Agriculture Technology : ‘सच्छिद्र निचरा’ तंत्रामुळे जमीन झाली क्षारपडमुक्त

Sugarcane Farming : वसगडे (जि. सांगली) येथील युवा शेतकरी सूरज पवार यांची ऊसशेती एकेकाळी क्षारपड होऊन त्यातील उत्पादकता घटली होती. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी १२ एकरांवर सच्छिद्र निचरा प्रणाली यंत्रणा उभारली.
Porous Drainage Technique
Porous Drainage Technique Agrowon

Sugarcane Farming with 'Porous Drainage System ' : सांगली शहरापासून सुमारे तीस किलोमीटरवर येरळा नदीकाठी वसगडे (ता. पलूस) गाव वसले आहे. जमीन काळी, भारी असून ऊस मुख्य पीक आहे. सन १९७० ते १९९० दरम्यान गावातील शेतकरी ऊसशेतीत ‘माहिर’ होता. दरम्यान खंडेश्‍वरी धडक आणि लक्ष्मी पाणीउपसा योजना सुरू झाल्या. मात्र त्या उंच भागात आणि जमिनी सखल भागात असल्याने शेतांमध्ये पाणी साचून राहण्यास सुरवात झाली.

निचरा होण्याचा कोणताही मार्ग नव्हता. रासायनिक खतांचा वापरही संतुलित होणे गरजेचे होते. परिणामी जमीन क्षारयुक्त होण्यास सुरवात झाली. याच गावात रामचंद्र, मधूकर व सुधाकर या संयुक्त पवार कुटुंबाची १४ एकर शेती आहे. त्यांनाही हीच समस्या येऊ लागली. त्यामुळे उसाचे जेमतेम एकरी २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन मिळू लागले.

दरम्यान कुटुंबातील पुढील पिढीने म्हणजे सुधाकर यांचे ऑटोमोबाईल विषयात पदविका घेतलेले चिरंजीव सूरज यांनी वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची सूत्रे २०१४ च्या दरम्यान हाती घेतली. चुलतबंधू नितीन, सचिन, हे बाहेरगावी नोकरीस असले तरी त्यांचा मानसिक व आर्थिक आधार सोबत राहिला. सोबत बंधू प्रमोद, अमोल, संग्राम, संदीप, संजय यांचीही शेतीत मदत होऊ लागली.

Porous Drainage Technique
Silk Farming : रेशीम शेतीने दिला सक्षम पर्याय

तंत्रज्ञानाने दाखवला मार्ग

क्षारपड जमिनीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने सूरज यांनी प्रयत्न सुरु केले. गावातील बाळासाहेब सावंत व उदय कोकाटे यांनी २०११-१२ मध्ये सच्छिद्र निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती सुधारल्याबाबत सूरज यांनी अधिक माहिती करून घेतली. या तंत्रज्ञानाचा सांगोपांग अभ्यास त्यांनी केला.

सूरज सांगतात की मुळात शेती भांडवली. त्यामुळे खर्च करावा तो कमीच. उत्पन्नाची शाश्वती निश्चित नाही. असे असूनही शेती क्षारपड समस्येतून बाहेर काढायचे असा निश्‍चय केला.
वडीलधाऱ्यांचेही त्यासाठी मत वळवले. दरम्यान शासनाकडून या समस्या निवारणासाठी अनुदान मिळते असे समजले. त्याचाही रीतसर माहिती घेतली. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची गरज होती.

त्यासाठी कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्रात जाऊन जलसिंचन व निचरा अभियांत्रिकीचे सहायक प्राध्यापक एस. डी. राठोड यांची भेट घेतली. त्यानुसार २०१६ मध्ये
१२ एकरांवर सच्छिद्र निचरा प्रणाली यंत्रणा बसवली.

वापरलेले सच्छिद्र निचरा प्रणाली तंत्र

-खोली- साडेतीन ते चार फूट
-मुख्य ‘लाइन’साठी वापरलेली पाइप- ६ ते १२ इंच
-प्रति १०० फुटावर दोन इंची फिल्टर पाइप. त्यास कापडी ‘कोटिंग.’
- या पाइपद्वारे अतिरिक्त झालेले पाणी मुख्य पाइपलाइनमधून चेंबर मध्ये येते
-प्रत्येक २५० फुटांवर एक असे एकूण पाच चेंबर्स.
-या प्रणालीसाठी एकरी खर्च येतो सुमारे ७० हजार रुपये. यातील केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा
प्रत्येकी ४० टक्के व शेतकरी हिस्सा २० टक्के वाट्याला आला.

Porous Drainage Technique
Integrated Farming : माळरानावर प्रयोगशील, एकात्मिक शेती

अपेक्षित परिणाम दिसू लागले

तंत्रज्ञान वापराचा परिणाम एक वर्ष ते तीन वर्षे या काळात हळूहळू दिसू लागला. सुरवातीच्या काळात जमिनीतील अतिरिक्त साचलेले क्षार निघून जावेत यासाठी पाटपाणी दिले. त्यानंतर गरजेनुसार ठिबक सिंचनाचा वापर सुरु झाला. ऊस पीक व्यवस्थापनातही बदल केला. पूर्वी चार फुटी सरी पध्दतीचा वापर व्हायचा. सुधारणा करताना पाच फूट रुंद सरी, रोप पद्धतीने लागवड सुरू केली.

मागील चार वर्षांपासून आडसाली हंगामाऐवजी सुरु लागवडीवर भर दिला. को ८६०३२ या वाणाऐवजी १०००१ या वाणाचा वापर सुरू केला. दर तीन वर्षानंतर माती परीक्षण केले जाते. त्यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन होते. हिरवळीच्या खतांसह एकरी शेणखत चार ट्रेलर, प्रेसमड तीन ट्रेलर, कोंबडी खत एक ट्रेलर असा वापर होतो.

खोडवा उसात पाचट कुट्टीचा वापर होतो. बैलाच्या साहाय्याने खत मातीआड केले जाते. त्यामुळे खताचा पूर्ण वापर व बचत होते. निचरा प्रणाली तंत्रज्ञान वापर व त्यास सुधारित व्यवस्थापनाची जोड यातून एकरी २५ ते ३० टन असलेले उत्पादन आता सुरू हंगामात ५५ ते ६० टन तर आडसाली उसाचे ७० ते ७२ टन मिळू लागले आहे. केवळ उत्पादनच नव्हे तर या व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यासही मदत झाली आहे. जमिनीचा ‘पीएच’ पूर्वी साडेआठ होता. आता तो सातच्या दरम्यान आहे.

उसाचे सुधारित वाण ठरले फायदेशीर :

सूरज सांगतात की अलीकडील वर्षांत १०००१ या सुधारित वाणाची लागवड करतो. वजनाला जास्त, कमी वेळेत परिपक्व होणारे हे वाण असून १२ ते १३ महिन्यांत ऊस गाळपास जातो.

क्षारपड जमिनीसाठी हा वाण उपयुक्त असून त्याच्या खोडव्याचे उत्पादनही चांगल्या प्रमाणात येते असा अनुभव आला आहे. वाळवा येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याने या वाणाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले आहे. कारखान्यातर्फे प्रति टन ३३०० रुपये दर देण्यात येतो असेही सूरज यांनी सांगितले.

सूरज पवार- ८६६८४२५७६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com