Agriculture Mechanization : यांत्रिकीकरणाला अधिक चालना देण्याची आवश्यकता

कृषी यंत्रे आणि अवजारांच्या वापरामध्ये मोजकेच व मोठे शेतकरी आघाडीवर असल्याचा दावा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये मजुरांची उपलब्धता कमी होत चालल्यामुळे लहान आणि सामान्य शेतकरीही आधुनिक यंत्रे आणि अवजारांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे चित्र दिसत आहे.
Mechanization in Agriculture
Mechanization in Agriculture Agrowon

कृषी यंत्रे (Agriculture Machinery) आणि अवजारांच्या वापरामध्ये (Machinery Use) मोजकेच व मोठे शेतकरी आघाडीवर असल्याचा दावा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये मजुरांची उपलब्धता (Labour Shortage) कमी होत चालल्यामुळे लहान आणि सामान्य शेतकरीही आधुनिक यंत्रे (Modern Machinery) आणि अवजारांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात, त्यातील अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर (Tractor) किंवा मोठी यंत्रे नसली तरी भाडेतत्त्वावर का होईना, पण नांगरणी, कल्टिवेटर्स (Cultivators), वखर, पेरणी यंत्रे (Sowing Machinery), फवारणी यंत्रे, मळणी यंत्रे अशा अनेक यंत्रे अवजारांचा वापर वाढला आहे. गव्हासारख्या पिकामध्ये तर कंबाईन हार्वेस्टर गावपातळीपर्यंत वापरला जाऊ लागला आहे. यामध्ये शासनाची भूमिकाही महत्त्वाची आहे. कारण अनेक यांत्रिकीकरण योजनांद्वारे लहान मोठी यंत्रे, अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात आहेत. त्यातून यंत्रांचा प्रसार चांगलाच वाढला आहे. (Mechanization in Agriculture)

पुढील दशकांमध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करताना कृषी उत्पादनामध्ये दरवर्षी साधारण ३ टक्के वाढ आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कृषी ऊर्जा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने भारताने सन २०३० पर्यंत कृषी क्षेत्रामध्ये किमान ४ किलोवॉट प्रति हेक्टर इतकी शक्ती उपलब्ध करण्याचे ध्येय ठेवले आहे.

कृषी शक्तीचे विविध स्रोत आणि त्यातील बदलाचा आढावा ः

१) १९७० ते २०२१ या कालखंडात कृषी शक्तीच्या विविध स्त्रोतांचा सहभाग कसा बदलत गेला हे पाहणे उपयुक्त ठरेल. सर्वांत महत्त्वाचा बदल मनुष्य व पशुशक्तीच्या वापरात दिसून येतो. १९७० मध्ये मनुष्यशक्ती १६.०३ टक्के, तर पशुशक्ती ६०.३७ टक्के वापरली जात होती. मात्र २०२१ मध्ये ही टक्केवारी अनुक्रमे २.३ आणि ३० टक्के इतकी कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. भविष्यात ती आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२) ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विद्यूत मोटार आणि डिझेल इंजिन अशा कृषिशक्ती वापराचे वाढते प्रमाण हे त्या देशाची सुबत्ता दर्शविते. विकसित देशांमध्ये प्रति हेक्टरी ६ किलोवॉटपेक्षा जास्त शक्ती वापरली जाते. आपल्या देशामध्ये पंजाब राज्य यांत्रिकीकरणामध्ये आघाडीवर असून, तिथे ३ किलोवॉट /हेक्टर इतक्या कृषिशक्तीचा वापर होतो.

३) कोणत्याही देशात प्रति १००० हेक्टर क्षेत्रासाठी किती ट्रॅक्टर वापरले जातात, हा निर्देशांक महत्त्वाचा मानला जातो. भारतामध्ये हा निर्देशांक १२.१८ असून, महाराष्ट्रात तो ५.२९ इतका आहे. आघाडीवरील राज्ये पंजाब आणि हरियाना येथे अनुक्रमे ८२.४९ आणि ६२.८९ इतका आहे.

Mechanization in Agriculture
Farm Equipment: पारंपरिक ते अद्ययावत शेती अवजारे

भारतातील ट्रॅक्टर उद्योग ः

१) भारत हा जागतिक पातळीवरील मुख्य ट्रॅक्टर उत्पादक देशांपैकी एक आहे. भारतामध्ये वार्षिक सरासरी ८ लाख ते ९ लाख ट्रॅक्टरची विकी होते.

२) देशामध्ये पंचवीस पेक्षा जास्त ट्रॅक्टर कंपन्या आहेत. त्या पाच प्रकारच्या अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर्सची निर्मिती करतात. त्यामध्ये अ) २० अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी, ब) २१ ते ३० अश्वशक्ती, क) ३१ ते ६० अश्वशक्ती, ड) ६१ ते १०० अश्वशक्ती आणि १०० अश्वशक्ती पेक्षा जास्त असे प्रमुख गट आहेत.

३) त्यातही ४१ ते ६० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर्सकरिता मोठी मागणी आहे. एकूण ट्रॅक्टर निर्मितीच्या सुमारे ६० टक्के ट्रॅक्टर्स याच गटातील असतात.

४) भविष्यातील ट्रॅक्टरची वाढती मागणी लक्षात घेता प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात ट्रॅक्टर उत्पादनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आज भारत हा जगातील सर्वांत मोठा ट्रॅक्टर उत्पादक देश बनला आहे.

Mechanization in Agriculture
Blind Bull : अंध असूनही `सोन्या` करतोय शेती सेवा

यांत्रिकीकरणातील अडचणी ः

कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामध्ये वाढ होत असली तरी अद्याप देशातील अनेक भागांमध्ये शेतीमध्ये उपलब्ध कृषिशक्ती ही खूप कमी आहे. यांत्रिकीकरणामध्ये असलेल्या प्रमुख अडचणी पुढील प्रमाणे...

१) विविध हवामान आणि कमी जमीनधारणा.

२) शेतीमधून मिळणारे कमी निव्वळ उत्पन्न.

३) हंगामाचा ठराविक काळ वगळता उपलब्ध असणारे मजूर.

४) कृषी यंत्रसामुग्रीबाबत विश्वासार्हता व विक्रीपश्चात सेवेचा अभाव.

५) अपुरा व महाग इंधन आणि वीज पुरवठा.

६) ट्रॅक्टर / औजाराचा कमी वापर (३००-६०० तास/वर्ष)

यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी...

१) जमिनीचा वापर आणि जलव्यवस्थापन -

लोकसंख्येच्या दबावामुळे शेतीयोग्य जमिनी आणि चराऊ रानांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. भूजलाचे प्रमाण मर्यादित आहे. त्यामुळे जमिनीच्या वापरासंदर्भात योजना आखतानाच सूक्ष्मस्तरावरील जलव्यवस्थापनाची विचार केला पाहिजे. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियंत्रण, मूलस्थानी जलसंधारण यासोबतच सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा वापर इ. यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रे, अवजारे विकसित करण्याची गरज आहे.

२) कृषी शक्तीचा अधिक वापर -

कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध कृषी शक्ती वाढविणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी एकूण १.१८ किलोवॉट प्रति हेक्टर इतकी शक्ती उपलब्ध आहे. हे प्रमाण वाढवून २०३० पर्यंत किमान ४ किलोवॉट प्रति हेक्टर इतका नेणे अपेक्षित आहे. त्यासाठी अवजड कामाकरिता अतिरिक्त क्षमतेच्या यंत्रसामुग्रीचा वापर, कृषी निविष्ठांच्या अचूक वापराकरिता आधुनिक अवजारांचा उपयोग, आणि दोन किंवा अधिक कामे एकत्रित करणारी औजारे यांची निर्मिती व वापराला उत्तेजन द्यावे लागेल

३) पुरेसा पतपुरवठा

शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि यंत्रासाठी खर्च यांची सांगड सध्या घातली जात नाही. यांत्रिकीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पुरेसा पतपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. सध्या बॅंक आणि पतसंस्थांमार्फत केलेल्या जाणाऱ्या पतपुरवठ्याच्या अटी व निकषांमध्येही संशोधन आणि बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यामागील उद्देश हा लहान आणि मध्यम शेतकऱ्यांनाही यांत्रिकीकरणाच्या कक्षेत आणण्याचा असला पाहिजे. त्याच प्रमाणे अगदी दुर्गम भागापर्यंत भाडेपट्टीवरील यांत्रिक सेवासुविधा उभारण्याची आवश्यकता आहे.

४) शेतीमधील निव्वळ उत्पन्नात वाढ -

सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. अशा वेळी इंधनाची बचत करणारे ट्रॅक्टर, इंजिन यांच्या उपलब्धतेला मोठा वाव आहे. कार्यक्षम ऊर्जेचा वापर करणाऱ्या यंत्रसामुग्री व व्यवस्थापनामुळे पिकांचा उत्पादन खर्च कमी राखणे शक्य होईल. त्याचा फायदा निव्वळ उत्पन्न वाढण्यासाठी होऊ शकतो.

५) डिजिटल शेती -

शेतीक्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. उदा. सुपर कॉम्प्यूटर, उपग्रह, स्मार्ट उपकरणे, ड्रोन इ.

६) लघुउद्योगात संशोधन आणि विकासासाठी -

आज कृषी औजारांच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने लघुउद्योग आघाडीवर आहेत. अशा लघुउद्योगांमध्ये संशोधन व विकास कार्यक्रमाचा अभाव, अपुऱ्या निर्मिती सुविधा, मर्यादित कौशल्य इ. अडचणी भासत राहतात. त्यामुळे उत्पादनाची अपेक्षित गुणवत्ता राखण्यामध्येही समस्या येतात. त्यांना संशोधन आणि विकासामध्ये आवश्यक ते पाठबळ पुरवण्यासाठी योग्य त्या योजना राबविण्याची गरज आहे. तसेच आवश्यक वाटल्यास संघटित औद्योगिक क्षेत्रही यात उतरेल, यासाठी प्रयत्न व धोरण आखण्याची गरज आहे. त्यामुळे अवजारे निर्मितीचा दर्जा वाढू शकेल.

७) प्रशिक्षण कार्यक्रम

चांगल्या कृषी औजारांच्या उपलब्धतेबरोबरच त्यांच्या योग्य वापरासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या कौशल्य वृद्धी आणि प्रशिक्षणाच्या सुविधा वाढवाव्या लागतील. शेतकरी, भाडेपट्टीवर यंत्रसामुग्रीचा व्यवसाय करणारे लोक, महिला, विद्यार्थी यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.

-----------------

डॉ. तुळशीदास बास्टेवाड, ९४२३३४२९४१

(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ.. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com