Akola News : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून गहू, हरभऱ्याच्या लागवडीला प्रारंभ झाला. यंदा जमिनीतील ओल कमी असल्याने पेरणी संथ गतीने सुरू आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या भागात बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची उगवणसुद्धा झाली, तर काही भागात मशागतीची कामेच होत आहेत.
जिल्ह्यात १ लाख २१ हजार १०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यात गव्हाचे सरासरी क्षेत्र १९ हजार २४१ हेक्टर, तर हरभऱ्याचे एक लाख ३१० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी आतापर्यंत हरभऱ्याची १५०० हेक्टरवर लागवड आटोपल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. सरासरी दीड टक्काच हरभरा पेरणी झाली.
दर वर्षी दसऱ्यादरम्यान सोयाबीन काढणी झालेले शेतकरी जमिनीतील ओलीचा आढावा घेत पेरणीला सुरुवात करीत असतात. यंदा परतीचा पाऊस झालेला नसल्याने रब्बी लागवडीला अडथळे तयार झालेले आहेत. काही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने हरभरा पेरणी हातात घेतली आहे.
सिंचनाची सोय असलेले शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून पिकाला वाचवत आहेत. दिवाळीनंतरच यंदा रब्बीची लागवड वेग घेईल असे चित्र आहे. गहू, हरभऱ्याची सार्वत्रिक लागवड सरासरी गाठेल किंवा नाही, याबाबत मात्र साशंकता आहे.
विजेचा अडथळा
रब्बी लागवडीसाठी वीज पुरवठ्याचा मोठा अडथळा ठरत आहे. नियमितपणे वीज मिळत नाही. दिवसा वीजपुरवठा करावा, अशी जिल्हाभरात मागणी होत आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
वन्यप्राण्यांचा त्रास सुरू
यंदाच्या रब्बीत लागवड झालेल्या हरभऱ्याच्या पिकाची उगवण होऊ लागली. नुकतेच उगवलेले अंकुर वन्य प्राण्यांकडून नष्ट केले जात आहेत. त्यामुळे पीक वाचवण्यासाठी शेतकरी सातत्याने राखणीला उभे ठाकत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.