Rain Measuring Equipments : पावसाचे प्रमाण मोजण्याची उपकरणे

Rain Gauges : हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पर्जन्यमापकाच्या साह्याने किती पाऊस पडला, याचे मोजमाप केले जाते. मात्र अशा पर्जन्यमापकांची संख्या एकूण गावांच्या संख्येच्या तुलनेमध्ये मर्यादित असल्यामुळे एखाद्या मंडलातील पावसाचे प्रमाण सांगताना अनेक अडचणी येतात.
Rain Measuring Equipments
Rain Measuring EquipmentsAgrowon

विशाल पांडागळे, रविकिरण माळी

Rain Forecast : हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पर्जन्यमापकाच्या साह्याने किती पाऊस पडला, याचे मोजमाप केले जाते. मात्र अशा पर्जन्यमापकांची संख्या एकूण गावांच्या संख्येच्या तुलनेमध्ये मर्यादित असल्यामुळे एखाद्या मंडलातील पावसाचे प्रमाण सांगताना अनेक अडचणी येतात. हे टाळण्यासाठी आपल्या गावामध्येच नव्हे, तर आपल्या शेतामध्ये नेमका किती पाऊस पडला, हे आपल्याला अगदी साध्या उपकरणांद्वारे मोजता येते.

सध्या बहुतांश ठिकाणी पाऊस कमी अधिक पडत आहे. पेरणीयोग्य म्हणजेच किमान १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याची शिफारस कृषी विभाग व विद्यापीठातर्फे करण्यात आली होती. त्यामुळे काही ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागली. तर काही ठिकाणी झालेल्या अधिक पावसामुळे उगवून वर आलेली पिकांचे नुकसान झाले. पण हे पावसाचे प्रमाण बहुतांश शेतकरी अंदाजाने तपासतात. त्याऐवजी आपल्या शेत परिसरामध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अचूक पद्धतीने मोजण्यासाठी पर्जन्यमापक या उपकरणाचा वापर केला जातो. त्याचे एकक मेट्रिक पद्धतीत लिटर किंवा मिलिमीटर प्रति चौरस मीटर असे असते. तर ब्रिटिश पद्धतीत इंच प्रति चौरस फूट हे एकक देखील वापरले जाते. पर्जन्यमापक (रेनगेज) हे जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाच्या विशिष्ट बिंदूवरील व वेळेनुसार पर्जन्यमानाची खोली मोजण्याचे उपकरण आहे.

Rain Measuring Equipments
Rain Gauge : पाऊस मोजण्याची यंत्रे वाढविणार ः मंत्री पाटील

पर्जन्यमापक उपकरणाचे दोन प्रकार आहेत -

१) नोंदणीविना (नॉन रेकॉडिंग) पर्जन्यमापक ः

हा पर्जन्यमापक सर्वत्र वापरला जातो. या पर्जन्यमापक उपकरणामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाची खोली मोजता येत असली, तरी पावसाची वेळ नोंदवली जात नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याची निरीक्षणे २४ तासांच्या शेवटी माणसांद्वारे नोंदवली जातात. मात्र अतिवृष्टीच्या काळात त्यापेक्षा कमी काळात पडलेला पाऊस मोजावा लागतो. या पर्जन्यमापकात जमा झालेले पावसाचे पाणी हे कॅनमध्ये गोळा होते. ते मार्किंग केलेल्या मोजमात्राने मोजले जाते. हे सायमन पर्जन्यमापक अत्यंत लोकप्रिय असून, पाणलोट क्षेत्रातील पावसाची खोली मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यामध्ये १२.७ सेंटिमीटर चक्राकार व्यासाचे पात्र असून, त्यावर तितक्याच व्यासाचे नरसाळे (फनेल) असते. नरसाळे चक्राकार व्यासाच्या पात्रावर अशा प्रकारे ठेवले जाते. तेवढ्या व्यासावर पडणारे सर्व पावसाचे पाणी बाटलीमध्ये जमा होईल. हे उपकरण धातूच्या आवरणाने झाकलेले असते. याची उभारणी जमिनीच्या पृष्ठभागापासून ३०.५ सेंटीमीटर उंचीवर उभ्या पद्धतीने दगडी पायावर केली जाते. या उपकरणात पाण्याने बादली पूर्ण भरली असता १.२५ सेंटिमीटर पावसाची खोली मोजली जाते. या उपकरणाद्वारे पावसाची गणना दिलेल्या कालावधीसाठी कॅलिब्रेटेड जारच्या साह्याने करतात. त्यावरील नरसाळे हे सहसा आजूबाजूला पडणाऱ्या पावसाचे शिंतोडे त्यात येऊ नयेत, यासाठी उंच स्थानावर धरले जाते. नियमित दिवशी सकाळी साडे आठ वाजता पावसाचे पाणी मोजले जाते. या उपकरणात पावसाचे प्रमाण मोजले जात असले तरी पावसाची तीव्रता व कालावधी कळू शकत नाही. म्हणजेच पाऊस कधी सुरू झाला आणि थांबला, याची नोंद अचूकपणे होत नाही. हे उपकरण आपल्याला घरच्या घरी तयार करता येते. फारसा खर्च येत नाही.

Rain Measuring Equipments
Rain Update : पावसाचे सजीवसृष्टीवर होणारे विविध परिणाम

पावसाचे मोजमाप करताना घ्यावयाची खबरदारी
-पावसाचे मोजमाप करताना पर्जन्यमापक मोकळ्या जागेत उभारावा. जवळपासच्या झाडांपासून किंवा पाइपपासून दूर असावा.
- पर्जन्यमापकाच्या सर्व बाजू हवामानाच्या संपर्कात असायला हव्यात.
- पर्जन्यमापकाचा आतील भाग साफ ठेवावा. तो दररोज एकाच वेळी रिकामा केला गेला पाहिजे.

२) नोंदणी करणारा (रेकॉडिंग) पर्जन्यमापक
रेकॉडिंग प्रकारच्या पर्जन्यमापकाला स्वयंचलित, एकत्रित (इंटिग्रेटिंग) किंवा स्वयंनोंदक (सेल्फ रेकॉडिंग रेनगेज) असेही म्हणतात. हे स्वयंचलित उपकरण असून याद्वारे किती पाऊस पडला याच्या नोंदी घेतल्या जातात. यातही पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते. या उपकरणाद्वारे पावसाचे प्रमाण आणि त्याच्या कालावधीची नोंद एकाच वेळी होते.

रेकॉडिंग पर्जन्यमापकाचे तीन प्रकार पडतात.
अ) वजनाधारित पर्जन्यमापक ः

यामध्ये स्प्रिंग किंवा लिव्हर बॅलन्सच्या प्लॅटफॉर्मवर पावसाचे पाणी साठविण्याचे भांडे असते. पावसाचे थेंब नरसाळ्यामार्फत त्यात जमा होतात. त्याचे वजन मोजण्याची प्रक्रिया मुद्रित यंत्रणेशी जोडलेले असते. या मुद्रित यंत्रणेमध्ये रेनगेज पेन, घड्याळाच्या दिशेने फिरणारा ड्रम आणि रेनगेज चार्ट असतात. जसजसे पावसाचे पाणी त्या बादलीत गोळा होते, तसे पाण्याच्या वजनाने स्प्रिंग दबली जाते. त्याच्याशी संलग्न असलेला रेकॉडिंग पेन घड्याळाच्या दिशेने फिरणाऱ्या ड्रमवर लावलेल्या आलेखावर पावसाची खोली नोंदवत जातो. त्यामुळे पावसाचे संपूर्ण मोजमाप हे आपल्याला आलेखाच्या स्वरूपात प्राप्त होते.

ब) टिपिंग बकेट पर्जन्यमापक ः
या उपकरणामध्ये एक ३०० मि.मि.चे नरसाळे असून, त्यातून पावसाचे पाणी गोळा केले जाते. नरसाळ्याच्या खाली एक बादलीची जोडी निश्‍चित केलेली असते. या प्रत्येक बादलीची क्षमता पावसाचे पाणी ०.२५ मिलिमीटर जमा करण्याइतकी असते. पावसाच्या पाण्याने पहिली बादली पूर्ण भरताच ती खाली जाते व या पहिल्या बादलीची जागा ही दुसरी बादली घेते. पहिल्या बादलीतील पाणी हे खाली असलेल्या कॅनमध्ये जमा होते. हे ठराविक प्रमाण भरल्यानंतर एक इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे एक स्वयंचलित पेन कार्यरत होतो. आलेख कागदावर पावसाचे प्रमाण नोंदवतो. या उपकरणामुळे २४ तासांत पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण मोजता येते.

क) तरंगणारे पर्जन्यमापक ः
या पर्जन्यमापकाचे कार्य वजनाच्या बादली पर्जन्यमापक सारखे असते. नरसाळे आयताकृती कंटेनरमध्ये गोळा केलेले पाणी जमा करते. कंटेनरच्या तळाशी एक फ्लोट (तरंगणारा घटक) प्रदान केलेला असतो. कंटेनरमधील पाण्याची पातळी वाढल्यावर हा फ्लोट वाढतो. त्याची हालचाल घड्याळाच्या कामामुळे चालणाऱ्या रेकॉर्डिंग ड्रमवर फिरणाऱ्या पेनद्वारे रेकॉर्ड केली जात आहे.

ड) ऑप्टिकल पर्जन्यमापक ः
ऑप्टिकल पर्जन्यमापक हे एक आधुनिक यंत्र असून, त्याला लेसर डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर डिटेक्टर जोडलेले असतात. एका ठरावीक पातळीपर्यंत पाणी जमा झाल्यानंतर ते पाणी भांड्यात उलटले जाते. उलटणाऱ्या पाण्यामुळे भांड्यात लावलेली लेसर बीम कार्यान्वित होते. या लेसर बीममुळे यंत्रात फोटो डिटेक्टरच्या साह्याने पाण्याची नोंद केली जाते. सेन्सरमुळे हे यंत्र अचूक नोंद घेण्यासाठी प्रभावी व उपयुक्त मानले जाते.

विशाल पांडागळे, ९६२३६१६८०२
(विशाल पांडागळे हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला मृद्‍ व जल संधारण अभियांत्रिकी विभागात आचार्य पदवीचे विद्यार्थी असून, रविकिरण माळी हे अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पामध्ये वरिष्ठ संशोधनवेत्ता आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com