Garlic Cultivation : तंत्र लसूण लागवडीचे...

लसूण लागवडीसाठी सुधारित जातींचे बेणे वापरावे. मागील हंगामात तयार झालेल्या थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी निवडावेत.
Garlic Cultivation
Garlic CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. शिल्पा गायकवाड, डॉ. भरत पाटील

लसूण लागवडीसाठी (Garlic Sowing) सुधारित जातींचे बेणे वापरावे. मागील हंगामात (Garlic Season) तयार झालेल्या थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी निवडावेत. कंद चांगला पोसण्यासाठी जमिनीचा एक ते दीड फुटापर्यंतचा भाग भुसभुशीत असणे आवश्यक आहे.

लसूण हे एक महत्त्वाचे कंदवर्गीय पीक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात लसूण पिकाची लागवड केली जाते. दैनंदिन आहारात, मसाले निर्मिती, विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना लसणाचा वापर केला जातो. लसणात विविध औषधी गुणधर्म असून श्‍वसन विकार, खोकला, दमा, फुफ्फुस आणि पोटाचे विकार, कान व डोळ्यांचे, उच्च रक्तदाब, हृदय रोग, कर्करोग, त्वचा विकार इत्यादींवर लसूण हे गुणकारी औषध आहे. तसेच लसणाच्या सेवनामुळे पचनसंस्था चांगली होते.

Garlic Cultivation
Rabi onion- रब्बी कांदा रोपवाटिका कशी करावी?

हवामान ः

लसूण पीक तापमानास अत्यंत संवेदनशील असून दर्जेदार उत्पादनासाठी शिफारस केलेल्या हंगामामध्येच लागवड करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात थोडे दमट व थंड हवामान, तर पक्व होताना व काढणीवेळी कोरडे हवामान गरजेचे असते. या काळात लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पानाची वाढ होते व त्याची संख्या वाढते. हा काळ साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा असतो. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व लसूण कंद आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात हवेतील आर्द्रता कमी व वाढलेले तापमान फायद्याचे ठरते. त्यामुळे पात वाळणे, कंद सुकणे या क्रिया सुलभ होतात.

जमीन ः

- लसणाचा कंद जमिनीत पोसत असल्याने वाढीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली भुसभुशीत व कसदार जमीन लागते.

- जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.

- मध्यम काळ्या भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत जास्त उत्पादन घेता येते.

- चांगला कंद पोसण्यासाठी जमिनीचा एक ते दीड फुटांपर्यंतचा भाग भुसभुशीत असणे आवश्यक आहे.

Garlic Cultivation
Onion Producers : ...तर कांदा उत्पादकांचे ४० टक्के नुकसान टळले असते

पूर्वमशागत ः

लसणाचे कंद जमिनीत पोसतात. लसणाची मुळे १५ ते २० सेंमी खोलीपर्यंत जात असल्याने ३० ते ४० सेंमी खोलीपर्यंत जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या कुळवणीवेळी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

सुधारित जाती ः

लागवडीसाठी फुले नीलिमा, फुले बसवंत, गोदावरी, श्‍वेता तसेच यमुना सफेद, ॲग्रीफाऊंड व्हाइट, भीमा ओंकार या जातींची निवड करावी.

लागवडीसाठी बेणे ः

- लागवडीसाठी हेक्टरी ६०० किलो बेणे पुरेसे होते. लागवडीसाठी सुधारित जातीचे बेणे वापरावे.

- लागवडीसाठी मागील हंगामात निघालेले थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले बेणे वापरावे.

- लसणाची लागवड (कुड्या) पाकळ्या लावून केली जाते. मोठे, सारख्या आकाराचे, निरोगी गाठी बेण्यासाठी निवडावेत. कंदातून पाकळ्या अलगद वेगळ्या कराव्यात. पाकळीवरच्या पापुद्र्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. सारख्या आकाराच्या टपोऱ्या (८ ते १० मि.मी लांब) निवडक कुड्या किंवा पाकळ्या लागवडीसाठी वापराव्यात. लहान पाकळ्या लावल्या तर कंद उशिरा तयार होऊन उत्पादन कमी मिळते.

बीजप्रक्रिया ः

लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्यांवर कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रक्रिया करावी. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या द्रावणात दोन तास बुडवून मग लागवड करावी.

लागवड तंत्र ः

- रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात लागवड करावी. उशिरा लागवड केल्यास लसणाच्या कंदाचा आकार कमी होतो, वजन कमी भरते. परिणामी उत्पादनात घट होते.

- लसणाची लागवड सपाट वाफ्यात केली जाते. जमिनीच्या उताराप्रमाणे ४ बाय २ किंवा ३ बाय २ मीटर अंतराचे सपाट वाफे तयार करावेत. जमिनीचा उतार जास्त असल्यास लहान आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. जमीन सपाट असल्यास १.५ ते २ मीटर रुंद व १० ते १२ मीटर लांब सरी वाफे तयार करावेत.

- निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात रुंदीशी समांतर १५ सेंमी अंतरावर खुरप्याने रेषा पाडून त्यात १० सेंमी अंतरावर पाकळ्या उभ्या लावून कोरड्या मातीने झाकाव्यात.

खत व्यवस्थापन ः

- माती परीक्षणानुसार नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो आणि पालाश ५० किलो प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी नत्राची अर्धी मात्रा (हेक्टरी ५० किलो) आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा लागवडपूर्वी द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा लागवडीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी तीन समान हप्त्यांत विभागून द्यावी.

- लागवडीनंतर ६० दिवसांनी नत्र खताची मात्रा देऊ नये. कारण त्यामुळे उत्पादन व साठवणुकीवर विपरीत परिणाम होतो.

- लसूण हे पीक गंधकयुक्त खतास चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे लागवड करण्यापूर्वी हेक्टरी ५० किलो गंधक जमिनीत मिसळावे.

पाणी व्यवस्थापन ः

लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर पहिले पाणी लगेच द्यावे. दुसरे पाणी त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी द्यावे. त्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुरानुसार सिंचन करावे. लसणाची मुळे जमिनीत १५ ते २० सेंमीपर्यंतच्या थरात असतात. त्यामुळे वरच्या थरात कायम ओलावा असणे आवश्यक आहे. पिकास जास्त पाणी किंवा पाण्याचा ताण किंवा वाफ्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

आंतरपीक पद्धती ः

लसूण पिकामध्ये वाफ्यांच्या वरंब्यावर कोबी, कोथिंबीर किंवा मुळा इत्यादी कमी कालावधीच्या पिकांची लागवड करता येते. तसेच लसणाची आंतरपीक म्हणून ऊस, मिरची, फळबागांमध्ये देखील लागवड करता येते.

आंतरमशागत ः

- लागवडीनंतर सुरुवातीच्या दीड महिन्यात पिकात मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी खुरपणी करून तणनियंत्रण करावे.

- कंद वाढायला सुरुवात झाल्यानंतर खुरपणी करताना कंदांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणून उशिरा खुरपणी करू नये.

- लागवडीनंतर अडीच महिन्यापर्यंत म्हणजे कंद भरायला सुरुवात होण्याच्या काळात पिकाला मातीची भर द्यावी. त्यामुळे कंदाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.

---------------

- डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७ ९१११५

(उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com