
नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेतील (Central Avian Research Institute) तज्ज्ञांनी चिकनपासून प्रथिनयुक्त वडी (Chicken Cake) (सांडगे) निर्मितीचे संशोधन पूर्ण केले आहे. कुपोषणावर (Malnutrition) मात करण्यासाठी ही वडी उपयुक्त ठरणार आहे. या उत्पादनाची टिकवणक्षमता तीन ते सहा महिने असेल. उत्पादन प्रक्रियेचा खर्च कमी असल्याने हे संशोधन कुक्कुटपालकांना (Poultry Industry) उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धनाच्यादृष्टीने स्वयंरोगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
संशोधन संस्थेच्या कुक्कुटपालन व्यवस्थापन विभागातील शास्त्रज्ञ डॉ. जयदीप रोकडे यांनी सांगितले, की पूर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेकदा बाजारात पालेभाज्यांची उपलब्धता कमी असते. ही बाजू विचारात घेऊन ग्राहकांना कमी खर्चात प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी कमी अंडी देणाऱ्या कोंबड्या किंवा अंडी देणे बंद झालेल्या देशी तसेच लेअर कोंबडीच्या चिकनपासून प्रक्रिया उत्पादन विकसित करण्यात आले आहे.
प्रथिनांची उपलब्धता वाढविण्यासाठी चिकनसोबत वडी मऊ करण्यासाठी पेठा (भोपळायुक्त घटक गर), सोयाबीन, कडधान्यांची डाळ असे घटक योग्य प्रमाणात मिसळलेले आहेत. या वडीला चव येण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे. या चिकन वडीची साधारण तापमानात तीन ते सहा महिने टिकवणक्षमता असेल. सध्या दोन महिने टिकवणक्षमता या उत्पादनामध्ये दिसून आली आहे.
यापुढे सहा महिन्यांपर्यंत टिकवणक्षमता वाढविण्यासाठी उत्पादनाच्या चाचण्या सुरू आहे. यातील निरीक्षणे नोंदवून उत्पादनामध्ये आवश्यक बदल करण्यात येत आहेत. भारत सरकारकडे या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. पेटंट मंजूर झाल्यानंतरच हा फॉर्म्यूला व्यावसायिक उत्पादनासाठी उद्योजकांना दिला जाणार आहे.
येत्या काळात संस्थेतर्फे लघू उद्योग सुरू करणाऱ्यांना चिकन वडी उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत कुक्कुटपालन अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संदीप सरन हे कामकाज पाहणार आहेत. संशोधन केंद्राकडून माफक फी आकारून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींकडून उत्पादन निर्मितीच्या चाचण्या घेण्यात येईल. त्यानंतर हे उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरित केले जाणार आहे.
कुक्कुटपालकांच्या उत्पन्नात वाढ शक्य
शेतकरी अंडी देणाऱ्या देशी आणि लेयर कोंबड्यांचे संगोपन करतात. मात्र अंडी देण्याची क्षमता कमी झाल्यानंतर किंवा पूर्णतः बंद झाल्यानंतर ही कोंबडी साधारणपणे ७० ते ८० रुपयांना बाजारात विकली जाते. मात्र एक किलो कोंबडीच्या चिकनपासून विविध घटकांच्यासह सुमारे दीड किलो वडी बनवता येते. या वडीची बाजारात २५० रुपये किलो या दराने विक्री करता येईल. चिकन वडी तयार करण्यासाठी पोल्ट्री उत्पादकांना ९० रुपयांपर्यंत खर्च येईल, असे डॉ.जयदीप रोकडे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.