Agriculture Technology : अवकाशातून माहिती गोळा करण्याची उपयुक्तता

Space-Gathering Instruments : शेतीचे नियोजन, व्यवस्थापन व विविध उपकरणांच्या नियंत्रणातून कामांची अंमलबजावणी करता येते. अवकाशातून माहिती गोळा करणे कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते, याची माहिती घेऊ.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Information From Space : सध्याचे युग हे डिजिटल (अंकात्मक) तंत्रज्ञानाचे असून, शेतीमध्येही त्याचा वापर वाढत आहे. शेतीसाठी आवश्यक डिजिटल तंत्रज्ञान आधारित साधने विकसित होऊ लागली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा माहिती हाच गाभा आहे. शेती ही नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असते. या साऱ्या घटकांची स्थिती निसर्ग संबंधित घटक उदा. हवामान, मृदा, खनिजे इ. वर अवलंबून आहे. हे घटक स्थान व वेळपरत्वे बदलत असतात.

शेती शाश्‍वतपणे उत्पादक, किफायतशीर, साधन संपत्ती विनियोग कार्यक्षम व पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्व घटकांचे व्यवस्थापन काटेकोरपणे करावे लागणार आहे. शेती काटेकोरपणे करणे म्हणजेच उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा तसेच मानवनिर्मित निविष्ठांचा योग्य वापर (योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य रीतीने) करणे आवश्यक आहे.

कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन काटेकोरपणे करायचे तर त्यांची सध्याची किंवा प्रत्यक्ष स्थितीतील माहिती आपल्याला असली पाहिजे. हे घटक निसर्गावर अवलंबून असून, त्यात स्थान व वेळ परत्वे बदल होत असतात. ही माहिती गोळा करणे एकेकाळी फार खर्चिक व अवघड होते. कारण त्यासाठी प्रत्येक शेतामध्ये आपल्याला संवेदके बसवणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणांमुळे अवकाशस्थित साधने (उदा. उपग्रह स्थापित उपकरणे व संवेदके इ.) महत्त्वाची ठरत आहेत.

Agriculture Technology
Agriculture Technology : संरक्षित शेतीेतून अवर्षणात प्रगती

मोठ्या क्षेत्रावरील माहिती एकावेळी मिळते

आपल्या स्वतःच्या निरीक्षणाद्वारे अथवा जमिनीवर शेतामध्ये स्थापित अथवा जमिनीवरील वाहनावर जसे ट्रॅक्टर वर स्थापित यंत्रणेद्वारे आपणास एकाच वेळी मर्यादित क्षेत्रावरील माहिती उपलब्ध होते. पण क्षेत्रीय स्तरावरील शेतीचे नियोजन करावयाचे असल्यास किंवा अगदी एकाच शेतामधील पिकाचे नियोजन करताना पिकाची विविध माहिती (उदा. पीक परिस्थिती, त्यावरील रोग किंवा किडींच्या प्रादुर्भावाची माहिती, पिकावर पडलेल्या इतर ताणांची माहिती इ.)

अथवा शेतीसाठी उपलब्ध संसाधनांची माहिती (उदा. त्या क्षेत्रावरील जलसाठे अथवा शेततळे यामधील पाण्याची पातळी, उपलब्धता इ.) एकाच वेळी उपलब्ध होणे आवश्यक असते. अशावेळी एकाच वेळी विशाल क्षेत्र व्यापू शकणारे, त्या क्षेत्राची प्रतिमा घेऊ शकणारी साधने उपग्रहावर स्थापित केलेली असल्यास त्याचा फायदा मोठ्या क्षेत्रासाठी घेता येतो.

वारंवारिता व नियमित निरीक्षण

पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या संसाधनांची आवश्यकता असते. त्यानुसार त्याचे नियोजन करण्यासाठी पिकाची अथवा संसाधनांची माहिती विशिष्ट अंतराने नियमित मिळणे आवश्यक असते. नियमित उपलब्ध झालेल्या माहितीद्वारे पीक परिस्थिती अथवा संसाधने यामध्ये होणाऱ्या बदलांचे पृथ:क्करण करून पिकांचे योग्य व्यवस्थापन वेळीच करणे शक्य आहे.

स्वतःच्या निरीक्षणाद्वारे अथवा जमिनीवरील स्थापित अथवा जमिनीवरील वाहनावर स्थापित उपकरणांद्वारे वारंवार व नियमित माहिती घेण्यास मर्यादा आहेत. मात्र त्या विशिष्ट क्षेत्रावरून वारंवार भ्रमण करणारे उपग्रहांनी त्यावरील उपकरणांद्वारे गोळा केलेल्या प्रतिमा व अन्य माहिती वापरता येते. या मिळालेल्या माहितीच्या पृथक्करणाआधारे त्या क्षेत्राचे नियमित निरीक्षणसुद्धा करणे शक्य आहे.

Agriculture Technology
Agriculture Technology : तंत्रज्ञानाच्या मदतीने हमखास बागा जगविता येतील

माहिती मधील समानता

एका विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्राचे नियोजन करताना तेथील पिके किंवा संसाधने याची माहिती मिळणे आवश्यक असते. स्वतः निरीक्षण करणे किंवा जमिनीवरील वाहनावर स्थापित उपकरणांद्वारे निरीक्षण करणे हे तुलनेने तितके नियमित राहत नाही. त्यामुळे अचूक माहिती गोळा करण्यामध्ये अडचणी येतात.

माणसांद्वारे किंवा शेतीतील उपकरणाद्वारे वेगवेगळ्या वेळी प्राप्त झालेल्या माहितीमध्ये समानता राहत नाही. परंतु उपग्रहाचे दरवेळी भ्रमण हे अचूकपणे त्याच क्षेत्रावरून होत असल्याने, दरवेळी आपणास त्याच क्षेत्राची माहिती मिळते. त्याच क्षेत्रांतील तुलनात्मक बदलाचा अभ्यास करून योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे शक्य होते.

दुर्गम भागातील माहिती

दुर्गम भागामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण घेणे जितके अवघड, तितकेच तिथे उपकरणे स्थापित करणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे ठरते. रस्ता व अन्य अडचणीमुळे जमिनीवरून चालणाऱ्या वाहनावर स्थापित उपकरणांचाही फारसा उपयोग होत नाही. तसेच अशी माहिती दरवेळी नियमित अंतराने घेता येत नाही. अशावेळी अवकाशातून फिरणारे उपग्रह व त्यावर स्थापित कॅमेरे व संवेदके यांच्याकडून आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते.

कमी खर्चामध्ये अधिक माहिती

उपग्रह एकदा प्रक्षेपित झाला की त्याद्वारे अनेक वर्षे माहिती उपलब्ध होते. त्याच्या वाढीव व्याप्तीमुळे प्रति क्षेत्र माहिती मिळविण्यासाठीचा खर्चसुद्धा कमी होतो. तुलनेने शेतामध्ये संवेदके स्थापन करणे किंवा चालत्या वाहनांवर स्थापित उपकरणे यांचा प्राथमिक खर्च, देखभाल व त्यासाठी दरवेळी लागणारे मनुष्यबळ इ. सर्व बाबी अधिक अधिक खर्चिक ठरतात.

प्रत्यक्ष परिस्थितीतील माहितीची जलद उपलब्ध करून देण्याची क्षमता

पूर, भूकंपामुळे झालेली हानी किंवा ज्वालामुखींचे फुटणे अशा अनेक नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीमध्ये माणूस किंवा त्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. अशा वेळी उपग्रह किंवा ड्रोनद्वारे माहिती घेणे सोपे होते. मिळालेल्या माहितीचा योग्य विनियोग करून जीवितहानी आणि वित्तहानी बऱ्यापैकी कमी करता येऊ शकते. वर्तमान परिस्थितीमध्ये विशाल क्षेत्रांवरील जलद माहितीची उपलब्धता झाल्यामुळे आपत्तीवर वेळीच नियंत्रण किंवा योग्य ते तातडीचे व्यवस्थापन केल्यास नुकसानीची तीव्रता कमी करणे शक्य होते.

माहितीमधील सातत्य व गुणवत्ता

उपग्रहस्थापित संवेदके किंवा उपकरणे ही दीर्घकाळासाठी मानकीकृत केलेली असतात. त्याद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीमध्ये सातत्य व गुणवत्ता असते. जमिनीवरील संवेदक किंवा उपकरणांचे वेळीच योग्य प्रकारे कॅलिब्रेशन करणे व उत्तम स्थिती राखणे ही बाब नियमित देखभालीवर अवलंबून असते. त्यामुळे उपग्रहाच्या तुलनेमध्ये या उपकरणाद्वारे मिळालेल्या माहिती व तिची गुणवत्ता तुलनेने कमी राहू शकते.

पर्यावरण पूरक

उपग्रह स्थापित संवेदके नैसर्गिक वातावरणात तसेच कोणालाही त्रास अथवा इजा न पोहोचता दूरस्थपणे माहिती गोळा करीत असते. त्यामुळे ती पर्यावरण पूरक असतात. जमिनीवरील वाहन स्थापित उपकरणांद्वारे माहिती गोळा करताना ती पर्यावरणपूरक असावीत.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com