Agriculture Technology : समायोजनातून वाढवा हार्वेस्टरची कार्यक्षमता

Harvesting Equipment : कंबाइन हार्वेस्टरसह विविध काढणी यंत्रांचा वापर वेगाने वाढत आहे, ही चांगली बाब असली तरी यंत्राची कार्यक्षमता वाढविण्यासाठी यंत्रांचे चालक, मालक आणि ते भाडेतत्त्वावर घेणारे शेतकरी यांच्या प्रशिक्षणांची गरज आहे.
Combine Harvester
Combine HarvesterAgrowon
Published on
Updated on

Agricultural Harvester :

पिकांची काढणी करण्यासाठी कंबाइन हार्वेस्टरचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामागे मानवी श्रम कमी करण्यासोबतच कामांचा वेग वाढवणे. काढणीपश्चात नुकसान कमी करणे आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे अशी अनेक कारणे दिसून येतात. एकाच यंत्राद्वारे पिकाची काढणी, मळणी अशी कामे होतात.

पिकांच्या अवशेषांचा, काडांचा भुस्साही त्याच वेळी करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी पसरविला जातो. आज भारतामध्ये सुमारे लाखभर कंबाईन हार्वेस्टर यशस्वीपणे सुरू आहेत. साधारणपणे १.२ ते २.२ मीटर रुंदीचे कापणी करणारे कंबाईन हार्वेस्टर ५० ते १२० हॉर्सपॉवर इंजिनच्या साह्याने चालतात.

विविध सरकारांमार्फत त्यासाठी अनुदानही उपलब्ध आहे. अर्थात, त्याचा किमत अल्पभूधारकाच्या आवाक्याबाहेर आहे. परिणामी कम्बाईन हार्वेस्टर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्याचा व्यवसायही जोमाने सुरू झाला. पण आपण एखादा कंबाइन हार्वेस्टर भाडेतत्त्वावर घेतो, त्यावेळी काही बाबी तपासणे गरजेचे असते. त्यासाठी आपले शेत व तेथील परिस्थिती अनुकूल आहे का, हेही पाहावे लागते. अन्यथा नुकसानीचे प्रमाण वाढू शकते.

‘कंबाइन हार्वेस्टर’ द्वारे मुख्यतः तृणधान्ये, गहू, तांदूळ सोया, कॉर्न इ. कापणी, मळणी, अन्य अवशेषापासून धान्य वेगळे करून ते ट्रेलरमध्ये भरणे अशी काही कामे एकत्रितपणे केली जातात. रिसीप्रोकेटिंग (मागे-पुढे हलणारे) प्रकारच्या कटर बारद्वारे पीक कापले जाते आणि फीडर हाऊसमध्ये पोचवले जाते.

Combine Harvester
Agriculture Technology : शुगरकेन हार्वेस्टरचे प्रकार

हेडरमधून कापलेले पीक (पेंढा-धान्य) कंबाईन हार्वेस्टरच्या प्रक्रिया प्रणालीमध्ये फीडर हाऊसद्वारे पोहोचवले जाते. मल्टीस्टेज थ्रेशरद्वारे मळणी करून कणसामधून धान्य काढले जाते. कणसामधून धान्य काढल्यानंतर प्रक्रिया यंत्रणेद्वारे ते पेंढ्यापासून वेगळे करावे लागते. साफसफाईच्या यंत्रणेद्वारे वेगळे केलेले धान्य साफ करण्यासाठी; धान्यातील काडीकचरा व इतर पदार्थांचे अवशेष काढून टाकण्यासाठी हवेचा वापर केला जातो.

अनलोड ऑगर आणि धान्य टाकीद्वारे स्वच्छ केलेले धान्य ट्रेलर किंवा पिशवीमध्ये रिकामे करण्यापूर्वी तात्पुरत्या साठवणूक टाकीत पोचवले जाते. धान्याव्यतिरिक्त अन्य पीक अवशेष डिस्चार्ज सिस्टिमद्वारे बाहेर शेतात सोडली जाते. कंबाइनच्या प्रकारानुसार, पेंढ्या किंवा धान्य नसलेले हिरवे खत (संपूर्ण फीड प्रकार) किंवा संपूर्ण मळणी केलेला पेंढा (हेड फीड प्रकार) म्हणून तुकडे करून पसरवता येतो.

कंबाइन हार्वेस्टरच्या कामगिरीवर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो, या बाबत काही अभ्यास करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रक्षेत्र कार्यक्षमता तपासण्यासाठी ३० ते ६५ मीटर लांबीच्या क्षेत्रामध्ये चाचण्या करण्यात आल्या.

त्यात शेताचा आकार लहान असल्यास नुसती कापणी करणाऱ्या आणि कापणीसोबतच मळणी करणाऱ्या अशा दोन्ही कंबाइन हार्वेस्टरची प्रक्षेत्र कार्यक्षमता ४० ते ६०% दरम्यान राहिल्याचे दिसले. म्हणजेच शेताची आकार, त्यातही लांबी ३० ते ६५ मीटरच्या दरम्यान असल्यास कापणी यंत्राची सरासरी प्रक्षेत्र कार्यक्षमता सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घसरते. ही मोठी यंत्रे आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहार्य आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला.

अधिक क्षमतेचे किंवा किमतीचे मशीन म्हणजे अधिक कार्यक्षम आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असा एक लोकप्रिय समज आहे, त्यालाच या अभ्यासामुळे तडा जातो. भाडेतत्त्वावर घेताना या यंत्रांची कार्यक्षमता अधिक राहण्यासाठी काय करता येईल, याची माहिती जाणून घेतली पाहिजे.

Combine Harvester
Agriculture Technology : जमिनीतील शेतीमाल काढणीची यंत्रे

या बाबींकडे प्राधान्याने लक्ष द्या...

हार्वेस्टरची बहुतांश कामे उत्तम रितीने होण्यासाठी यंत्राच्या ताकदीबरोबरच वजन, वेग, पिकाचा प्रकार, पिकाची परिपक्वता आणि मातीची व पिकातील आर्द्रता अशा अनेक बाबी महत्त्वाच्या ठरतात.

चांगल्या कामगिरीसाठी प्रत्येक शेत व त्यातील पिकाप्रमाणे हार्वेस्टरची सेटिंग्ज आणि समायोजने बदलून घ्यावीत.

हार्वेस्टरचा पुढे जाण्याचा वेग, रोटरची गती, अवतल/कॉनकेव्ह क्लिअरन्स, हवेचा आवाज, चाफर सेटिंग आणि चाळणी सेटिंग यांमध्ये करावयाचे बदल चालकाला करता आले पाहिजेत. ते त्याने चालवताना केले आहेत की नाही, याकडे शेतकऱ्याने लक्ष दिले पाहिजे.

हेड-फीड प्रकारच्या कंबाइन हार्वेस्टर चालवताना पिकाची उंचीची एकसमानता महत्त्वपूर्ण असते. ६५ सेंटीमीटरपेक्षा जास्त परंतु १५० सेंमीपेक्षा कमी उंचीचे पीक सामान्यतः हेड-फीड कंबाइन हार्वेस्टर्ससाठी आदर्श आहे. त्यामुळे धान्याचे नुकसान कमी होते. मात्र संपूर्ण फीड कंबाइन हार्वेस्टरवर पिकाच्या उंचीचा फारसा परिणाम होत नाही.

आधुनिक कंबाइन हार्वेस्टरच्या इंजिनची गती कापणीदरम्यान २५०० ते २७०० फेरे प्रति मिनिट, धान्य उतरवताना १५०० ते १७०० फेरे प्रति मिनिट आणि रस्त्यावरून प्रवास करताना २००० ते २२०० फेरे प्रति मिनिट दरम्यान ठेवणे गरजेचे आहे.

यंत्राचा पुढे जाण्याचा वेग आणि शेतामध्ये पीक कापणीचा वेग या ताळमेळ असला पाहिजे. आधुनिक कंबाइन हार्वेस्टरची गती साधारणपणे ३.५ ते ८.५ किमी प्रति तास असते. यंत्र चालक हाच चालविण्याचा आणि पिकाच्या कापणीचा वेगही नियंत्रित करत असतो. तो कामे वेगाने उरकण्याच्या नादामध्ये वेग वाढवतो, त्यावेळी ओव्हरलोडिंग, कन्व्हेयिंग बंद पडणे, इंजिन जास्त गरम होणे, यंत्रणांची अकार्यक्षमता वाढणे या बाबी होऊ शकतात.

धान्याचे नुकसान होऊ शकते. फारच कमी वेग ठेवल्यास धान्यांचे कमी (अंडर-लोडिंग) होऊन कार्यक्षमता कमी होते. यंत्राच्या वेगामध्ये मातीचा प्रकार, पिकाचा प्रकार, शेताचा आकार व त्यामुळे यंत्र वळविण्यात वाया जाणारा वेळ यांचा परिणाम होतो. म्हणून यंत्राचा वेग आणि विविध घटक यंत्रणांचे फेरे प्रति मिनिट योग्य पातळीवर असले पाहिजे.

चाळणीच्या मागील बाजूस भुश्याच्या सोबत वाहून नेले जाणारे धान्य किंवा पंख्याने कंबाइनमधून उडवलेले धान्य ‘शू लॉस’ म्हणून ओळखले जाते. रोटर बंद पडणे, न मळणी झालेले पीक आणि कमी थ्रूपुट हे रोटरच्या मंद गतीचे परिणाम आहेत.

चालकाने पिकाची उंची, घनता, टक्केवारी परिपक्वता आणि धान्य उत्पादनावर आधारित रोटरचा वेग समायोजित केला पाहिजे. अवतल आणि मळणी रोटरच्या मधील जागा अवतल अंतर (ग्राऊंड क्लिअरन्स) म्हणून ओळखली जाते. कंबाइनची ही सेटिंग मळणीची कार्यक्षमता तसेच थ्रूपुट क्षमता दोन्ही नियंत्रित करते. ते खूप अरुंद किंवा खूप रुंद नसावे.

एअर व्हॉल्यूम सेटिंग हे धान्य साफ करण्यासाठी स्वच्छता प्रणालीला पुरवल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण नियंत्रित करते. हवेचे प्रमाण खूप जास्त असेल तर ‘शू लॉस’ वाढू शकते. हवेचे प्रमाण खूपच कमी असेल, तर चाळण्या ओव्हरलोड होऊ शकतात आणि अस्वच्छ दाणे जमा होऊ शकतात.

ज्या दराने धान्य आणि इतर साहित्य खालील चाळणीतून जाऊ शकते, ते चाफर सेटिंग्जद्वारे नियंत्रित केले जाते. ते जास्त उघडे किंवा बंद नसावे. स्वच्छ धान्य ऑगरच्या साहाय्याने धान्य टाकीमध्ये टाकण्यासाठी चाळणी सेटिंगद्वारे नियंत्रित केली जाते. त्या झडपा जास्त उघड्या किंवा बंदही नसाव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com