द्राक्ष बागेतील स्ट्रोमॅशिअम बारबॅटम खोडकिडीचे व्यवस्थापन

द्राक्ष पिकामध्ये पूर्वी दुय्यम स्वरूपाची असलेली स्ट्रोमॅशिअम बारबॅटम ही खोडकीड आता प्रमुख किडींपैकी एक झाली आहे. सुरुवातीस केवळ जुन्या बागांमध्ये ही कीड आढळत असल्याने द्राक्ष बागायतदार या किडीचा जास्त विचार करत नसत. मात्र या किडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.
Grape
Grape Agrowon
Published on
Updated on

डॉ. दीपेंद्र सिंह यादव, गोकूळ शंखपाळ

स्ट्रोमॅशिअम बारबॅटम ही जंगली खोडकीड असून वाळलेल्या लाकडांमध्ये, पॅकिंग सामग्री, फर्निचर, प्लायवूड व घरबांधणीतील लाकडांमध्ये दिसत असे. विशेषतः मृत किंवा वाळलेल्या लाकडावर ही कीड जास्त प्रादुर्भाव करते. ६ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या द्राक्ष बागेमध्ये तिचे प्रमाण जास्त आढळून येते. त्यातही पाण्याची कमतरता, जास्त तापमानामुळे तणावात असलेल्या ३ ते ४ वर्षांच्या द्राक्ष बागांमध्ये डेड वूड तयार होत असलेल्या बागेमध्ये या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसतो. हळूहळू वाळलेली खोडे, ओलांडे यांच्या वाढत्या प्रमाणानुसार या खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत जातो.

जीवनक्रम

- चार अवस्था - अंडी, अळी, कोष, भुंगा.

-अळी ही अवस्था द्राक्ष पिकासाठी हानिकारक असते.

-सध्या या किडीची कोषावस्था किंवा प्रौढ भुंगेरे वेली आत असतात. साधारणतः मॉन्सूनपूर्व पावसानंतर, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रौढ भुंगेरे खोडातून छेद करून बाहेर पडतात. नियंत्रणासाठी भुंगेरे ही अवस्था महत्त्वाची आहे.

-मादी मुख्यतः सैल सालीच्या आत खोडावर व ओलांड्यावर अंडी घालते.

- अंड्यातून बाहेर आलेली अळी खोड पोखरत बोगदा तयार करते. भुस्सा किंवा भुकटी बाहेर न टाकता बोगद्यातच ठासून भरत असल्याने या किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही. पोखरलेले खोड ठिसूळ होऊन लवकर मोडते.

- साधारणपणे या किडीच्या २ ते ३ वर्षांच्या सलग प्रादुर्भावामुळे द्राक्षबागेची उत्पादनक्षमता ५० टक्क्यांपेक्षा अधिक घटते.

उपाययोजना

या खोडकिडीच्या अळी व्यवस्थापनासाठी कोणतेही आंतरप्रवाही कीटकनाशक काम करत नाही. तर स्पर्शजन्य कीटकनाशक खोडातील अळीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगेरे ही अवस्था फार महत्त्वाची असते. याच अवस्थेत बागेत अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करणे फार महत्त्वाचे आहे. या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (वर्षातून फक्त १५ दिवस) अधिक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.

-एप्रिल छाटणीनंतर मॉन्सूनपूर्व कालावधीत (मे महिन्याच्या अखेरीस) द्राक्षवेलीवरची सैल झालेली साल काढून घ्यावी. यामुळे या खोडकिडीला लपण्यासाठी व अंडी देण्यासाठी जागा मिळत नाही. फवारणीवेळी खोड व ओलांडे व्यवस्थित धुतले जातील.

-जून महिन्याच्या सुरवातीपासूनच द्राक्षबागेबाहेर प्रति एकर १ प्रकाश सापळा लावावा. त्याकडे प्रौढ भुंगेरे आकर्षित होतात. ते कीटकनाशक मिश्रित पाण्यात नष्ट केल्यास पुढील उत्पत्ती कमी होते.

-सापळ्यात हे भुंगेरे सापडू लागल्यानंतर फवारणीचे नियोजन करावे. १ ते २० जून या कालावधीत निंबोळी अर्क ५ % किंवा कडुनिंब पानांचा अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर या प्रमाणे ३ ते ४ दिवसांच्या अंतराने ५-६ वेळा मुख्य खोड आणि ओलांड्यावर फवारण्या कराव्यात.

कडुनिंबाच्या पानांचा अर्क बनविण्यासाठी ः कडुनिंबाची ५ किलो ताज्या पानांची पेस्ट बनवून ६ लिटर पाण्यात भिजत घालावी. सकाळी मिश्रण उकळवून, गाळून घ्यावे. हे मिश्रण ६० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

-जुन्या झालेल्या द्राक्ष बागा किंवा स्ट्रोमॅशिअम खोडकिडीने प्रादुर्भावित द्राक्षबागा तोडताना तोडलेली लाकडे बागेपासून दूर ठेवावीत. हे शक्य नसल्यास तोडलेली लाकडे शेडनेटने झाकून ठेवावीत. त्यामुळे त्या लाकडांमधील प्रौढ भुंगेरे बाहेर येऊन आसपासच्या द्राक्ष बागेत अंडी घालणार नाहीत.

-द्राक्ष बागेच्या बाजूस खोडकिडीने प्रादुर्भावित द्राक्ष बाग असल्यास

मे अखेरपर्यंत आपल्या बागेभोवती शेड नेटचे किमान १२ फूट उंचीचे अडथळे उभे करावेत. शेडनेटचा खालील भाग मातीखाली गाडलेला असावा.

-बागेतील खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटलेल्या किंवा मृत झालेल्या वेली पुनरुज्जीवित कराव्यात. त्यासाठी खुंटातून नवीन फुटणाऱ्या काडीवर कलम करून नवीन वेली तयार करून घ्याव्यात. यामुळे सरासरी उत्पादनातील घट टाळता येईल.

- फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.५ मिलि किंवा

फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६२५ ग्रॅम किंवा

इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.३ मिलि.

याप्रमाणे ४ ते ५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून ३ ते ४ वेळा खोड आणि ओलांडे चांगले धुऊन घ्यावे.

टीप : निर्यातीसाठी घेतल्या जाणाऱ्या उत्पादनासाठी अवशेष निरीक्षण कार्यक्रमाच्या ‘परिशिष्ट पाच’ चे पालन करणे अनिवार्य आहे.

स्ट्रोमॅशिअम बारबॅटमचे संपूर्ण जीवनचक्र व नियंत्रण करण्याविषयीची अधिक माहिती NRC Grapes च्या यू-ट्यूब चॅनेल वर ‘अंगूर के स्ट्रोमॅशिअम बार्बेटम नामक तना छेदक का प्रबंधन’ हा व्हिडिओ पाहावा.

डॉ. दीपेंद्र सिंह यादव, ९२७२१२२८५८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com