सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस एकरांत फळबाग

सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस एकरांत फळबाग
सौर पंप तंत्राद्वारे फुलतेय तेवीस एकरांत फळबाग
Published on
Updated on

डोर्ले (ता. जि. रत्नागिरी) येथील अजय तेंडूलकर यांनी आपल्या २३ एकरांतील आंबा, काजू, सुपारी व नारळ बागेत सौरपंप तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सध्या बागेत चार युनिटस उभी आहेत. त्या माध्यमातून एकसमान व अखंडित पाणी देणे व वेळेत मोठी बचत करणे शक्य होत आहे. सौरपंप उभारणी करणारे तेंडूलकर हे जिल्ह्यातील पहिलेच शेतकरी ठरले असून चार शेतकऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले आहे. रत्नागिरी शहरापासून सुमारे तीस किलोमीटरवर डोंगराळ भागात सुमारे एक हजार लोकसंख्येचे डोर्ले गाव वसले आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय भातशेती आणि मजुरी हाच आहे. आंबा विक्रीचा पारंपरिक व्यवसायही काही कुटुंबीय करतात. गावातील अजय तेंडूलकर यांनी युवा व प्रयत्नवादी शेतकरी अशी ओळख पंचक्रोशीत तयार केली आहे. त्यांचे वडिल रविंद्रनाथ मुंबईत खासगी कंपनीत नोकरीस होते. त्यामुळे हे कुटूंब मुंबईत स्थायिक झाले होते. जोडीला केटरिंगचा व्यवसायदेखील सुरू होता. कंपनी बंद झाल्याने रविंद्रनाथ यांची नोकरी सुटली. घरचा हा व्यवसाय अजय यांनी काही काळ सुरू ठेवला. मात्र शेतीचीच अधिक आवड असल्याने २००५ मध्ये मुंबई सोडून ते आपल्या गावी परतले. जमिनीचा विकास

  • शेती करण्याची उमेद असली तरी वडिलोपार्जित क्षेत्र नव्हते. मात्र ओसाड कातळ विकत घेऊन तेथे शेती विकसित करण्याचा निर्धार केला. त्यासाठी जनता बँकेकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले.
  • जमिनीचे ‘लेव्हलिंग’ केले. ती लागवडयोग्य बनवली. त्यानंतर आंबा, काजू, नारळ, सुपारी आदी फळपिकांची लागवड केली. त्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेद्वारे एक लाख रुपयांचे अनुदान मिळाले. बँकेचे हप्ते सुरू झाले. मदतीला कोणीच नसल्यामुळे स्वतः कष्ट करून बाग फुलवण्यास सुरुवात झाली. जे मिळेल ते खाऊन शेती विकसित करण्याच्या ध्यासापोटी अजय यांनी जिद्दीने पावले उचलली.
  • सौरपंप तंत्राचा वापर कातळ जमिनीवर बागायती विकसित करण्यासाठी पाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा होता. वीजभार नियमनाची समस्या होती. शिवाय दर सोमवारीदेखील वीज नसायची. अशात २०१६ मध्ये महावितरणचे अधिकारी प्रभाकर पेटकर यांची भेट झाली. कृषी अधिकारी श्री. नडगिर यांचेही मार्गदर्शन मिळाले. दरम्यान टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी करणेही सुरू होते. त्याचवेळी गावाजवळी सोळा एकर जमीन खरेदी केली. पाण्यासाठी विजेचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्याला किमान पाच वर्षे लागली असती. अशावेळी सौर पंप तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरला. त्यासाठी साडेचार लाख रुपये गुंतवणूक गरजेची होती. मात्र अटल सौर पंप योजनेच्या मदतीमुळे साडे बावीस हजार रुपयांचीच गुंतवणूक झाली. बागेत सौरपंप पॅनेल बसले. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारे अजय हे जिल्ह्यातील पहिले शेतकरी ठरले. सुमारे २३ एकरांत सौरपंप तंत्रज्ञान सध्या एकूण २३ एकरांत सौरपंपाचे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण चार युनिटस बसवण्यात आली आहेत. दिवसाला तीन किलोवॅट विजेची निर्मिती होईल अशी पॅनलची क्षमता आहे. याद्वारे सध्या तीन एचपी क्षमतेच्या पंपातून सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाणी उपसा केला जातो. बागेत ‘ड्रीप’ ची व्यवस्था केली आहे. त्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च केले आहेत. त्यासाठी साडे ३२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. प्रत्येक झाडाला ड्रीपद्वारे किमान अर्धा तास पाणी पुरेल अशा प्रकारे कातळावरील झाडांचे व्यवस्थापन केले आहे. सध्या आंब्याची जुनी व नवी मिळून २२०० झाडे आहेत. नारळाची ७००, सुपारीची ३०० झाडे आहेत. वर्षाला सुमारे दोनहजार पेटी आंबा वाशी, मुंबई, पुणे बाजारात विक्रीस जातो. ४७८ किलो काजूबी ची विक्री करण्यात आली आहे. नारळाच्या तीनशे झाडांपासून उत्पादन सुरू आहे. शहाळी विक्रीवर भर असतो. प्रति शहाळ्याला वीस रुपयांचा दर मिळतो. रत्नागिरी शहरातील अनेक विक्रेत्यांना त्यांचा पुरवठा होतो. चार शेतकऱ्यांकडून तंत्राचे अनुकरण अजय यांच्या सौरपंप तंत्राचा वापर गावातील अन्य शेतकऱ्यांसाठी पथदर्शक ठरला. त्यातून चार शेतकऱ्यांनी आदर्श घेत सौरपंप तंत्रज्ञान आपल्या बागेत उभारले आहे. त्यातून सुमारे २५ एकर क्षेत्राला विनाखंडीत पाणी मिळणे शक्य झाले आहे. सुनील रमाकांत कबीर, अनंत गुणाजी दैत, दिवाकर नार्वेकर, रवींद्र बाळकृष्ण तेंडूलकर अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. येत्या काळात डोर्ले हे सौरपंपाचं गाव म्हणून जिल्ह्यात ओळखले जाऊ शकेल. सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन

  • फळबागांसाठी सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर होतो. गावाशेजारील धनगरवाड्यावरून लेंडी विकत घेवून त्यापासून कंपोस्ट खत बनवण्यात येते. वर्षाला सुमारे २० ते २५ टन त्याचे खत तयार होते.
  • शेतकऱ्यांकडूनही त्याची खरेदी होते. खाडी किनारी असलेल्या खाऱ्या जमिनीच चार एकरांत नारळाची लागवड करण्याचे धाडस अजय यांनी केले आहे. त्यसाठीही सौरपॅनेल्सचा लाभ मिळत आहे.
  • काजूची नर्सरीही त्यांनी विकसित केली आहे. आपल्या शेतीतून वर्षभर आठ कामगारांना कायम रोजगार त्यांनी दिला आहे.
  • संपर्क - अजय तेंडुलकर - ९७६७५६८६९३  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com