Agricultural Drone : शेतीमध्ये ड्रोन वापरण्यासाठी सरकारकडून कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतात?

मागील चार भागांमध्ये ड्रोन व त्याच्या कृषी क्षेत्रातील वापरासंदर्भात माहिती घेतली. मात्र ड्रोन हे हवेतून उडणारे वाहन असल्यामुळे काही प्रकारच्या परवानग्या किंवा परवाने घेणे आवश्यक असते.
Agricultural Drone
Agricultural DroneAgrowon

शेतीसाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे. मात्र ड्रोन हे हवेतून उडणारे वाहन असल्यामुळे त्याच्या वापरासाठी काही परवानग्या आणि परवाने घेणे आवश्यक असते.

उदा. ड्रोनच्या प्रारूपाची नोंदणी, त्याच्या प्रत्यक्ष वापरासाठी नोंदणी, ड्रोन चालविण्याचा परवाना, ड्रोन उडवायला परवानगी असलेले हवाई क्षेत्र इ. बाबींविषयी या लेखामध्ये माहिती घेऊ.

१. टाइप प्रमाणपत्र (Type Certificate)

रस्त्यावरून धावणाऱ्या विविध प्रकारची वाहने प्रत्यक्ष वापरकर्त्याला उपलब्ध करण्यापूर्वी त्याचे प्रारूप (model) हे परिवहन विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते. या तपासणीमध्ये ते वाहन प्रारूप त्यासाठी आवश्यक ती सर्व वैशिष्ट्ये पूर्ण करते की नाही, हे पाहिले जाते.

तसेच ड्रोनचे प्रारूपही प्रत्यक्ष वापरण्यात आणण्यापूर्वी नागरी विमान महानिर्देशनालय (Directorate General of Civil Aviation- DGCA म्हणजेच डीजीसीए) द्वारे प्रमाणित असणे आवश्यक असते.

ते प्रमाणित केल्यानंतर डीजीसीए (DGCA) किंवा त्यांनी अधिकृत केलेली संस्था त्या प्रारूपासाठी प्रमाणपत्र प्रदान करते. त्यास टाइप सर्टिफिकेट’ असे संबोधतात.

Agricultural Drone
Drone Technology: फवारणीमध्ये अडथळा आला तर ड्रोन सोडवतो | ॲग्रोवन

शेतीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन हे लहान किंवा मध्यम प्रकारामध्ये येतात. त्यामुळे त्यांना टाइप सर्टिफिकेटची आवश्यकता असते.

ड्रोन खरेदी करत असलेले प्रारूप हे डीजीसीए द्वारे टाइप सर्टिफिकेट प्रदान केलेले आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. खात्री करण्यासाठी डीजीसीएचे संकेतस्थळ (https://digitalsky.dgca.gov.in ) पाहावे.

मात्र नॅनो (अतिसूक्ष्म) ड्रोनसाठी टाइप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. काही विशिष्ट कार्यासाठी (उदा. संशोधन, शिक्षण व विकास) काही विशिष्ट संस्थांना टाइप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. ड्रोनच्या विशिष्ट प्रारूपाचे टाइप सर्टिफिकेट कसे प्राप्त करायचे, याचीही माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ब) युनिट आयडेंटिफिकेशन क्रमांक (Unit Identification Number- UIN)

रस्त्यावरून चालणाऱ्या स्वयंचलित वाहनांच्या प्रारूपाचे (उदा. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर इ. ) प्रमाणिकरण झाल्यानंतर आपण ते विकत घेतेवेळी आरटीओकडे (RTO) नोंदणी केली जाते. त्यानुसार एक नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) उपलब्ध होतो.

त्यानंतरच ते वाहन विविध कार्यासाठी वापरता येते. त्याचप्रमाणे डीजीसीएने ‘टाइप प्रमाणपत्र’ दिलेल्या प्रारूपाचा ड्रोन खरेदी करावयाचा असल्यास त्या ड्रोनची डीजीसीएकडे नोंदणी करावी लागते.

त्यांच्याकडून मिळालेल्या नोंदणी क्रमांकालाच ‘युनिट आयडेंटिफिकेशन नंबर’ (UIN) असे संबोधतात. सर्वसामान्यांसाठी तो नंबर प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. मात्र विशिष्ट संस्थांना विशिष्ट प्रकारच्या कार्यासाठी हा नंबर घेणे आवश्यक नाही. या संबंधीची अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ड्रोनची नोंदणी :

कोणत्याही व्यक्तीने ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रथम ‘डीजीसीए’ च्या ‘डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म’ (Digital Sky Platform) वर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (UIN) प्राप्त केल्याशिवाय ड्रोन चालवता येणार नाही.

नोंदणीसाठी अर्ज आणि प्रक्रिया : ड्रोनसाठी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (UIN) मिळविण्यासाठी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर अर्ज ‘फॉर्म D-२’ विहित शुल्कासह करावा. त्यात आवश्यक तपशील भरत जावे.

ड्रोन निर्मात्याद्वारे डीजीसीए कडून मान्यता मिळवलेल्या प्रारूपाचा अनुक्रमांक आणि त्याच्या फ्लाइट कंट्रोल मॉड्यूल आणि रिमोट पायलट स्टेशनचे अनुक्रमांक यांच्याशी ड्रोनचा युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (UIN) जोडला जाईल. तो क्रमांक आपल्याला युनिट आयडेंटिफिकेशन क्रमांक म्हणून मिळतो.

दूरस्थ पायलट परवाना (Remote Pilot Licence)

एखादी गाडी चालविण्यासाठी ज्या प्रमाणे योग्य तो परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) घ्यावा लागतो, त्याच प्रमाणे ड्रोन चालविण्यासाठी चालकाला ड्रोन चालविण्याचा परवाना प्राप्त करणे आवश्यक असते. या परवान्याला ‘दूरस्थ पायलट परवाना’ असे संबोधतात.

ड्रोन पायलट परवाना कुणाला मिळू शकतो?

- वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त नसावे.

- मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.

- भारतीय पारपत्रधारक (म्हणजेच पासपोर्ट) असावा.

- डीजीसीएने विहित केलेले प्रशिक्षण कोणत्याही अधिकृत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेतून (RPTO) यशस्वीरीत्या पूर्ण केलेले असावे.

ड्रोन पायलट परवाना मिळविण्याची प्रक्रिया : वर नमुद केलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या व्यक्तीने ‘डीजीसीए’ ने ठरवून दिलेले प्रशिक्षण पूर्ण करावे किंवा अधिकृत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेद्वारे घेतलेली चाचणी पास करावी. त्याची नोंदणी ‘डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म’ करताच ‘ड्रोन पायलट परवाना’ मिळू शकतो.

Agricultural Drone
Drone Subsidy : केंद्र सरकारचं ड्रोन अनुदान गेलं कुठं ? | ॲग्रोवन

परवान्याची वैधता :

- डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असेल तरच वैध असेल.

- निलंबित किंवा रद्द केल्याशिवाय, दहा वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहील,

- परवान्यासंबंधीचा नियम ४६ मध्ये विहित केल्याप्रमाणे शुल्क भरून त्यात विहित कालावधीसाठी (कमाल दहा वर्षे) महासंचालकांद्वारे नूतनीकरण केले जाईल.

त्यासाठी रिमोट पायलट परवाना धारकाने डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी महासंचालकांनी सुचविल्याप्रमाणे रिफ्रेशर कोर्स करणे आवश्यक असते.

यांना रिमोट पायलट परवाना आवश्यक नाही...

-नॅनो ड्रोन (Nano drone) चालवणे; आणि

-गैर-व्यावसायिक (वैयक्तिक) कामासाठी सूक्ष्म ड्रोन (Micro Drone) चालवणे.

विद्यापीठात ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण केंद्र ः

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे डीजीसीए मान्यता प्राप्त किंवा अधिकृत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था (RPTO) आहे. हे डिजीसीए ने मान्यता प्रदान केलेले व सध्या ड्रोन फवारणीसाठी प्रशिक्षण देणारे भारतामधील पहिले कृषी विद्यापीठ आहे.

सामान्यतः ‘आरपीटीओ’ चा पाच दिवसाचा आवश्यक अधिकृत अभ्यासक्रम आहे. त्यात पहिले दोन दिवस तासिका वर्ग असतात. त्यानंतर एक दिवस सिम्युलेटर वर प्रशिक्षण दिले जाते.

त्यानंतर दोन दिवस प्रत्यक्ष ड्रोन चालवणे/हाताळणे असे प्रशिक्षण असते. मात्र विद्यापीठाच्या प्रशिक्षणामध्ये खास ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण आणखी दोन दिवस दिले जाते.

ड्रोन वापरण्यास परवानगी असलेले व नसलेले प्रक्षेत्र ः

सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन हवेतून उडविण्यासाठी काही हवाई क्षेत्र हे प्रतिबंधित असतात. त्याची माहिती करून घ्यावी.

-राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळ, सैनिकी संस्था इ. काही हवाई क्षेत्रावर ड्रोन उडविण्यास प्रतिबंध आहेत.

- सदर प्रतिबंधित क्षेत्रासोबतच सभोवतालच्या पाच कि.मी. पर्यंतच्या प्रक्षेत्रावरून (यास रेड झोन असे संबोधतात.) ड्रोन उडविण्यास परवानगी नाही.

- अशा प्रतिबंधित क्षेत्रापासून पाच ते आठ कि.मी. अंतरापर्यंत ड्रोन उडवायचा असल्यास तर त्यास हवाई वाहतूक नियामकाची (Air Traffic Controller - ATC) परवानगी आवश्यक आहे. या क्षेत्राला ‘यलोझोन अंतर्गत’ (यलो झोन इनर) असे संबोधतात.

- प्रतिबंधित क्षेत्रापासून आठ ते बारा कि.मी. प्रक्षेत्रावरून ड्रोन २०० फूट उंचीपर्यंत उडविण्यास परवानगीची आवश्यकता नाही. शेतीसाठी या पेक्षा जास्त उंचीवरून ड्रोन उडवण्याची आवश्यकता भासत नाही. याला ‘यलोझोन-बाह्य’ (Yellow Zone- Outer) असे संबोधतात.

- प्रतिबंधित क्षेत्रापासून १२ किलोमीटर नंतरच्या प्रक्षेत्रावरून चारशे फूट उंचीपर्यंत ड्रोन उडविता येतो. त्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. यास ‘ग्रीन झोन’ असे संबोधतात.

- आपले शेत/प्रक्षेत्र यापैकी कुठल्या क्षेत्राअंतर्गत आहे, आणि त्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी ‘डीजीसीए’ प्रसारीत केलेला नकाशा (India's Airspace Map) पाहावा. तो त्यांच्या संकेतस्थळाच्या डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Agricultural Drone
Agricultural Drone : किसान ड्रोन योजनेबाबत मोठी माहिती

टीप ः या लेखामध्ये शेतकरी, ड्रोन वापरकर्ते यांच्यासाठी संक्षिप्त माहिती दिलेली आहे. सविस्तर माहितीसाठी भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक (Civil Aviation) मंत्रालयाने अधिसूचित केलेले ‘ड्रोन नियम २०२१’ व त्या अनुषंगाने केलेल्या सुधारणा २०२२ (Amendments-२०२२) पाहाव्यात.

किंवा डीजीसीए च्या संकेतस्थळावर जाऊनही माहिती घेता येते. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात संपर्क साधावा.

संपर्कासाठी इमेल पत्ता- caast.csawm२०१८@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com