

शेतकरी ः गिरीष तानाजी साळे
गाव ः जवळा, ता.सांगोला, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र ः १५ एकर
डाळिंब क्षेत्र ः ७ एकर
एकूण झाडे ः अडीच हजार
जवळा (ता. सांगोला) येथे माझी १५ एकर शेती आहे. त्यात सात एकरावर डाळिंब (Pomegranate) तर उर्वरित क्षेत्रावर लिंबू (Lemon), खरबूज (Musk Melon) आणि भुईमूग (Ground Nut) या पिकांची लागवड आहे. मागील सात वर्षांपासून मी डाळिंब शेती (Pomegranate Farming) करत आहे. डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त आणि आंबिया हे बहर धरतो. प्रत्येक बहाराचे योग्य नियोजन केले जाते. त्यामुळे चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते. सध्या बागेत ७ वर्षे वयाची १ हजार झाडे, ५ वर्षांची ९०० झाडे आणि दीड वर्षे वयाची ६०० झाडे आहेत. संपूर्ण बागेमध्ये आंबिया बहार धरला आहे.
या वर्षी सततचा पाऊस आणि बदलते हवामान यांचा उत्पादनावर परिणाम झाला. सध्या देखील तशीच हवामान स्थिती आहे. मी सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही पद्धतीने पीक व्यवस्थापन करतो. त्यामुळे सध्यातरी नुकसान काही प्रमाणात नियंत्रणात आहे.
आंबिया बहाराचे नियोजन ः
- डिसेंबर महिन्याच्या शेवटी आंबिया बहारासाठी बाग ताणावर सोडली.
- विश्रांतीच्या काळात बागेची स्वच्छता करून घेतली.
- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ०ः५२ः३४ आणि ०ः०ः ५० या विद्राव्य खतांची आलटून-पालटून फवारणी केली.
- त्यानंतर रोटरच्या साह्याने बागेत मशागत केली. आणि झाडांच्या खोडावर कावा पेस्ट लावली.
- फेब्रुवारीच्या अखेरीस बागेची छाटणी केली. आणि बोर्डो मिश्रणाची फवारणी केली.
- त्यानंतर शेणखत, कंपोस्ट खत प्रतिझाड १० किलो प्रमाणे दिले. तसेच १०ः२६ः२६, सिंगल सुपर फॉस्फेट यांची प्रत्येकी २०० ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ५० ग्रॅम मात्रा प्रतिझाड दिली.
- कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीप्रमाणे कीडनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहे.
- साधारण १५ एप्रिलच्या दरम्यान बागेचा ताण तोडला.
- झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाल्यानंतर १३ः०ः४५ ची फवारणी घेतली.
- खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राच्या शिफारशीप्रमाणे आळवणी केली आहे.
मागील १० दिवसांतील कामकाज ः
- कंपोस्ट खत २० किलो आणि गांडूळ खत १ किलो प्रमाणे प्रतिझाड मात्रा दिली.
- त्यानंतर ०ः५२ः३४ आणि ०ः०ः५० या खतांची फवारणी केली.
- काडी पक्व होण्यासाठी १३ः०ः४५ आणि जैविक खतांची फवारणी घेतली.
- ड्रीपद्वारे प्रतिदिन १५ मिनिटे सिंचन केले.
- सिंगल सुपर फॉस्फेट ३०० ग्रॅम, सिलिकॅान ५० ग्रॅम, १०ः२६ः२६, १५ः१५ः१५ प्रत्येकी १०० ग्रॅम प्रमाणे मात्रा दिली.
पुढील २० दिवसांतील कामे ः
- सध्या बाग कळी लागण्याच्या अवस्थेत आहे.
- फुलकिड्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी घेतली जाईल.
- हवामानाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणीचे नियोजन केले जाईल.
- ठिबकद्वारे प्रतिदिन १५ मिनिटे सिंचन केले जाईल.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतली जाईल.
------------------
संपर्क-
-गिरीष साळे, ९५११७०६९९९
(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.