ए.आय. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) (कृत्रिम प्रज्ञा), इंटरनेट ऑफ थिंग्ज (Internet Of Things) (आयओटी- किंवा वस्तुजाल) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) यांना 'उदयोन्मुख तंत्रज्ञान' असे म्हणले जाते. या तीन तंत्रज्ञानांचा स्वतंत्रपणे किंवा समन्वयाने कृषी क्षेत्रात कसा उपयोग केला जातोय किंवा कोणते लक्षणीय प्रयोग केले जात आहेत त्याचा आढावा घेऊया. (Latest Technology In Agriculture)
पीक-विमा/ कर्ज
नोकरदार वर्गाला किंवा खासगी कंपनीसाठी काम करणाऱ्या पगारी जनतेला आर्थिक सुविधा सहजपणे उपलब्ध होतात. परंतु आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जासाठी किंवा विम्यासाठी खूप झगडावं लागतं. त्यांना या सुविधा सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना सावकारीच्या चक्रव्युहात अडकावं लागतं. अव्वाच्या सव्वा व्याज देण्याशिवाय पर्याय उरत नाही. खासगी बँका माहितीवर चालतात. तुमच्याकडे किती कागदपत्रे आहेत, नियमित पगार किंवा पैसे येतात का आणि व्यवहारांची नोंदणी आहे का, अशा प्रकारची माहिती बॅँकांसाठी उपयोगी असते. खरं तर थोडा प्रयत्न केल्यास ही माहिती अल्पभूधारक शेतकऱ्यांकडूनसुद्धा मिळू शकते. पण तसे करणे बॅंकांच्या फायद्या-तोट्याच्या समीकरणात बसत नाही. मग उदयोन्मुख तंत्रज्ञान यात काही मदत करू शकते का?
उदाहरण घेऊया इंडोनेशियामधील 'हरा' या कंपनीचं. कृषी क्षेत्राची परिस्थिती पाहिली तर इंडोनेशिया आणि भारतात खूप साम्य आढळेल. तिथेही मुख्यतः अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांना आजूबाजूच्या सावकारांवर अवलंबून राहावं लागतं. मग 'हरा'च्या संस्थापकांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची ताकद इकडे वापरूया अशी युक्ती सुचली. आणि त्यांनी शेतीबद्दल प्रत्येक माहिती ही एका मोबाईल अॅपद्वारे थेट ब्लॉकचेनमध्ये टाकायची सुविधा विकसित केली. शेतीचं क्षेत्रफळ किती आहे, ती कोणाच्या नावावर आहे, कोणतं पीक पेरलं आहे, कोणते खतपाणी दिले जात आहे आणि त्या संबंधी सगळीच माहिती त्यावर टाकायला सुरुवात केली.
पण फक्त तुम्ही माहिती टाकली म्हणून त्याला खरं मानायचं कशाला? इथे त्यांनी लोकशाही पद्धतीने जसं बहुमत सिद्ध झाल्यावर कोणत्याही गोष्टीवर शिक्कामोर्तब केला जातो, तशी एक युक्ती वापरली. इतर कोणी जर त्याच अॅपद्वारे दुसऱ्याच्या दिलेल्या माहितीला दुजोरा दिला, तर त्या माहितीची वैधता अधिक वाढते. आणि असं करण्यासाठी त्यांना मोबदला सुद्धा दिला जातो. माहितीची वैधता पडताळण्यासाटी चांगला मोबदला मिळतो म्हणून काही लोक तर पूर्णवेळ फक्त हेच काम करतात. पण हा मोबदला द्यायला कंपनीकडे पैसा येतो कुठून? तर कंपनी हीच माहिती बँकांना आणि विमा कंपन्यांना पुरवते. त्या बदल्यात बँका आणि विमा कंपन्या 'हरा'ला पैसे पुरवतात आणि तोच पैसा पुढे दिला जातो. मग बँका आणि विमा कंपन्या माहितीच्या मोबदल्यात पैसे का देतात? कारण की त्यांना ते परवडतं म्हणून. या माहितीच्या आधारावर ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या नेहमीच्या योग्य दरात कर्ज देतात, आणि त्यांना व्याजापासून पाहिजे तसा नफादेखील मिळतो. या बँकांच्या अनुभवानुसार, जवळपास १०० टक्के कर्जाची वेळेवर परतफेड होते. फक्त आर्थिक सुखसुविधा सगळ्यांपर्यंत पोचवले तर त्याचे फायदे हे सगळ्यांना होतात हे याचे उत्तम उदाहरण.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारावर विमा पुरवण्यासाठी अनेक खासगी प्रकल्प समोर आले आहेत. विम्यामध्ये आय.ओ.टी. सेन्सरचा वापर होणं ही महत्त्वाची घडामोड आहे. एकदा का हे सेन्सर बसवले, की तेच हवामानाची किंवा मातीची माहिती इंटरनेटद्वारे योग्य ठिकाणी स्वतःहूनच पोचवतील. असे प्रकल्प महाराष्ट्रातही सुरु झाले आहेत, उदाहरणार्थ नाशिकमधील सह्याद्री फार्म्स या शेतकरी उत्पादक कंपनीने या प्रकल्पास सुरुवात केली आहे.
माहितीसाठ्याची हाताळणी
आय.ओ.टी. सेन्सरद्वारे येणारी माहिती असो किंवा 'हरा'च्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे अॅपद्वारे येणारी माहिती असो, इतका मोठा माहितीचा साठा 'समजून' घेणं हे फक्त माणसांनी करायचं म्हणलं तर अवघडच आहे. म्हणून इथे ए.आय. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. जसं की पिकाला रोगापासून वेळीच वाचवायचं असेल किंवा पिकाची गुणवत्ता चांगली ठेवायची असेल तर त्यात ए.आय.चा वापर करता येतो. आपण 'ए.आय.'वर आधारित प्रोग्रॅमला पिकाची माहिती फोटोद्वारे किंवा अन्य मार्गांनी देऊन महत्वाचे निष्कर्ष, निर्णय अथवा भाकित मिळवू शकतो. इथे आजार ओळखण्यापासून ते त्यावरील औषधोपचार सुचवण्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत होऊ शकते.
हवामानाच्या भाकितांची माहिती नीट समजून घेऊन ए.आय. स्वतःहून शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करावी इथपासून ते अपेक्षित उत्पादन किती असेल याची माहितीही पुरवू शकतो. जर्मनीस्थित हीलियोपास या ए.आय कंपनीद्वारे दुष्काळी परिस्थिती अगोदरच ओळखून त्यावर मार्ग सुचविण्याचे काम केले जाते.
क्लायमेट चेंजचे आव्हान
'इकॉनॉमिक सर्व्हे'ने २०१७ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, हवामानबदल आणि वाढत्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न सरासरी ४ ते १४ टक्क्यांनी कमी झालं आहे. या व्यतिरिक्त, वाढत्या लोकसंख्येचे पोट भरण्यासाठी, २०१९ च्या तुलनेने २०३० पर्यंत भारताला ५ कोटी टन अधिक अन्न उत्पादनाची गरज भासणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्र आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालणं ही काळाची गरज आहे.
(लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अभ्यासक असून कृषी क्षेत्रामध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.