वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्त

वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्त
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्त
Published on
Updated on

जंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे झाड आहे. मोहाच्या बियांमध्ये सुमारे ४५ ते ५० टक्के खाद्यतेल व १६ टक्के प्रथिने आहेत. त्वचारोगावरील औषधात, साबण बनविण्याच्या कारखान्यात तसेच इजिन ऑइल म्हणूनही मोहाचे तेल वापरले जाते. तेल काढल्यानंतर राहिलेला चोथा म्हणजेच पेंड शेतीला सेंद्रिय खत व कीडनाशक म्हणून वापरता येते. याच्या फुलांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून त्याचा मद्यार्क निर्मितीसाठी वापर होतो. फुलांबरोबर सालीपासून औषधी पदार्थ बनतात. लाकूडही इमारत व अन्य कामासाठी उपयुक्त ठरते. आदिवासी लोकांसाठी हे कल्पवृक्ष मानले जाते.   वनस्पतीची माहिती : मोहाचे झाड हे द्विदल प्रकारात येत असून ते जलद गतीने वाढते. पूर्ण वाढलेल्या झाडाची उंची साधारण १० ते १५ मीटर असते व झाडाचा घेरही मोठा असतो. झाडाची मुळे जमिनीत खोलवर जातात. खोड मजबूत व टणक असते. पाने लंबगोलाकार, जाड असून फांदीच्या शेंड्याला गुच्छाने फुले येतात. झाडाला ८ ते १० वर्षानंतर फळे यायला सुरवात होते. मोहाच्या झाडाला फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुले येतात. परागीभवन झाल्यानंतर फुलांचा पुढील भाग गळून पडतो आणि ९० ते १०० दिवसात फळे पक्व होतात. लागवडीसाठी रोपे बनविणे :

  • हे झाड माळरान, खडकाळ, हलक्या, भारी अशा कोणत्याही जमिनीत येते. तसेच बागायत आणि जिरायत दोन्ही प्रकारच्या जागी होते.  मोहाची लागवड बियांपासून तसेच कलमांद्वारे करता येते. 
  • रोपे तयार करण्यासाठी ताज्या बियांचा वापर करावा. फळे पक्व झाल्यानंतर त्याच्या बिया काढून एक आठवड्याच्या आत पेरणी करावी. जून झालेल्या बियांची उगवणक्षमता नष्ट होते. अशा बिया पेरणीसाठी वापरू नये. 
  • मोहाची लागवड जागीच बिया लावून किंवा पिशवीत रोपाद्वारे केली जाते. 
  • बियांच्या लागवडीऐवजी शेंडा कलम केलेल्या मोहाच्या झाडाला फळे लवकर लागतात. त्यासाठी बियांपासून प्रथम पिशवीत रोपे बनवून घ्यावीत. त्यासाठी पिशवीमध्ये समप्रमाणात लाल माती, कुजलेले शेणखत आणि बारीक वाळू यांचे मिश्रण टाकावे. जून-जुलै महिन्यात या रोपांवर शेंडा कलम करावा. 
  • ज्या झाडाला फुले लवकर लागतात (म्हणजे फेब्रुवारी, मार्च महिन्यात फुले येणा­ऱ्या) झाडाचा शेंडा कलमासाठी निवडावा. अशा प्रकारे पिशवीत तयार केलेली रोपे पुढील वर्षी पावसाळ्यात लावण्यासाठी वापरावीत.
  • खड्डे तयार करणे : मोहाची लागवड भातशेताच्या बांधावर करता येते. तसेच सलग लागवड करायची असल्यास मे महिन्यात ८ बाय ८ मीटर अंतरावर फूट बाय २ फूट व २ फूट खोल खड्डे घ्यावेत. त्यात ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीने संवर्धित केलेले ५ किलो चांगले कुजलेले कंपोस्ट खत टाकावे. त्यासोबत २०० ग्रॅम १५ः १५ः१५ हे खत द्यावे. तसेच खड्ड्यामध्ये शिफारशी कीटकनाशकांचा वापर करून खड्डा मातीने भरून घ्यावा.  लागवड :  लागवडीसाठी एक वर्ष वयाची चांगली जोमदार रोपे निवडावीत. पहिल्या चांगल्या पावसानंतर मोहाची रोपे खड्ड्यात लावावीत.सुरवातीचे काही महिने रोपांना आधारासाठी काठी बांधावी. तसेच गुरांपासून संरक्षण करण्यासाठी रोपाभोवती चार काठ्या लावून त्याला जाळी अथवा गोणपाट लावावे.  रोपाजवळचे तण नियमित काढत जावे. खते व पाण्याचे नियोजन : झाडाला दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस २ ते ५ किलो कुजलेले शेणखत द्यावे. खताची मात्रा दरवर्षी वयाप्रमाणे वाढवत जावी. रासायनिक खतांमध्ये मिश्रखत पहिल्या वर्षी २०० ग्रॅम देऊन दरवर्षी २०० ग्रॅमने वाढवत जावे. खते देताना प्रथम झाडाच्या बुंध्याभोवतीची माती भुसभुशीत करावी. रोपापासून दीड ते दोन फूट अंतरावर आळे पद्धतीने खत मातीत मिसळून द्यावे. पावसाळ्यात जीवाणू खते उदा. रायझोबीअम, पीएसबी तसेच मायको­रायझा २० ते ५० ग्रॅम प्रति झाडाला शेणखतात एकत्र करून द्यावीत. खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे. जास्त पावसामुळे झाडाच्या बुंध्याजवळ पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.  कीड व रोगांपासून संरक्षण :

  • मोहाची झाडे रोग आणि किडीला कमी बळी पडतात. रोपे लहान असताना मर या रोगाने रोपे मरण्याची शक्यता असते. रोपांची लागवड केल्यानंतर रोपांभोवती ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन मुळांना त्याची आळवणी करावी. झाडाच्या मुळांजवळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 
  • लहान रोपांना कोवळी पाने येतात, त्या वेळी पाने कुरतडणारी अळी आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी ५ टक्के कडुनिंबाच्या बियांच्या अर्काची फवारणी करावी. मोठ्या झाडाला खोडकिडा व साल पोखणा­ऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. खोडकिडा लागू नये म्हणून झाडाची नियमित स्वच्छता करावी. प्रादुर्भाव आढळल्यास खोड स्वच्छ करून त्यातील अळ्या नष्ट कराव्यात. या खोडाच्या छिद्रात केरोसीनचा बोळा टाकून छिद्र शेणमातीने लिंपून घ्यावे.
  • काढणी व उत्पादन :

  • मोहाच्या झाडांना नियमित खते, पाणी दिल्यास आठ ते दहा वर्षात फुले व फळे यायला सुरवात होते.  फुले गोळा करण्यासाठी झाडाच्या खालची जागा स्वच्छ करावी.  गुरे किंवा इतर प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी सभोवती कुंपण घालावे.  फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात पहाटेच्या वेळेला फुले गळून पडतात. एकदा बहर संपला म्हणजे गळालेली सगळी फुले वेचून घ्यावीत. स्वच्छ करून सुकवावी.
  • मोहाच्या झाडाला एप्रिल ते मे महिन्यात फळे येतात. बरीचशी फळे पक्षी किंवा वटवाघळे खातात आणि बिया दुस­ऱ्या झाडावर नेऊन टाकतात. पिकलेली फळे झाडावरून काढावीत. पक्ष्यांद्वारे पडलेल्या बियाही गोळा कराव्यात. मोहाच्या एका मोठ्या झाडापासून साधारण ६० ते ७० किलो फुले आणि ७० ते ८० किलो बिया मिळतात.
  •  ः प्रा. उत्तम सहाणे, ७०२८९००२८९ (कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हील, ता. डहाणू, जि. पालघर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com