Farm Mechanization : अल्पभूधारकांना मिळावा त्रिकीकरणाचा लाभ

महाराष्ट्रात कृषी विभागाने यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सुमारे ३२० कोटी रुपयांचे अनुदान वाटप करून देशात आघाडी घेतली.
Farm Mechanization
Farm MechanizationAgrowon

योगेश पाटील

महाराष्ट्रात कृषी विभागाने यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सुमारे ३२० कोटी रुपयांचे अनुदान वाटप करून देशात आघाडी घेतली. खरं तर दिवसेंदिवस मजुरांची वाढती समस्या, पारंपरिक अवजारांच्या कार्यक्षमतेवरील मर्यादा, शेती कसताना ऐनवेळेस उद्भवणाऱ्या विविध अडचणी, मजुरांपोटी चुकणारे पीक नियोजन आणि त्यामुळे होणारा आर्थिक मनस्ताप ही शेतकऱ्यांच्या क्लेशाची मोठी कारणे आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतीत यंत्राचा वापर करणे हे अपरिहार्यपणे आलेचं. परंतु ही यंत्रे व अवजारे अजूनही सामान्य म्हणा वा त्यापेक्षा चांगले शेतकरी असू देत, यांच्या पूर्ण आवाक्यात आलेली नाहीत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत कृषी यंत्रांची खरेदी किंमत व त्यांच्या देखभालीसाठी येणारा खर्च हा त्यातला मुख्य अडसर ठरतो. याप्रसंगी कृषी विभागाने शेतीत यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी वाटप केलेलं अनुदान स्वागतार्ह पाऊल आहे.

परंतु प्रश्न इथचं संपतो का? मी आज जेव्हाही माझ्या वडिलांना विचारतो, ‘‘बाबा, आपण शेती घरी का कसत नाही, ठरावीक रक्कम घेऊन दुसऱ्यांना कसायला का देतो?’’ यावर ते नेहमी ठरलेलं उत्तर देतात... ‘‘अरे, शेती करण्यासाठी आपल्याकडे बैलजोडी नाही वा कुठली अवजारे नाहीत, नवीन यंत्र पाहतोय ना तू... लाख लाख आणि दोन दोन लाखाच्या घरात आहेत आणि मला सांग, आपल्या दोन एकर जमिनीसाठी एवढे पैसे गुंतवायला पुरतात का आपल्याला? मजुरांची समस्या तर तू तुझ्या डोळ्यांनी बघतच आहेस.’’

वडिलांच्या या उत्तरावर मला काही उपायही सुचत नाही कारण शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपण यावर अनुदान मिळवू शकतो, असं त्यांना अगदी विश्वासाने सांगण्यास मन धजावत नाही. याची कारणे आपण गावाकडे राहिल्यानंतर सहज लक्षात घेऊ शकतात. ग्रामीण भागात सध्या अशी परिस्थिती आहे की आपलं गाव कोणत्या कृषी साहाय्यकांच्या अखत्यारीत येतं, यापासून बहुतांश शेतकरी अनभिज्ञ आहेत.

तालुका कृषी अधिकाऱ्यांची गावाला किंवा शेतकऱ्यांना ओळख असणे हा दूरचा विषय. बहुतांश वेळा तालुकास्तरावर चांगलं प्रस्थ असणारे किंवा राजकारणाची किनार लाभलेल्या शेतकऱ्यांसोबत, १०-१५ एकराचा नंबर असणाऱ्या (त्यातल्या त्यात ज्यांची जमीन ओलिताची आहे) कास्तकारांसोबत, गावात सरकारी कागदपत्रे इकडे तिकडे फिरवण्यात पटाईत असलेल्या नवख्या नेत्यासोबत आणि मग सहानुभूती जपण्यासाठी दोन-चार गरजू शेतकऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचा जवळचा संबंध येत असतो.

याला काही अपवादही आहेत. त्यामुळे साहजिकचं कृषी विभागाची कुठली योजनाही असेल तर तिची पोहोच ही वर उल्लेख केलेल्या आघाडीवर असलेल्या कृषी कार्यकर्त्यां पर्यंतच मर्यादित राहते. अशावेळी खरी टार्गेट पॉप्युलेशन विसंगतीत बाजूला पडते. अगदी याचं तत्त्वावर कृषी यांत्रिकीकरणावरील शासकीय अनुदान विस्तारित होते, असे वाटते. मोठ्या शेतकऱ्यांची बँकेत चांगल्या प्रकारे पत असते, त्यांना फार आडकाठी न येता अवजारांवर किंवा यंत्रांवर कर्ज सहज उपलब्ध होते. परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बाबतीत हे चित्र आपल्याला दिसत नाही.

महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास ७५-८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांना शेतीकामात यांत्रिकीकरण आणण्यासाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध असणाऱ्या यंत्रांवरच अवलंबून राहावे लागते. एकतर कमी क्षेत्रफळासाठी वापरासाठी आणि किमतीत किफायतशीर बसतील अशा सयुक्तिक उद्दिष्टे ठेवून या यंत्रांची निर्मितीचं होत नाही किंवा स्थानिक पातळीवर विकसित झालीही तरी मर्यादित प्रचार-प्रसारामुळे त्यांची व्याप्ती फारशी वाढत नाही. त्यातल्या त्यात बडे शेतकरी अनुदानाच्या पंक्तीत पहिलाच नंबर लावतात. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना तोंड आ वासून पाहावे लागते किंबहुना त्यांच्या पर्यंत त्या गोष्टीची बातमीच पोहचत

नाही.याबाबतीत कुठं तरी सकारात्मक विचार आणि कृती होणे गरजेचे आहे. पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि त्यापुढे काढणीपश्चात प्रक्रियांसाठी छोट्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी खर्चात बसणारी यंत्रे निर्माण होणे आणि त्यांना शासकीय अनुदानाच्या चौकटीत बसवून अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले तर खरंच हे कार्य कृषी यांत्रिकीकरण आणि त्याच्या विस्तारातील एक मैलाचा दगड ठरेल.

- योगेश पाटील, कृषी पदवीधर, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

: ७५१७२८७६८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com