
गोपाल हागे
Drone for Solar Panels: सौर पॅनेल्सची स्वच्छता करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची नावीन्यपूर्ण संकल्पना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत ‘रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन’ मधील इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रा.लि. या स्टार्टअपने राबवली आहे. त्यांनी विकसित केलेला ड्रोन फक्त ३० मिनिटांत १ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प पाणी फवारणीद्वारे स्वच्छ करतो.
सौ र ऊर्जा प्रकल्पातील सोलर पॅनेलवर जास्त प्रमाणात धूळ साचल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते व पर्यायाने कमी ऊर्जा निर्मिती होते. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प चांगल्या रीतीने कार्यक्षम ठेवण्यासाठी सौर पॅनेल स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. बहुतांशी सौर पॅनेल हे इमारतीच्या छतावर उभारले जातात. अशा ठिकाणी उंचावर त्यांची नियमित साफसफाई करणे जिकिरीचे ठरते. या कामासाठी लागणारे मनुष्यबळ आणि कष्ट कमी करण्यासाठी ड्रोनचा वापर करणे शक्य आहे.
या संकल्पनेवर इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भास्कर हांडे यांनी काम सुरू केले. गेल्या दोन वर्षांपासून ड्रोन व संबंधित क्षेत्रासाठी स्टार्टअप म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत ‘रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन’ अंतर्गत कार्यरत आहे.
या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, तांत्रिक मदतीसह प्रत्यक्ष चाचणीसाठी २ लाख रुपये असे आर्थिक सहकार्य उपलब्ध करण्यात आले. यात कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डाॅ. सुरेंद्र काळबांडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तर कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक स्टार्टअप प्लॅटफॉर्म्समधूनही जागतिक दर्जाचे नवतंत्रज्ञान विकसित होऊ लागल्याचे द्योतक आहे.
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ६०० किलोवॉट क्षमतेच्या सोलर पॅनेल्सची ड्रोनद्वारे स्वच्छतेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या वेळी विभाग प्रमुख डॉ. सुचिता गुप्ता, डॉ. एम. एम. देशमुख, डॉ. प्रमोद बकाने, डॉ. अनिल कांबळे, धीरज कराळे, डॉ. मृदुलता देशमुख व अन्य प्राध्यापक उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.