Cotton Residue Management : कापूस पीक अवशेष व्यवस्थापनाचे तंत्र

Post Harvest Management : सध्या कापूस पिकाची काढणी शेवटच्या टप्प्यात आहे किंवा पूर्ण झाली आहे. या कापूस पिकाच्या उर्वरित अवशेषाची (पऱ्हाटी) विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या आहे.
Cotton Residue Management
Cotton Residue Management Agrowon
Published on
Updated on

रामकृष्ण जी. आई., आर. एम. रामटेके, मनीष पांडव, अर्जुन तायडे

सध्या कापूस पिकाची काढणी शेवटच्या टप्प्यात आहे किंवा पूर्ण झाली आहे. या कापूस पिकाच्या उर्वरित अवशेषाची (पऱ्हाटी) विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या आहे. सध्या या अवशेषांवर केल्या जाणाऱ्या जाळण्यासारख्या प्रक्रियांमुळे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच कापूस पिकाच्या अवशेषांचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करण्यांच्या काही पद्धतींची माहिती घेऊ.

कापूस पिकाच्या अवशेषांचे महत्त्व :

कापूस पिकाचे अवशेष हे खनिज आणि सेंद्रिय पदार्थांचे एक समृद्ध स्रोत आहेत. यामध्ये नत्र, स्फुरद, पोटॅश, सेंद्रिय कर्ब आणि इतर अनेक पोषक तत्त्वे असतात. या अवशेषांचे योग्य व्यवस्थापन केल्यास होणारे फायदे पुढील प्रमाणे...

- मातीची सुपीकता वाढवणे : कपाशीच्या अवशेषांमध्ये असलेले पोषक तत्त्वे मातीमध्ये मिसळल्याने मातीची सुपीकता वाढते. पिकांची वाढ चांगली होते.

- पाणी धारण क्षमता वाढते : अवशेषांमुळे मातीची रचना सुधारून जलधारणक्षमता वाढते.

- मातीचा तापमान नियंत्रित करते : अवशेषांमुळे मातीचे तापमान उन्हाळ्यात कमी आणि हिवाळ्यात जास्त राहण्यास मदत होते.

- तणनियंत्रण : अवशेषांमुळे तणांची वाढ कमी होते.

- मातीची धूप रोखणे : अवशेषांमुळे मातीची धूप कमी होते.

- सेंद्रिय खताची निर्मिती : अवशेषांचा उपयोग सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठी करता येतो.

कापूस अवशेष व्यवस्थापनातील समस्या :

- लिग्निनचे जास्त प्रमाण : कापूस पिकाच्या अवशेषांमध्ये लिग्निनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्यांचे विघटन होण्यास वेळ लागतो.

- आगीचा धोका : शेतात पिकांचे अवशेष तिथेच जाळले जातात. त्यामुळे त्यातील महत्त्वाचे सेंद्रिय घटक जळून जातात. आजूबाजूंच्या अवशेषाला आग लागण्याचा धोका असतो.

- आर्थिक अडचणी : पिकांच्या व्यवस्थापनासाठीच मुळात आर्थिक चणचण असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पिकांच्या अवशेषांसाठी खर्च करण्याची अपेक्षा करणेही चुकीचे ठरते. बहुतांश शेतकरी या पिकांच्या वापर घरगुती जळणासाठी करतात.

Cotton Residue Management
Crop Residue Burning: मध्य प्रदेशात पीक अवशेष जाळल्यास होणार कारवाई

अवशेषांचे शास्त्रीय व्यवस्थापन

कापूस पिकाच्या अवशेषांपासून सेंद्रिय खत, बायोगॅस, इंधन, बायोचार, पल्प, पिलेट्स, पेपर आणि पार्टिकल बोर्ड इ. बाबी बनविणे शक्य आहे. या अवशेषांच्या शास्त्रीय व्यवस्थापनासाठी खालील पद्धती वापरता येतात.

अ) कापूस पीक अवशेष जमिनीत मिसळणे

यासाठी सामान्यपणे पुढील यंत्र किंवा अवजारांचा वापर केला जातो.

- मोबाईल श्रेडर : अवशेषांचे बारीक तुकडे करून जमिनीत मिसळण्यासाठी उपयुक्त.

- रोटाव्हेटर : अवशेष बारीक करून जमिनीत मिसळण्यासाठी उपयुक्त.

- डिस्क हॅरो : अवशेष कापून व अंशतः गाडण्यासाठी वापरले जाते.

ट्रॅक्टरचलित मोबाइल श्रेडरचा वापर ः

कापसाच्या शेतात जनावरे चारण्यासाठी सोडल्यास कपाशीचे उरलेली बोंडे जनावरे खाऊन ते पूर्णपणे नष्ट करतील. बाकी राहिलेल्या अवशेषांचे मोबाईल श्रेडरने बारीक तुकडे केल्यास त्यातील गुलाबी बोंड अळीच्या विविध अवस्था नष्ट होतात. बोंड अळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते.

ट्रॅक्टरचलित मोबाइल श्रेडर बारीक केलेल्या अवशेषांवर ट्रायकोडर्मा हर्जिनियम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी (पावडर फॉर्म्यूलेशन) ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर हा बारीक कुट्टी केलेला बायोमास वखराच्या साह्याने मातीत मिसळावा. ट्रायकोडर्मा फॉर्म्यूलेशनमुळे कपाशीच्या अवशेषांच वाढू शकणाऱ्या संभाव्य बुरश्यांना आळा बसतो. तसेच उपयुक्त बुरशींचे प्रमाण वाढते. अवशेषांच्या विघटन आणि जैव रूपांतराच्या प्रक्रियेतही त्यांची मदत होते. कपाशीच्या अवशेषांतून एकरी सुमारे २ टन बायोमास जमिनीत मिसळला जातो. त्यातून सुमारे २० किलो नत्र, २ किलो स्फुरद आणि १२ किलो पालाश जमिनीला परत मिळतो. अशा वापरामुळे दीर्घकाळात मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

Cotton Residue Management
Crop Residue Management : शेतातील पीक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी हरियाणातील शेतकऱ्यांना एकरी अनुदान

२. बायोचार

सामान्यत: कापूस वेचणीनंतर उभ्या झाडांची (पऱ्हाटी) मजुरांकडून तोडणी करून इंधनासाठी वापरल्या जातात. काही शेतकरी ते शेतात पेटवून देतात. परिणामी कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढून प्रदूषणात भर पडते. ते कमी करण्यासाठी जमिनीतील शंकू आकाराच्या खड्ड्यात बायोचार निर्मिती करण्यात येते. एक एकर कपाशी क्षेत्रामधून सुमारे दोन टन पऱ्हाटी मिळतात. त्यापासून ५०० ते ६०० किलो बायोचार मिळतो. या बायोचार भुकटीमध्ये गांडूळ खत, शेणखत (५० किलो शेणखतामध्ये ५० किलो बायोचार) मिसळून ८० ते ९० दिवस सावलीत मुरू द्यावे. त्याचा वापर पुढे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी होऊ शकतो.

३. सेंद्रियखत तयार करण्याची पद्धत

पऱ्हाटी ६० टक्के, शेण २५ टक्के, सूक्ष्मजीव समुदाय (मायक्रोबिअल कन्सोर्शियम) १ टक्का हे सर्व घटक एकजीव करून त्याचा ढीग करावा. हा ढीग त्याच अवस्थेत ३० दिवस ठेवावा. त्यानंतर पलटी मारून पुन्हा ३० दिवस ठेवावा. याप्रमाणे ६० ते ८० दिवसांत उत्तम प्रतीचे जैविक खत तयार होते. एक टन पऱ्हाटीपासून सुमारे ६०० ते ७०० किलो कंपोस्ट उपलब्ध होतो. उत्तम कुजलेल्या आणि समृद्ध पऱ्हाटी कंपोस्टमध्ये सामान्य कंपोस्टिंगच्या तुलनेत अन्नद्रव्य जास्त असते. त्याच्या वापरामुळे मातीचे आरोग्य चांगले होते. रासायनिक खतांचा वापर देखील कमी होतो.

पर्यावरण संरक्षणासाठी शासकीय योजना ः

पऱ्हाटी व अन्य पीक अवशेषांच्या ज्वलनातून होणारे प्रदूषण ही मोठी समस्या ठरत आहे. त्यावर मात करण्यासाठी म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांना पराटी व्यवस्थापनासाठी आवश्यक यंत्रे खरेदी करण्यासाठी कर्जाची उपलब्धता करणे आणि आवश्यक ते अनुदान देण्याची आवश्यकता आहे. दिल्लीमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने पंजाब व अन्य प्रांतामध्ये पिकांचे अवशेष जाळण्यावर बंदी घालण्यासाठी त्या सरकारांना त्या संदर्भात कठोर नियमावली करण्याचे आदेश पारीत केले आहेत. अवशेषातून तयार झालेल्या पर्यायी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण :

- शेतकऱ्यांना पऱ्हाटी व्यवस्थापनाच्या पर्यायी पद्धतींबद्दल जागरूक करणे.

- यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे.

संशोधन आणि विकास :

पऱ्हाटी व्यवस्थापनाच्या अधिक प्रभावी पद्धती शोधण्यासाठी संशोधनाची आवश्यकता.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

निष्कर्ष :

कापूस पिकाच्या अवशेषांचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन पराठीचे योग्य व्यवस्थापन करावे. यामुळे मातीची सुपीकता वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल.

शिफारस :

- शेतकऱ्यांनी मोबाइल कॉटन श्रेडर आणि ट्रायकोडर्मा फॉर्म्यूलेशनचा वापर करून अवशेषांचे जलद विघटन करावे.

- शासनाने शेतकऱ्यांना पऱ्हाटी व्यवस्थापनाच्या पर्यायी पद्धतींबद्दल जागरूकतेसाठी प्रचार यंत्रणा राबवावी.

- शासनाने शेतकऱ्यांना आधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध करण्यासाठी अनुदानपर योजना राबवाव्यात.

रामकृष्ण जी.आई., ८३०८३५९६१७

(वरिष्ठ शास्त्रज्ञ, केन्द्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com