलेला पाऊस
सरासरीपेक्षा खुप अधिक (६० टक्क्यांहून अधिक) :
नगर, पुणे, सांगली, धारशिव, लातूर.
सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के) :
पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बीड, परभणी,
नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.
सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :
नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, गोंदिया.
सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) :
हिंगोली.
जुलै अखेरपर्यंतचा विभागनिहाय पाऊस
विभाग---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांमध्ये)
कोकण-गोवा---१७५५.०---२४८५.३---अधिक ४२
मध्य महाराष्ट्र---३८७.२---५६४.६---अधिक ४६
मराठवाडा---३०५.१---३८९.६---अधिक २८
विदर्भ---४८४.७---६६४.६---अधिक ३७
जुलै अखेरपर्यंत जिल्हानिहाय पाऊस, सरासरीच्या तुलनेत तफावत :
जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांमध्ये)
मुंबई शहर---१२७६.४---१७३९.९---अधिक ३६
मुंबई उपनगर---१३९२.८---२०४९.७---अधिक ४७
पालघर---१२९५.६---१७१०.१---अधिक ३२
रायगड---१८३३.१---२५८२.५---अधिक ४१
रत्नागिरी---१९८५.३---२८२३.६---अधिक ४२
सिंधुदुर्ग---१९३१.३---२८१७.९---अधिक ४६
ठाणे---१४०५.८---१७७४.२---अधिक २६
नगर---२०७.५---३३१.६---अधिक ६०
धुळे---२९०.६---३९१.४---अधिक ३५
जळगाव---३०७.३---४८३.३---अधिक ५७
कोल्हापूर---१०२१.१---१५७५.०---अधिक ५४
नंदूरबार---४३६.८---४६०.१---अधिक ५
नाशिक---४६०.५---५५४.६---अधिक २०
पुणे---४९७.०---८१४.०---अधिक ६४
सांगली---२४५.३---४३७.१---अधिक ७८
सातारा---४६९.५---६०१.२---अधिक २८
सोलापूर---१८७.९---२९६.०---अधिक ५८
बीड---२५२.५---३७६.५---अधिक ४९
छ. संभाजीनगर---२६५.५---२७९.६---अधिक ५
धाराशिव---२५२.४---४३७.६---अधिक ७३
हिंगोली---३९४.१---२०५.७---उणे ४८
जालना---२९०.२---३४१.७---अधिक १८
लातूर---३०८.०---५२५.५---अधिक ७१
नांदेड---३८४.६---४६८.५---अधिक २२
परभणी---३३६.०---४४०.१---अधिक ३१
अकोला---३६५.९---४५२.९---अधिक २४
अमरावती---४१७.६---४१९.९---अधिक १
भंडारा---५५०.४---७२४.६---अधिक ३२
बुलडाणा---३२८.७---४१८.१---अधिक २७
चंद्रपूर---५५१.७---८४६.४---अधिक ५३
गडचिरोली---६५५.३---१०३४.३---अधिक ५८
गोंदिया---६२५.१---६४४.५---अधिक ३
नागपूर---४९१.२---६२५.९---अधिक २७
वर्धा---४४४.३---६९५.७---अधिक ५७
वाशीम---४१६.०---५०८.२---अधिक २२
यवतमाळ---४३२.६---६६१.८---अधिक ५३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.