Onion Harvesting : कांदा काढण्यासाठी यांत्रिक पद्धती

Agricultural Machinery : अंतिम उत्पादनामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे ताज्या भाज्यांची काढणी, हाताळणी आणि साठवणूक या तिन्ही बाबी शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरतात. या सर्व प्रक्रियेसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे खर्चात वाढ होते.
Agricultural Equipment
Agricultural EquipmentAgrowon
Published on
Updated on

Farming Technology : भारतात सर्वांत जास्त वापर असणाऱ्या भाज्यांमध्ये कांद्याचा समावेश होतो. तो बहुतांश प्रत्येक घरासोबतच हॉटेल व्यवसायात वापरला जातो. देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य कांदा उत्पादनात अग्रेसर असला तरी कांदा लागवड आणि काढणी या बाबी मजुरांच्या साह्याने केल्या जातात. परिणामी उत्पादन खर्चात मोठी वाढ होते.

कांद्याची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ मध्य पूर्व देशांत असून, भारतातून या देशात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मध्य पूर्वेतील बाजारपेठेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त कांदा खाण्यासाठी वापरला जातो. चीन, अमेरिका, टर्की, इजिप्त या देशात सर्वाधिक कांदा उत्पादन होते. या देशांमध्ये शेतीकामासाठी मजुरांची कमतरता असल्यामुळे प्रामुख्याने यांत्रिकीकरणातून काढणी केली जाते. यांत्रिकीकरणासाठी कांदा वाण निवड, रोपवाटिका, शेतबांधणी, पुनर्लागवड, तण-कीड-रोग नियंत्रण, सिंचन वेळापत्रक, परिपक्वतेच्या वेळी कांदे कडक करण्यासाठी संतुलित पोषक तत्त्वांचा वापर अशा बाबींचे सुरुवातीपासूनच योग्य व्यवस्थापन करावे लागते.

पारंपरिक कांदा काढणीतील कामे

कांद्याची पात पडल्यानंतर किंवा माना मोडण्यास सुरुवात झाल्यावर कांदा काढणीस तयार झाल्याचे समजतात.

पारंपरिक पद्धतीमध्ये हाताने खोदून किंवा उपटून शक्यतो त्यांच्या पातीसह कांदे काढले जातात. त्यानंतर २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात सुकविण्यासाठी शेतातच सोडले जातात. पूर्ण परिपक्व कांदे खोदण्यासाठी मजुरांना दीर्घकाळ वाकून काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या पाठीवर ताण येतो. या सर्व कामांसाठी हेक्टरी अंदाजे १८५ मनुष्य-तासांची आवश्यकता असते. एकूण उत्पादन खर्चाच्या २१.४ टक्के रक्कम केवळ परिपक्व कांदा काढणीसाठी लागते.

शेतातील पातसुकवणीनंतर, पात कापणी ही महत्त्वपूर्ण पायरी येते. विळीच्या साह्याने महिला कांद्यावर २० ते ३० मिमी लांबीपर्यंत पात ठेवून उर्वरित पात छाटतात. हे कामही बसून वाकून करावे लागते. त्यामुळे मजुरांची कार्यक्षमता कमी राहते. यासाठी प्रति मेट्रिक टन कांद्यासाठी सुमारे १२.५ मनुष्य-तास लागतात. एकूण श्रम कालावधीच्या अंदाजे ४० टक्के इतके आहे.

Agricultural Equipment
Agriculture Technology : शेती यांत्रिकीकरणात कौशल्याला विशेष महत्त्व

कांदा काढणी यंत्र

सामान्यतः भारतीय शेतांमध्ये असलेल्या गोष्टी विचारात घेऊन मजुरांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हाताने चालवविण्यायोग्य कांदा कापणी यंत्र विकसित केले आहे. त्यात दोन गोलाकार फिरणाऱ्या चक्रिय संरचना आहे. कांद्याची पात पकडण्यासाठी एखाद्या पंजाप्रमाणे ती कार्यान्वित होते. आकाराने लहान असलेली ही यंत्रणेची किंमत साधारणतः ६५० ते ७०० रुपये इतकी आहे.

यांत्रिक कांदा काढणी

कांदा काढणीच्या प्रक्रियेत सामान्यतः पात कापणी, कांदा उकरणे, माती झाडणे, ओळीत टाकणे किंवा ट्रॉलीत भरणे, कांदा चाळीत साठवणूक करणे अथवा प्रतवारी करून जाळीदार पोत्यात भरून बाजारात पाठविणे या कामांचा समावेश होतो. त्यातील कांदे खोदणे, पात कापणे आणि कांदे ओळीत टाकणे ही कामे यांत्रिक काढणीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ठ असतात. यामुळे कामाची उत्पादकता हाताने कांदा काढणीच्या पद्धतींपेक्षा अंदाजे ५ ते ६ पट अधिक मिळण्यास मदत होते.

काढणी यंत्रामध्ये सामान्यत: खोदण्याचे पाते, एक गेज व्हील आणि रॉड-प्रकारचे कंपन करणारे कन्व्हेयर असतात. हे घटक एकसमान खोलीवर कांदे खोदणे, काडीकचरा व माती विभक्त करताना कांदे यंत्राच्या मागील बाजूस पोहोचविण्याचा उद्देश पूर्ण करतात. काही यंत्रणांमध्ये, कांद्यावरील माती काढण्यासाठी कन्व्हेयर कम हलविणारी यंत्रणा वापरली जाते. याच यंत्राद्वारे बटाटा किंवा मूळवर्गीय पिकांची काढणी करणेही शक्य होते.

फक्त कांद्याचे बायोमेट्रिक गुणधर्म बटाट्यांपेक्षा वेगळे असल्याने यांत्रिक काढणीदरम्यान कांद्याचे नुकसान अधिक होण्याचा धोका असतो. कांदे खोदण्याआधी किंवा नंतर पाने (पात) काढता येते. जेव्हा खोदल्यानंतर पात कापणीसाठी सामान्यतः स्थिर कापणी यंत्रांचा वापर केला जातो. काही खोदणाऱ्या यंत्रांमध्ये कापणीच्या वेळीच पात कापणी करण्याची यंत्रणा अंतर्भूत असते. मात्र, शेताच्या चढ-उतारानुसार कांद्याच्या खाली वर उंचीमुळे पात कापणीच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय परिणाम होताना दिसतो.

ट्रॅक्टरचलित कांदा काढणी यंत्राचा विकास करताना कांदा खोदण्यासाठी उलट्या ‘व्ही’ आकाराच्या ब्लेडचा वापर अधिक योग्य मानला जातो. कारण त्यासाठी सर्वात कमी ताकद लागते.

१.२ मीटर लांबीचा कन्व्हेयर १५ अंशांचा उतार ठेवून वापरल्यास कांदा खोदण्याच्या खर्चात ४४ टक्क्यांपर्यंत बचत होते. अशा प्रकारे काढणी केलेले कांदे थेट बाजारात पाठवणे शक्य होते. त्याच प्रमाणे कांदे चाळीत किंवा व्यावसायिकरीत्या बनवलेल्या शीतगृहामध्ये साठविण्यासाठी पाठवता येतात.

Agricultural Equipment
Agriculture Technology : फळकाढणीसाठी आधुनिक यंत्रे

प्रतवारी, साठवण

काढलेले कांदे पहिल्यांदा ट्रेलरमध्ये पोचवले जाते. तिथून पुढे प्रतवारीच्या किंवा पॅकिंगच्या लाइनवर न्यायचे असतात. यासाठी असलेले ट्रेलर मजबूत आवश्यक असतात. त्यातून लाइनवर कांदे शक्यतो एका थरामध्ये फिरत येणे आवश्यक असते. पहिली प्रतवारी ही यंत्रत्राद्वारेच आकारानुसार केली जाते. पुढील प्रतवारीमध्ये कांद्याची गुणवत्ता महत्त्वाची असते. ती सामान्यतः माणसांद्वारे केली जाते. या टप्प्यवरही आधुनिक यंत्रांचा समावेश करणे शक्य आहे. त्यासाठी संशोधन व विकास जगभरामध्ये सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य गुणवत्तेचा कांदा पाठवणे शक्य होते. कांद्याची दीर्घकालीन साठवण करण्यासाठी योग्य प्रकारे आरेखित चाळी वापराव्यात. अल्प मुदतीच्या (काही आठवड्यांपर्यंत) साठवणीसाठी कांदा पिशव्यामध्ये भरून ठेवता येतो.

कांद्यासह सर्व प्रकारच्या भाज्या हाताळण्यासाठी ग्रेडिंग (सेमी मोबाइल किंवा स्थिर), बॅगिंग आणि टेलिस्कोपिक लोडर बाजारात उपलब्ध आहेत.

अल्पभूधारक शेतकरी आणि मर्यादीत गुंतवणूक शक्य असलेल्या ठिकाणी फार मोठ्या यंत्राचा

वापर करता येत नाही. तिथे काही कामे यंत्राद्वारे तर काही मनुष्याद्वारे करून मजूर व खर्च वाचवता येतो. साधी शेतातच पिशव्या भरण्याची उपकरणे वापरता येतात.

जपानी कांदा काढणी यंत्र

दोन ओळींमधील कांदा काढणीसाठी विकसित केलेले हे यंत्र कांदा खोदून उचलून घेते, पाने कापते आणि बाजूला एका ओळीमध्ये कांदे जमिनीवर सोडणे अशी अनेक कामे एकाच वेळी करते. त्यात पट्टा असलेला दुभाजक कांद्याची पाने जमिनीपासून वेगळे करतो. हँडलवरील लिव्हरद्वारे दुभाजकाची उंची आवश्यकतेनुसार खाली वर करता येते. कटिंगची उंची ४ ते २० सेंटिमीटरपर्यंत समायोजित करता येते.

थोडा पुढाकार आपलाही हवा...

कांदा काढणी यंत्र व तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१८ पासून शेतीसाठी आधुनिक यंत्र विकसित करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये विकसित केलेले यंत्र प्रत्यक्ष शेतात चालवून त्याची कार्यक्षमता तपासली जाते. आजवर झालेल्या पहिल्या चार स्पर्धांमध्ये स्वयंचलित कांदा काढणी यंत्र हाच विषय देण्यात आला होता. त्यात राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आरेखनाचे पारीतोषिक मिळवले आहे.

तर संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांनी या यंत्रांच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केले आहेत. अद्याप प्रायोगिक पातळीवर असलेली ही यंत्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासोबतच शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी खासगी यंत्र उत्पादक कंपन्यांनी पुढे येण्याची गरज आहे. या तरुण संशोधकांना शासन, संशोधन संस्था, खासगी कंपन्यांसोबत आपण शेतकऱ्यांनीही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. काही शेतकरी कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास अशा प्रकारे प्रत्येक पिकांमध्ये गरजेनुसार यंत्रांचे संशोधन आणि उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे वाटते.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com