
अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः जिल्ह्यातील कृषिपंपांसाठी विजेची वाढती गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषिपंप (Solar pump) योजनेअंतर्गत जमीन धारणा क्षेत्राची कोणतीही अट न ठेवता गरजू शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तत्काळ सौर कृषिपंप द्यावेत. पावसाच्या दीर्घ खंडामुळे ताण बसलेल्या पिकांच्या सिंचनासाठी कृषिपंपांना नियमित अखंडित वीज पुरवठा करावा, आदी मागण्या भाजपच्या किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या.
जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषिपंपाचा पुरवठा सुरु करावा. अल्पभूधारक शेतकऱ्यांना केवळ ३ एचपी क्षमतेच्या पंपाची अट न टाकता शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे पुरवठा करावा. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील सिंचन स्त्रोतांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. परंतु महावितरणकडून कृषिपंपांना नियमित अखंडित वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही सिंचन क्षेत्रात वाढ होत नाही.
यंदा ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाचा दीर्घ खंड पडला. जमिनीतील ओलावा नष्ट झाल्यामुळे अनेक भागातील सोयाबीनसह पिके करपली आहेत. खरीप तसेच अन्य पिकांना पाण्याची गरज आहे. पाणी उपलब्ध आहे. परंतु वीज पुरवठा सुरळीत राहात नसल्यामुळे पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके वाळत आहेत. परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह, पिंपळगाव ठोंबरे, सिंगणापूर, वझुर, ब्राम्हणगाव या गावातील ३३ केव्ही उपकेंद्र तसेच परभणी येथील १३२ केव्ही केंद्रावरून पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा होत नाही. अतिरिक्त वीज वापर होत असल्याने पुरवठा सुरळीत होत नाही. जायकवाडीच्या लाभक्षेत्रामुळे या भागातील पाणी पातळी वर आहे. परंतु बागायतदार शेतकऱ्यांचे विजेअभावी प्रचंड नुकसान होत आहे, अशी व्यथा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर यांच्यासह शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.