Agriculture Implement : ट्रॅक्टरचलित अवजारांमुळे पेरणी, आंतरमशागत झाली सोपी

Agriculture Technology : जांब (ता.जि. परभणी) येथील रामकृष्ण राजाभाऊ रेंगे यांनी शेतीकामातील श्रम आणि वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. जमीन आणि पीक पद्धतीच्या गरजेनुसार प्रचलित ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये बदल केले.
Agriculture Implement
Agriculture ImplementAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : जांब हे परभणी जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव म्हणून ओळखले जाते. जांब येथील राजाभाऊ रेंगे यांच्या संयुक्त कुटुंबाची जांब आणि पारवा शिवारात २५ एकर मध्यम ते भारी प्रकारची जमीन आहे. सिंचनासाठी २ विहिरी तसेच संरक्षित सिंचनासाठी एक शेततळे केले आहे.

राजाभाऊ यांना तीन मुले आहेत. रामकृष्ण आणि संदीप हे दोघे कृषी विभाग आणि अरविंद हे भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत. राजाभाऊ रेंगे यांच्या मार्गदर्शनात रामकृष्ण १९९५ पासून घरच्या शेतीचे व्यवस्थापन करीत आहेत.

दरम्यानच्या काळात कृषी पदविका प्राप्त केल्यानंतर रामकृष्ण रेंगे २००४ मध्ये कृषी विभागात कृषी सहायक म्हणून रुजू झाले. सेवेत कार्यरत असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.

काही वर्षांपूर्वी रेंगे यांच्याकडे शेतीकामांसाठी दोन सालगडी तसेच दोन बैलजोड्या होत्या. परंतु शेतीकामांसाठी मजूर मिळत नसल्यामुळे २०१२ मध्ये ४५ एचपीचा ट्रॅक्टर खरेदी केला. मागील दहा वर्षांपासून रेंगे यांच्याकडे बैलजोडी नाही.

परंतु एक सालगडी कायम आहे. ट्रॅक्टरव्दारे शेतीकामे करताना काही मर्यादा येतात. मागच्या चाकांच्या टायरची सर्वसाधारण रुंदी १३.६ इंच असते. त्यामुळे पेरणी करताना जमीन दबते. टायरमुळे दबलेल्या ओळीतील बियाण्याची उगवण कमी होते. ही बाब सातत्याने निदर्शनास येऊ लागल्याने रेंगे यांनी त्यावर उपाय शोधला.

वाडवडिलांच्या काळात शेतीकामासाठी बैलचलित अवजारांचा वापर केला जात असे. त्यावेळी बैलगाडी तसेच विविध अवजारे ओढण्यासाठी विशिष्ट लांबीचे लाकडी जू वापरत असत. जू च्या कमी अधिक लांबीचे हे तंत्रज्ञान पेरणीच्यावेळी दोन ओळीमध्ये विशिष्ट अंतर राखण्यासह आंतरमशागत करताना एक किंवा अधिक कोळपे लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.

विशिष्ट लांबी असलेल्या जू मुळे पेरणी तसेच कोळपणीची कामे पिकांचे नुकसान न करता सहजरीत्या होत असत. या पारंपरिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन रेंगे यांनी प्रचलित ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये गरजेनुरूप बदल केले आहेत. यासाठी त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ डॉ. स्मिता सोळंकी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Agriculture Implement
Agriculture Implement : खरिपासाठी महिंद्राची रोटाव्हेटर श्रेणी उपलब्ध

आंतरपीक पद्धतीवर भर

रेंगे विविध आंतरपिकांची लागवड करतात. यामध्ये सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये विविध अंतरावर लागवडीचे प्रयोग रेंगे यांनी केले आहेत. सोयाबीनच्या चार ओळीमध्ये तुरीची एक ओळ (४ः१), सोयाबीनच्या पाच ओळींनंतर तुरीच्या दोन ओळी (जोड ओळ), सोयाबीनच्या ६ ओळींनंतर तुरीच्या २ ओळी आणि तुरीच्या दोन ओळींमध्ये सोयाबीनची १ ओळ या पद्धतीने लागवड केली जाते. आजवरच्या अनुभवातून त्यांना भारी जमिनीसाठी ५ः२ आणि मध्यम जमिनीसाठी ४ः१ ही आंतरपीक पद्धती स्वीकारली आहे.

बीजोत्पादन कार्यक्रम

रेंगे दरवर्षी कृषी विद्यापीठांच्या विविध वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम महाबीज मार्फत घेतात. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनचे एमएयूएस ६१२,एमएयूएस १६२ हे वाण, कमी कालवधीत येणारा जेएस ९३०५ हा वाण आणि तुरीचे बीडीएन ७११, बीएसएमआर ७३६ या वाणांचा समावेश आहे. रब्बी हंगामात हरभरा बीजोत्पादन घेतले जाते.

कृषिविषयक ज्ञानाची जिज्ञासा

कृषी सहायक म्हणून सेवा बजावत असताना रामकृष्ण रेंगे यांचा प्रयोगशील शेतकऱ्यांशी संपर्क आला. त्यांच्याकडून शेतीविषयक माहिती आणि तंत्रज्ञान आत्मसात केले. कृषी विद्यापीठ, देशभरातील कृषिविषयक संशोधन संस्थांना ते भेटी देतात. ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’तर्फे आयोजित प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.

सध्या रामकृष्ण हे परभणी येथील कृषी विभागाच्या कार्यालयात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार शेतकऱ्यांमध्ये करत असताना घरच्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांचा भर आहे.

दोन्ही बंधू नोकरी निमित्त बाहेर गावी असल्याने नोकरीतील कामांची जबाबदारी सांभाळून रामकृष्ण रेंगे यांनी शेतीचे चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. गरजेनुसार स्वतः ट्रॅक्टर चालवत मशागत, फवारणी आणि आंतरमशागतीचीही कामे करतात.

Agriculture Implement
Agriculture Implement Subsidy : सेस फंडातून ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार अवजारे

ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्रात बदल

पेरणी, आंतरमशागत, फवारणीची कामे सुलभरीत्या होण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागील चाकांना कमी रुंदीचे (९.५ इंच आकार) चाके लावली आहेत. मागील आणि पुढील चाकांची सरळ रेषेत जोडणी केली आहे. यासाठी ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकांची आतील बाजू बाहेर करून जोडणी केली. दोन चाकांच्या आतील अंतर ४६ इंच ठेवले.

प्रचलित ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्रामध्ये बदल केले. दोन्ही चाकांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५ इंच अंतर ठेवून पेरणीसाठी लोखंडी फण जोडले. या सुधारित पेरणी यंत्राव्दारे सलग ५ ओळी पेरता येतात.

त्यामध्ये चाकाच्या आतल्या बाजूने दोन ओळींतील अंतर १८ इंच ठेवून ३ ओळी पेरता येतात. चाकाच्या बाहेरच्या २ ओळींमध्ये २० इंच अंतर ठेवून पेरणी करता येते. या पद्धतीने सोयाबीनच्या ४ ओळींनंतर तुरीची १ ओळ पेरता येते. तसेच सलग सोयाबीनची पेरणी करत येते.

दोन ओळींतील अंतर २० इंच ठेवल्यामुळे ट्रॅक्टरची चाके पिकातून सहजरीत्या जातात. त्यामुळे फवारणी, कोळपणी कामे करताना पिकाचे नुकसान होत नाही.

चाकांच्या पाठीमागे रिजर बसवल्यास पिकांमध्ये छोटी सरी पेरणी किंवा कोळपणी करतेवेळी तयार करता येते. या सरीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. मूलस्थानी जलसंधारण होते.

जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळात पिकास पाण्याचा ताण पडत नाही. जास्त पाऊस झाला तर या सरीद्वारे अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. जमीन लवकर वापसा स्थितीत येते.

ट्रॅक्टरचलित सुधारित फवारणी यंत्र

रेंगे यांनी कमी खर्चात (२० ते २२ हजार रुपये) परभणी येथील वर्कशॉपमध्ये ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र तयार करून घेतले. ट्रॅक्टर चालकाच्या सीटच्या मागे एचटीटी पंप बसविला आहे. ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्ट आणि पंप यांना रबरी पट्ट्याने (बेल्ट) जोडले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर सुरू झाला की पंप कार्यान्वित होतो.

फवारणीचे द्रावण साठविण्यासाठी ट्रॅक्टरच्या पुढच्या बंपरवर टाकी (२०० लिटर क्षमता) बसविली आहे. आठ फूट लांबीच्या मुख्य लोखंडी फ्रेमला दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ८ फुटाच्या पट्ट्या पिनांव्दारे जोडल्या आहेत. त्यामुळे २४ फूट लांबीचा लोखंडी पट्ट्याचा सांगडा तयार होतो.

त्यावर १५ नोझल बसविले आहेत. हा सांगाडा १८० अंश कोनामध्ये उघड बंद करता येतो. यामुळे वाहतुकीला सोपे जाते. दोन नोझलमध्ये ४५ सेंमी अंतर ठेवले आहे. त्यामुळे एकाच वेळी सोयाबीनच्या १५ ओळींवर फवारणी करता येते.

पिकानुसार नोझल संख्या आणि अंतर कमी जास्त करता येते. ट्रॅक्टर बांधाजवळ गेल्यास सांगडाच्या बाजू बंद करता येतात. पिकांच्या उंचीनुसार योग्य अंतर ठेवून फवारणी करता येते. फवारणी यंत्र हाताळण्यास अतिशय सोपे आहे.

दीर्घकाळ कुठलाही देखभाल दुरुस्तीचा खर्च येत नाही. फवारणी यंत्राव्दारे दिवसभरात २५ एकर क्षेत्राची फवारणी शक्य आहे. लेबल क्लेमनुसार कीटकनाशक, तणनाशकाच्या द्रावणाचे प्रति एकरी योग्य प्रमाण राखता येते. त्यामुळे परिणामकारक फवारणी होत असल्याचे रेंगे यांचा अनुभव आहे. अल्प कालावधीमध्ये जास्त क्षेत्रावर फवारणी करता येते.

दोन्ही बाजूंच्या पट्ट्या काढल्यानंतर मुख्य फ्रेमचा कोळपणीसाठी वापर करता येतो. दिवसभरात १० ते १५ एकर क्षेत्राची कोळपणी शक्य होते. या लोखंडी फ्रेमवर खते, बियाणे पिशव्या ठेवून वाहतूक करता येते.

राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

रामकृष्ण रेंगे यांच्या आई सुमनबाई राजाभाऊ रेंगे यांना तुरीच्या बीएसएमआर- ७३६ या वाणाचे हेक्टरी २१ क्विंटल आणि सोयाबीनच्या एमएयूएस-७१ या वाणाचे हेक्टरी २२ क्विंटल उत्पादन घेतले होेते. याबद्दल केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे २०१६ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील कृषी कर्मण पुरस्काराने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

रामकृष्ण रेंगे ७८७५९८८६६८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com