Sowing Machine : रुंद वरंबा सरी यंत्राचा योग्य वापर

Sowing Update : यंत्र रुंद वरंबा व सरी पद्धतीने टोकण करण्याकरिता बहुतांश पिकांकरिता उपयुक्त आहे.दोन ओळींमधील आणि बीजामधील अंतर हे आवश्यकतेनुसार बदलता येते. प्रत्येक पिकांकरिता वेगवेगळ्या बीजाच्या चकत्या आहेत. सहजपणे बदलता येतात. प्रति हेक्टर बीज व खताची मात्रा ठरवता येते.
Sowing Machine
Sowing MachineAgrowon

Sari Yantra : रुंद वरंबा व सरी टोकण (बीबीएफ) यंत्राच्या साह्याने पेरणी केली असता १० ते २० टक्के उत्पादनात वाढ व बियाण्याची बचत होते. कारण या यंत्राच्या साह्याने वरंब्यावर पेरणी केली जाते. तसेच पेरणीच्या ओळीच्या बाजूने सरी केल्यामुळे पाणी मुरण्यास मदत होते.

हे यंत्र ट्रॅक्टरचलित असून, यंत्राच्या साह्याने कापूस, सोयाबीन, मका, तूर, भुईमूग, कांदा, उडीद, मूग, ज्वारी इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने वरंब्यावर पेरणी करण्याकरिता उपयुक्त आहे.

मुख्य सांगाडा

- यंत्राचा मुख्य सांगाडा चौकोनी आकाराचा आहे. सांगाड्याला खत व बीजपेटी, फण व इतर भाग जोडलेले आहेत.

- मुख्य सांगाडा खत व बीजपेटी वाहून नेण्याकरिता या यंत्रामध्ये समाविष्ट केलेला आहे.

खत व बीजपेटी

- पेटी लोखंडी पत्रापासून बनवलेली असून आकार चौकोनी आहे. पेटीचे खत व बियाणासाठी असे दोन मुख्य भाग आहेत.

- पेटीमध्ये स्वतंत्र बीज व खतपेटी स्वतंत्र फणासाठी असल्यामुळे आंतरपीक घेता येते.

- बियाण्याची तबकडी (प्लेट) पेटीच्या खालच्या बाजूला स्प्रिंग व नटाच्या साह्याने घट्ट बसवलेली आहे. खत नियंत्रणाकरिता खत पेटीच्या तळाशी एक लोखंडी पट्टी आहे. ही लोखंडी पट्टी खाली किंवा वर करण्याची व्यवस्था दिली असल्यामुळे खताची मात्रा नियंत्रित केली जाते.

Sowing Machine
Kharif Sowing : रुंद वरंबा- सरी पद्धतीने पेरणी

बियाण्याच्या तबकड्या

- आवश्यकतेनुसार विविध पिकांच्या टोकण करण्याकरिता स्वतंत्र अशा बीजाच्या तबकड्या या यंत्रामध्ये प्रत्येक बीजपेटीत लावाव्यात.

- या बीज तबकड्या प्लॅस्टिकच्या असून त्या वर्तुळाकार आहेत. त्यांच्या बाहेरच्या बाजूने वेगवेगळ्या खाचा आहेत.

- तबकडीच्या प्रत्येक खाचेमध्ये बीज येईल अशा प्रकारची संरचना आहे. या खाचेची संख्या बीजानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे दोन बियाण्यामधील अंतर सारखे राखता येते.

गती देणारी यंत्रणा

- जमिनीवरील चालणाऱ्या चाकापासून चेन व स्प्रॉकेटच्या साह्याने बीजपेटीतील तबकड्या बीज चकत्या फिरविण्यासाठी दिलेल्या आहेत. खतपेटीमधील बुशसुद्धा याच यंत्रणेने फिरतात.

- चाकाचे व बियाणे नियंत्रित करणाऱ्या तबकड्याच्या गतीचे प्रमाण १:१ एवढे आहे. म्हणजे चाक आणि बीज चकत्याची फिरण्याची गती एक समान ठेवली आहे.

खोली नियंत्रितकरणाची चाके

- यंत्राच्या दोन्ही बाजूंना, प्रत्येकी एक चाक यंत्रास दिले आहेत. या चाकाच्या अॅक्सलवर ५ सेंमी एवढ्या अंतरावर छिद्रे दिल्यामुळे यंत्राची उंची आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करता येते.

- यंत्र चालण्याची खोली नियंत्रित करून बीज मशागत केलेल्या मातीमध्ये किती खोलीपर्यंत टोकण करायचे त्याचा अंदाज बांधता येतो.

सरी यंत्र

सरी पडण्याकरिता यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक सरी पडण्याकरिता सरी यंत्र बसविलेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सरी पाडल्या जातात. दोन सरींमधील वरंब्यावर बियाण्याची ओळीमध्ये टोकण केली जाते.

आंतरमशागत यंत्र

यंत्राच्या साह्याने आंतरमशागत करता येते, त्यासाठी बीज टोकण यंत्राला मुख्य सांगाड्यापासून वेगवेगळे करून तेथील दात्याला जमीन उकरण्यासाठी स्वीप जोडता येते.

यंत्राने पेरणी करताना घ्यावयाची काळजी

- कुशल चालकाची निवड करावी. पेरणीसाठी पूर्वमशागत केलेली असावी.

- ट्रॅक्टरला जोडताना यंत्र जमिनीवर समतल जागी ठेवावे. सर्व दात्यांतील अंतर हे समान अंतरावर मुख्य सांगाड्यावर जोडावे. त्यामधील अंतर आवश्यकतेनुसार आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

- सरी पाडण्यासाठी दिलेले सरी यंत्र सांगाड्याच्या मध्यापासून समान अंतरावर आहे याची खात्री करावी.

- बियाणे व खताची पेटी एक तृतीयांश भरावे. बियाणे व खताची पेटी रिकामी झालेली नाही याची तपासणी करावी.

- पेरणी यंत्राचा वेग ३ ते ५ प्रति तासाच्या दरम्यान असावा, त्यामुळे सम प्रमाणात बीज व खत पेरणे साध्य होते.

- टोकण यंत्रामध्ये निश्‍चित केलेल्या पिकाच्या बियाण्यासाठी तबकडीची निवड करून बीजपेटीत योग्य ठिकाणी बसवून त्यावरील स्प्रिंग नट घट्ट करावा.

- खत नियंत्रण पट्टी आवश्यकतेनुसार उघडावी. जेणेकरून खत योग्य प्रमाणात टाकता येईल.

- पेरणी करताना खोली नियंत्रित करणाऱ्या चाकाच्या मदतीने पेरणी करण्याची खोली निश्‍चित करावी.

- बियाणे व खते योग्य खोलीवर पेरली जातात की नाही याची खात्री करावी.

- यंत्राला गती देणारे भाग जसे की चेन स्प्रॉकेट, गिअर हे व्यवस्थित फिरतात याची खात्री करावी.

- पेरणी चालू असताना ट्रॅक्टरला इतर कोणत्याही प्रकारची जोडणी करू नये.

- यंत्रास गती देणारी यंत्रणेचे भाग, जसे चेन स्प्रॉकेट, गिअर हे सरळ रेषेत आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

- सर्व पॉइंटला ग्रीस लावावे. नटबोल्ट घट्ट करावेत.

- पेरणी झाल्यानंतर खत व बीजपेटीमधून काढून घ्यावे. बीजपेटी, बीज वाहून नेणारी बीज नळी, बीजाच्या तबकड्या स्वच्छ कराव्यात.

- पेरणी केल्यानंतर यंत्र व्यवस्थितपणे झाकून शेडमध्ये ठेवावे.

Sowing Machine
BBF Machine : कमी पावसातही बीबीएफ पद्धतीने पेरणी देईल आधार?

यंत्राची वैशिष्ट्ये

- यंत्र रुंद वरंबा व सरी पद्धतीने टोकण करण्याकरिता बहुतांश पिकांकरिता उपयुक्त आहे.

- दोन ओळी आणि बियाण्यामधील अंतर आवश्यकतेनुसार बदलता येते.

- प्रत्येक पिकांकरिता वेगवेगळ्या बीजाच्या तबकड्या आहेत. तबकड्या सहजपणे बदलता येतात.

- प्रति हेक्टरी बीज व खताची मात्रा ठरवता येते.

- यंत्राच्या साह्याने सरी पाडल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाह हा काहीअंशी नियंत्रणात येतो. त्यामुळे पाऊस पडला असता जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते किंवा जास्त पाऊस पडला असता पाणी हे सरीमधून वाहून जाते.

- जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. पावसाचा खंड पडला असता पिकाच्या संवेदनशील वाढीच्या वेळेस काही दिवस पीक तग धरून राहते.

- पारंपरिक पद्धतीपेक्षा यंत्राच्या साह्याने पेरण्याच्या खर्चामध्ये ३० ते ४० टक्क्यांची बचत होते. यंत्राची कार्यक्षमता ०.३३ ते ०.३६ हेक्टर प्रति तास आहे.

- यंत्राच्या साह्याने आंतरमशागत करता येते. यंत्र वापरण्यास सोपे आहे.

- यंत्रामध्ये वेगवेगळ्या दात्यासाठी स्वतंत्र बीजपेटी असल्यामुळे आंतरपीक घेता येते. बियाणे व वेळेची बचत (२४ टक्के) होते.

संपर्क - वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४, (विषय विशेषज्ञ (कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी) कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com