Agriculture Technology : युवकाने विकसित केले रोपे लागवड, बी टोकण यंत्र

Agriculture Machine : पिंपळद (ता.जि. नाशिक) येथील आविष्कार अनर्थे या युवा शेतकऱ्याने बियाणे टोकण व रोपे लागवडीचे हाताळणीस सोपे व शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारे यंत्र विकसित केले आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : पिंपळद (ता.जि. नाशिक) येथील आविष्कार संजय अनर्थे या एकवीस वर्षीय युवा शेतकऱ्याची अडीच ते तीन एकर शेती आहे. टाकाऊ वस्तूंपासून वस्तुनिर्मिती हा छंद त्याने शालेय जीवनापासूनच जोपासला आहे.

शाळेत असतानाच तयार केलेल्या कृषिविषयक प्रकल्पाला प्रशस्तिपत्र मिळाल्याने त्याचा आत्मविश्‍वास वाढला होता. अलीकडील काळातच त्याने आपली कल्पनाशक्ती व बुद्धिकोशल्य यांचा वापर करून नव्या यंत्राची निर्मिती केली आहे. हे यंत्र आहे बियाणे टोकण व रोपलागवड करणारे.

यंत्राची निर्मिती

भाजीपाला पिकांमध्ये रोपे तयार करणे व त्यांची लागवड करण्याची प्रक्रिया वेळखाऊ व अधिक श्रमाची असते. यात मजुरी खर्च देखील होत असतो. या सर्व बाबींचा विचार आविष्कारने केला आहे. तो इयत्ता दहावीत असताना त्याने प्लॅस्टिक पाइपपासून रोप लागवडीचे पहिले यंत्र बनवले होते.

मात्र दोन-तीन रोपांची लागवड केल्यानंतर ते तुटून गेले. पुढील टप्प्यात टाकाऊ लोखंडी पाइप्सचा वापर केला. मात्र त्याचीही कार्यक्षमता म्हणावी तशी नव्हती. आविष्कार स्वतः शेतकरी असल्याने शेतात काम करीत असताना प्रत्यक्ष येणाऱ्या सर्व समस्या त्याने लक्षात घेतल्या. त्यातून मग तिसऱ्या टप्प्यात अपेक्षित कार्य करू शकणारे सुधारित यंत्र विकसित करण्यात त्याला यश आहे.

Agriculture Technology
Agriculture Sprayer Technology : इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर तंत्रज्ञानाची गरज

यंत्राची रचना व कार्यपद्धती

यंत्राचे वजन - दोन किलो.

यंत्राची लांबी -३२ इंच

सुधारित यंत्रात स्टेनलेस, स्टील धातूचा वापर. त्याचबरोबर स्प्रिंग,

हॅण्डल, लोखंडी पट्टी यांचाही वापर.

यंत्राच्या वरील बाजूस दांडा. त्यामुळे यंत्राला स्थिरता आली असून, हाताळणे सोपे होते. शेतकऱ्यांवर कोणता ताण येत नाही.

दांड्याखाली ब्रेक. त्यास वरील भागापासून खाली तार जोडली आहे. ती खेचल्यानंतर खालील भागात असलेली झडप उघडली जाते. त्यामुळे यंत्रात वरून टाकलेले बियाणे खाली जमिनीत योग्य खोलीवर जाते. रोपही योग्य इंच खोलीपर्यंत जाण्यासाठी खालील झडप किंचित त्रिकोणी (पक्ष्याच्या चोचीप्रमाणे).

लागवड करण्याच्या ठिकाणी यंत्र मातीत रोवून उभे करण्यात येते.

त्याच्या वरील गोलाकार भागातून रोप खाली टाकण्यात येते.

ब्रेक दाबताच खालील बाजूच्या झडपेचा भाग उघडतो. योग्य खोली होऊन माती बाजूला रोप रोवले जाते. यंत्र वर काढताच बाजूची माती रोपाच्या मुळ्यांवर पडते व लागवड पूर्ण होते.

Agriculture Technology
Agriculture Technology : तंत्र जाणले यश हाती आले

यंत्राचे फायदे

पारंपरिक पद्धतीत एका दिवसात एक व्यक्ती दिवसाला ७०० पर्यंत रोपे लागवड करू शकत असे. मात्र यंत्राच्या माध्यमातून तीन हजारांपर्यंत लागवड करणे शक्य. मनुष्यबळाकरवी लागवड करताना ती एकसमान असतेच असे नाही.

काही वेळा ती लावताना मुळ्या तुटण्याचा धोका असतो. यंत्राच्या माध्यमातून एकसारखी लागवड होत असल्याने मरतुक कमी होऊन दुबार लागवड अत्यंत कमी प्रमाणात होऊ शकते. पूर्वी आविष्कारच्या आई- वडिलांना एक एकर लागवडीसाठी तीन दिवस वेळ लागायचा.

आता दोघे जण एका दिवसात एक एकरभरात लागवड यंत्राद्वारे करू शकतात. म्हणजेच श्रम, वेळ व खर्चातही बचत झाली आहे. ढोबळमानाने सांगायचे तर पूर्वी मजूरखर्च एकरी चार हजार रुपये व्हायचा.आता तो एकरी दीड हजार रुपये येतो. पालेभाज्या वगळता टोमॅटो, काकडी, दोडका आदी विविध भाजीपाला पिकांसाठी वापर करता येतो.

शेतकऱ्यांत होतेय लोकप्रिय

भाजीपाला रोपांची वाकून लागवड केली जाते. त्यामुळे पाठ, कंबर व गुडघेदुखीचा त्रास होतो. परिणामी, कामांचा वेग मंदावतो. शारीरिक व्याधीही जडते. त्या पार्श्‍वभूमीवर हे यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

आविष्काऱ्याने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत त्याचे व्यावसायिक रूप तयार केले आहे. यंत्र अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या शेतांमध्ये चाचण्यांसह प्रात्यक्षिके घेतली आहेत. कृषी प्रदर्शनातही सहभागी घेतला आहे. यंत्राला स्वामित्व हक्क मिळविण्यासाठी अर्जही दाखल केला आहे. एक हजार रुपये किंमत असलेल्या या यंत्राची आतापर्यंत १०० पर्यंत शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे.

बियाणे टोकण करण्यासाठीही उपयुक्त

यंत्राच्या वरील भागातून हाताने एक किंवा दोन बिया (गरजेनुसार) सोडल्या जातात. पाइपमधून बियाणे खालील भागात येते. येथे झडप बसवली आहे. तेथे बियाणे थांबते. बियाणे टोकण करण्याच्या जागेवर यंत्र योग्य खोलीपर्यंत जमिनीमध्ये रुतवले जाते.

झडप उघडली जाईल त्यानुसार बियाणे खाली येऊन टोकण केली जाते. या यंत्रामुळे टोकण प्रक्रियेत सुलभता येते. काम जलद होते. वेळ व मजुरी खर्चात बचत होते. जमिनीच्या ओलाव्यानुसार यंत्राचा वापर शक्य. कपाशी, तूर, मका, भुईमूग अशा विविध पिकांत वापर शक्य होतो. टोमॅटो, कापसासारख्या पिकात बुडाजवळ योग्य मात्रेत रासायनिक खते देण्यासाठीही यंत्र उपयुक्त ठरते.

संशोधकवृत्तीला कौतुकाची थाप

जिल्हा परिषद आणि ‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’ यांच्यातर्फे ‘उमेद शोध नावीन्यतेचा'' ही ग्रामीण भागातील संशोधकांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातून तीन नावीन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात आली. यात आविष्कारने तयार केलेल्या यंत्राची निवड झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते या यंत्राचे अनावरण झाले.

‘नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर’चे अध्यक्ष मनीष कोठारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. माथूर, संचालक विक्रम सारडा, नरेंद्र गोलिया, नरेंद्र बिरार, हेमंत राठी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे आदींनी आविष्कारच्या या संशोधनाचे कौतुक केले. ‘रूरल इनोव्हेटर’ व १० हजार रुपये रोख असा सन्मानही झाला.

आविष्कार अनर्थे

९५२९२३८१८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com