Agriculture Technology : संरक्षित शेतीेतून अवर्षणात प्रगती

Success Story of Farmer : बुलडाणा जिल्ह्यातील माहेरखेड (ता. सिंदखेडराजा) येथील संजय देवरे यांनी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा वापर करून संकरित भाजीपाला बीजोत्पादन पद्धती यशस्वी केली आहे.
Sanjay Devre
Sanjay DevreAgrowon

Protected Agricultural Technology : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हा कायम कमी पावसाचा किंवा दुष्काळी तालुका असल्याने जल प्रकल्प, तलाव पूर्ण भरत नाहीत. काही भागात पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व येथील शेतकऱ्यांनी जाणले आहे. तालुक्यातील बरीच जमीन खडक, डोंगराळ आहे.

अशाही जमिनीत शेतकरी मेहनतीने पिके घेतात. तालुक्यातील माहेरखेड हे सुमारे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावच्या शिवारात प्रवेश करताच सिंचनाची सोय असलेल्या प्रत्येक शेतात आपल्यात शेडनेट्‍स उभारलेली पाहण्यास मिळतात. प्रत्येक शेतकरी आधुनिक पीक पद्धतीच्या मार्गाला लागला आहे. जमीन धारणा कमी असल्याने कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. गावात आजमितीला तीनशेहून अधिक शेडनेट्‍स असावीत.

Sanjay Devre
Protect Crops : वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण सध्याची प्राथमिकता : कुलगुरू गडाख

देवरे यांची बारा शेडनेट्‍सची शेती

गावातील संजय देवरे यांची २००० पर्यंत वडिलोपार्जित एक एकरच शेती होती. त्यातून प्रपंच होत नसल्याने ते रोजंदारीची कामे करीत. दरम्यान, संकरित भाजीपाला बीजोत्पादनाची माहिती मिळाली.

अधिक अभ्यासातून त्यांनी खुल्या पध्दतीच्या शेतीत हे प्रयोग सुरू केले. सन २००९ च्या दरम्यानसंरक्षित शेती तंत्रज्ञानाकडे वळून १० गुंठ्यांत त्यांनी शेडनेट उभारले. कृषी विभाग, ॲग्रोवन, दूरदर्शन आदी स्रोतांमधून त्यांनी या विषयातील ज्ञान घेतले.

हळूहळू ते भाजीपाला बीजोत्पादनात पारंगत झाले. जसजसा आत्मविश्‍वास व त्याचबरोबर उत्पन्नवृद्धी होत गेली त्यानुसार शेडनेटची संख्या वाढवली. आजमितीला ती १२ पर्यंत पोहोचली आहे. प्रत्येकी दहा ते वीस गुंठे अशा या शेडनेटनी सुमारे तीन एकरांपर्यंत जागा व्यापली आहे.

करार पद्धतीने शेती

बुलडाणा भागात अनेक खासगी बियाणे कंपन्या शेतकऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन कार्यक्रम राबवतात. संजयदेखील अशाच कंपनीसोबत करार शेती करतात. त्यांचा मुलगा शंकर कृषी पदवीधर असून, त्याच कंपनीत जिल्ह्यातील अन्य भागात पर्यवेक्षक आहे. साहजिकच वडिलांना मुलाची मोठी मदत होते. साधी व सिमला मिरची, काकडी, टोमॅटो, दोडके, कारले आदी पिकांचे बीजोत्पादन वर्षभर चक्राकार पद्धतीने घेण्यात येते.

खरिपात जूनमध्ये काकडी, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर उन्हाळ्यात कारले अशी साधारण पद्धत वापरण्यात येते. दुष्काळी भाग असल्याने संरक्षित शेतीत पाण्याची शाश्‍वत उपलब्धता महत्त्वाची असते. त्या दृष्टीने कृषी विभागाच्या योजनेतून शेततळे खोदले आहे. तीन विहिरी, एक बोअरवेल आहे. धरणावरून दोन किलोमीटरवरून पाणी पाइपलाइनद्वारे शेतापर्यंत आणले आहे. ठिबक तसेच पॉली मल्चिंग पेपरचा वापर होतो.

Sanjay Devre
Agriculture Digital Technology : गावस्तरावर डिजिटल व्यवहारात वर्धा पहिला

‘ॲग्रोवन’ ठरला मार्गदर्शक

संजय यांना शेतीतील प्रगतीत ‘ॲग्रोवन’ची भक्कम साथ मिळाली आहे. गावात थेट

अंक पोहोचत नसला, तरी नियमितपणे तालुक्याला जाऊन ते अंक आणतात. त्यातील यशोगाथा, तांत्रिक लेख व अपडेट्स संरक्षित शेतीसाठी खूप फायदेशीर ठरल्याचे ते आवर्जून सांगतात.

उत्पादन, अर्थकारण व प्रगती

वाणनिहाय बियाण्याचे मिरचीचे प्रति १० गुंठ्यांत ४० ते ५० किलो ते त्यापुढे, टोमॅटोचे १० ते २० किलो, कारल्याचे ८० ते ९० किलो असे उत्पादन मिळते. बियाणे तयार करण्यासाठी पुढे काही प्रक्रिया कराव्या लागतात. त्याचाच भाग असलेले ‘बियाण वेगळे करणारे (एक्स्ट्रॅक्टर) यंत्रही आहे. टोमॅटोला वाणनिहाय किलोला १० हजार ते १५ हजार रुपये तर कारल्याला दोन हजार रुपये दर मिळतो. वर्षभरात प्रति १० गुंठ्यांत तीन पीक पद्धतीतून साडेपाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

दरवर्षी कांदा बीजोत्पादनही असते. १५ एकरांत सोयाबीन, गहू, शाळू आदी पिके असतात. संरक्षित शेतीमुळेच एकेकाळच्या एक एकर शेतीपासून टप्प्याटप्प्याने २० एकर शेती घेणे शक्य झाले. आहे. शेतीतून उत्पन्नातूनच शंकर यांना कृषी पदवीचे तर लहान मुलगा किशोरला अभियांत्रिकीचे शिक्षण देणे शक्य झाले. तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मुलीचे लग्नही धडाक्यात करता आले. आज ५० अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर, अवजारे, तीन दुचाकी आहेत. घराचे बांधकाम तेवढे शिल्लक आहे.

रोजगार निर्मिती

शेडनेट व भाजीपाला बीजोत्पादनातून गावात रोजगार निर्मिती झाली आहे. शेडनेटधारक शेतकऱ्यांची कुटुंबे राबतातच. पण अधिक संख्येने मजुरांची गरज भासते. त्यामुळे शेडनेटमधील कामांसाठी अवतीभोवतीच्या गावांमधील मजूर येथे कामासाठी येतात. यात प्रामुख्याने महिलांची संख्या मोठी आहे.

महिला परागीकरणाच्या कामांमध्ये कुशल झाल्या आहेत. संजय यांच्याकडे वर्षभर ३० ते ३५ मजूर कामाला असतात. गावात एवढ्या संख्येने मजूर मिळत नसल्याने लगतच्या मराठवाड्यातील काही गावांतून मजूर महिलांची मदत घेण्यात येते. त्यांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सुविधा पुरवली जाते. याशिवाय दोन-तीन आदिवासी कुटुंबे वर्षभर शेतात राबतात.

संजय देवरे, ९९२३४४८४५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com