Wardha News : शेती हाच मुख्य व्यवसाय असताना केवळ जमीनधारणा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी साध्या ट्रॅक्टरचीही खरेदी केली नव्हती. गावशिवारातील ही अडचण दूर करण्यासाठी शिवणगावचा महिला समूह पुढे आला.
सावित्रीच्या या लेकींनी आपल्याकडील बचतीसह शासकीय योजनेचे अनुदान घेत गावात पहिल्या अवजारे बॅंकेची उभारणी केली. यातूनच आता गावात कृषी यांत्रिकीकरणाला बळ मिळाले आहे. आलगाव ग्रामपंचायती अंतर्गत शिवणगाव, आलगाव, चिचोली या तीन गावांचा यात समावेश होतो.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यातील आलगावातच ट्रॅक्टर आहे. परंतु १५० लोकवस्तीच्या शिवणगावात मुख्य व्यवसाय शेती असला तरी एकही ट्रॅक्टर नसल्याने आलगाव येथूनच भाडेतत्वावर शेतीकामी ट्रॅक्टर आणला जात होता. दरम्यान, २०१४ मध्ये गावातील महिलांनी एकत्रित येत ‘साथिया’ गटाची बांधणी केली.
या समूहात अध्यक्ष प्रतिभा गेडाम, उपाध्यक्ष उषा दडांजे, सचिव वंदना जुमळे तर सदस्यांमध्ये सुनीता शेळके, शोभा घुगरे, छाया नरांजे, विश्रांती दडांजे, लक्ष्मी दडांजे, नंदा मलगाम, सुकेसनी कांबळे, अलका फरकाडे यांचा समावेश आहे.
महिन्याला १०० रुपयांच्या बचतीचे उद्दिष्ट या समूहाचे होते. उत्पन्नक्षम व्यवसाय करण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु काय व्यवसाय असावा, यावर एकमत होत नव्हते.
अखेरीस गावात यांत्रिकीकरणाचा पर्याय नसल्याने अवजारे बॅंक उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२२ साली ट्रॅक्टरची खरेदी करण्यात आली. बीबीएफ, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर, तिर्री अशा सर्व अवजारांची १५ लाख रुपयांत खरेदी करण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) सात लाख ६१ हजार ३९४ रुपयांचे अनुदान त्यासाठी मिळाले.
अवजारे बॅंकेतील सयंत्र ठेवण्यासाठी शेडची उभारणी केली. सदस्या शेळके यांची जागा जागा त्यासाठी भाडेतत्वावर घेतली. या अवजारे बॅंकेला चांगला प्रतिसाद असल्याने उत्पन्नही चांगले होत आहे. याच उत्पन्नातून नुकतीच ‘व्ही-फॉस’ या अवजाराची खरेदी ३० हजार रुपयांत करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.