करडई हे रब्बी हंगामात (Safflower Rabi Crop) घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक (Oil Seed Crop) आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून करडई पिकास (Safflower Crop) ओळखले जाते. लागवडीनंतर पिकास पाण्याचा ताण पडला तरीदेखील पिकावर त्याचा जास्त परिणाम होत नाही.
करडई झाडाचा प्रत्येक भाग जसे खोड, पाने, फुले, बिया उपयुक्त असते. त्यांचा उपयोग सुगंधी तेलनिर्मिती, कपड्यांना दिल्या जाणाऱ्या रंगाच्या निर्मितीमध्ये केला जातो. हृदयासंबंधीचे आजार टाळण्यासाठी करडई तेल आरोग्यदायी असते.
जमीन ः
मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी.
पेरणीची वेळ ः
- पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. बागायत करडईची पेरणी ऑक्टोबरअखेरपर्यंत करावी.
बियाणे ः
हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते.
पेरणीचे अंतर ः
- कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळींत ४५ सेंमी व झाडांमध्ये २० सेंमी अंतर ठेवावे.
बीजप्रक्रिया ः
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझेटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास चोळावे.
सुधारित वाणाची निवड ः
वाणाचे नाव---कालावधी (दिवस)---उत्पादन क्विं./हे----वैशिष्ट्ये
१) पी.बी.एन.एस.-१२---१३५ ते १४०---१२ ते १५---मराठवाडा विभागासाठी, मावा किडीस सहनशील
२) पी.बी.एन.एस.-४०---११८ ते १२८---१२ ते १५---बिन काटेरी वाण, भारतभर लागवडीस योग्य
३) नारी-६---१३० ते १३५---१० ते १२---बिन काटेरी वाण, पाकळ्यासाठी योग्य
४) फुले कुसुमा---१३० ते १३५---कोरडवाहू १४ ते १६, बागायती २० ते २२---संरक्षित पाण्याखाली लागवडीस योग्य
५) एस.एस.एफ ६५८---११५ ते १२०---१२ ते १३---बिन काटेरी वाण, पाकळ्यासाठी योग्य
६) पूर्णा---१२० ते १३०---१२ ते १५---००
७) अकोला पिंक---१३० ते १३५---१२ ते १५---००
८) नारी-एन.एच.१---१३० ते १३५---१८ ते २०---संकरित बिनकाटेरी वाण
९) नारी-एन.एच.१५---१३० ते १३५---२० ते २३---मावा किडीस सहनशील
खत व्यवस्थापन ः
कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो एस.एस.पी.) प्रति हेक्टरी प्रमाणे देण्याची शिफारस आहे. ही खते पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. बागायती करडई पिकास ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
विरळणी ः
करडई उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून जोमदार रोपे ठेवावीत. दोन रोपांत अंतर २० सेंमी ठेवावे.
आंतरमशागत ः
पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने पहिली कोळपणी करावी. त्यानंतर ५ व्या आठवड्यात दुसरी कोळपणी अखंड पासेच्या कोळप्याने करावी.
- संजय बडे, ७८८८२९७८५९
(सहायक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग,
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, जि. औरंगाबाद)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.