Fertilizing Crop Method : पिकांना खत देण्याच्या विविध पद्धती

Agriculture Fertilizing : पिकांच्या वाढीसाठी किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयाची याच्या शिफारशी कृषी विद्यापीठांकडून प्रसारित केल्या जातात. त्याचा आधार घेऊन आवश्यक ती भर खते, वर खते पिकांना द्यावी लागतात. पारंपरिक पद्धतीने खते देण्याच्या विविध पद्धती आहेत.
Agriculture Fertilizing
Agriculture Fertilizing Agrowon

Agriculture Fertilizing Method Technique : कोणत्याही पिकांच्या उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या सारखी १६ पोषकद्रव्ये आवश्यक आहेत. माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे लक्षात येते. त्याच प्रमाणे पिकांच्या वाढीसाठी किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयाची याच्या शिफारशी कृषी विद्यापीठांकडून प्रसारित केल्या जातात. त्याचा आधार घेऊन आवश्यक ती भर खते, वर खते पिकांना द्यावी लागतात. पारंपरिक पद्धतीने खते देण्याच्या विविध पद्धती आहेत.

अ) खत फोकणे :

सर्व शेतात खते एकसमान पद्धतीने फेकत जाणे म्हणजे खते फोकणे होय. हे दाट पिके ज्या ठिकाणी माणसांना प्रत्येक रोपापर्यंत चालत जाणे शक्य नसते, अशा दाट पिकांसाठी उपयुक्त ठरते. उदा. भात, गहू इ. दाट पिकांमध्ये रोपांची मुळे सर्वत्र पसरलेली असल्यामुळे शेतामध्ये पडलेले अन्नद्रव्ये शोषली जाण्याची अधिक शक्यता असते. मात्र या पद्धतीमध्ये खते अधिक प्रमाणात वापरावी लागतात. खर्च वाढतो. याचेही दोन प्रकार पडतात.

i) पेरणी किंवा लागवडीवेळी खतांचे प्रसारण (बेसल डोस) ः काही खते ही पेरणीपूर्ण मशागतीवेळी जमिनीत टाकली जातात. किंवा तयार केलेल्या गादीवाफ्यामध्ये पेरणीपूर्ण एक समान मिसळली जातात.

ii) पिकाच्या पुढील वाढीच्या अवस्थेत वरून खते टाकणे (टॉप ड्रेसिंग) ः रोपांना वाढीसाठी आवश्यक असलेल्या नत्राचा पुरवठा करण्यासाठी ही खते दिली जातात.

या पद्धतीचे मुख्य तोटे :

i) जमिनीवर पडणारी अन्नद्रव्ये खालील मुळांपर्यंत पोहोचत नाही. अशा पद्धतीमध्ये ती घेण्यासाठी लांब अंतरावर जमिनीस समांतर वाढतात.

ii) सर्वत्र अन्नद्रव्याची उपलब्धता असल्याने पिकांशिवाय तणांच्या वाढीलाही चालना मिळते.

iii) या प्रकारामध्ये मातीच्या संपर्कात असल्याने पोषकद्रव्ये जमिनीत स्थिर होणे आणि अर्धा भाग हवेच्या संपर्कात असल्याने हवेमध्ये उडून जाणे या दोन्ही प्रकारे अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो. म्हणूनच अलीकडे ही पद्धत अशास्त्रीय मानली जाते.

ब) विशिष्ट ठिकाणी खते टाकणे (प्लेसमेंट) :

या पद्धतीमध्ये बियाणे, रोप किंवा झाड ज्या ठिकाणी आहे, त्याच्या जवळ मातीमध्ये खत दिले जाते. मुळांच्या जवळ खतांची उपलब्धता केल्यामुळे खते वाया जाण्याचे प्रमाण कमी राहते. मात्र ही पद्धत कमी प्रमाणात खत मात्रा देण्यासाठी उपयोगी ठरते. ज्या पिकांच्या मुळांचा विकास कमी झालेला असतो, त्या वेळी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांचा या प्रकारे वापर करण्याची शिफारस केली जाते.

याच्या सर्वसामान्यपणे खालील उपपद्धती असू शकतात.

i) नांगरणी करताना सरीमध्ये मिसळून खत देणे : या पद्धतीत नांगरणीच्या प्रक्रियेत खत नांगराच्या तळाशी सलग पट्ट्यामध्ये खते ठेवली जातात. पुढील फेरीत नांगर वळल्यावर प्रत्येक सरी पट्टा झाकला जातो. जेथे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली काही सेंमीपर्यंत माती कोरडी पडते आणि अगदी खाली जड चिकणमातीचा थर आहे, अशा ठिकाणी ही पद्धत योग्य मानली जाते.

ii) जमिनीत थोड्या खोलीवर खते देणे : ज्या जमिनीमध्ये नत्र खते कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, अशा क्षेत्रामध्ये उपयुक्त. उदा. भात शेतीमध्ये सततच्या पाण्यामध्ये वरील थरातील अमोनिकल नायट्रोजन वाहून कमी झालेला असतो. अशा पिकांमध्ये नत्र, स्फुरदयुक्त गोळ्या तयार मुळाच्या जवळ खोचल्या जातात. त्यामुळे खते सावकाश मुळांना मिळत राहतात. जमिनीत गाडलेली गोळी असल्यामुळे वाहून जाण्यामुळे होणारे नुकसान कमी होते.

Agriculture Fertilizing
Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

iii) प्रत्येक रोप किंवा झाडांजवळ खत देणे (रिजनल प्लेसमेंट) : वाढत्या रोपांच्या किंवा झाडांच्या मुळांना पोषक तत्त्वांचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी त्यांच्या मुळांच्या कक्षेमध्ये खते देण्याची ही पद्धत आहे. बियाणे किंवा रोपाच्या जवळ जमिनीत खते टाकणे. बियाणे किंवा झाडाच्या जवळ खते टाकण्याच्या सामान्यपणे पुढील प्रकार पडतात.

अ) पेरणी : या पद्धतीत पेरणीच्या वेळी बियाण्यांसह खत पाभरीद्वारे दिले जाते. हे खत आणि बियाणे एकाच ओळीत, परंतु वेगवेगळ्या खोलीत पडते. ही पद्धत अन्नधान्य पिकांमध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या वापरासाठी योग्य असल्याचे आढळले आहे. मात्र काही वेळा एकदम जवळ तयार होणाऱ्या जास्त विद्राव्य क्षारांमुळे बियाणे आणि कोवळी रोपे खराब होऊ शकतात.

ब) दोन ओळींमध्ये खते देणे (साइड ड्रेसिंग) : पिकाच्या दोन ओळींमध्ये किंवा झाडाभोवती खते पसरून दिली जातात. उदा. वाढीच्या टप्प्यावर मका, ऊस, कापूस इ. पिकांच्या ओळींमध्ये हाताने नायट्रोजनयुक्त खते देणे. आंबा, सफरचंद, द्राक्षे, पपई इ. झाडांभोवती खते देणे.

क) पट्टा पद्धतीने खत टाकणे :

i) छोटे ढिगारे ठेवणे ः फळबागांमध्ये रोपाच्या जवळ एका बाजूला किंवा दोन्ही बाजू पट्ट्यामध्ये खताचे छोटे ढीग ठेवले जातात. या ढिगांचा आकार पिकाच्या स्वरूपानुसार कमी जास्त असू शकतो.

ii) सलग ओळीत खत टाकणे ः एकसलग ओळीमध्ये एकत्र पेरली किंवा लावल्या जाणाऱ्या पिकामध्ये त्यांच्या ओळीच्या एका किंवा दोन्ही बाजूंनी सलग पट्ट्यामध्ये खते टाकली जातात. उदा. ऊस, बटाटा, मका, तृणधान्ये इ.

ड) खताच्या गोळ्या (पॅलेट्स) टोकण करणे ः
विशेषतः भात पिकाच्या ओळींमध्ये २.५ ते ५ सेंमी खोलीवर गोळ्यांच्या स्वरूपात नायट्रोजनयुक्त खते घालण्याची पद्धत आहे. या मध्ये १:१० या प्रमाणात खत मातीत मिसळले जाते. भातशेतीच्या चिखलात घुसवण्यासाठी सोयीस्कर आकाराच्या लहान गोळ्या तयार केल्या जातात.

...या पद्धतींचे फायदे :

- खत टाकल्यावर माती आणि खत यांचा कमीत कमी संपर्क असतो. खतांचे स्थिरीकरण कमी प्रमाणात होते.
- विनाकारण सर्वत्र खते पसरली जात नसल्याने तणांना अन्नद्रव्ये मिळत नाहीत.
- ज्या पिकाला खते द्यावयाची आहे, त्यांना अधिक उपयोग होतो.
- निचऱ्याद्वारे (लिचिंग) नायट्रोजनचे नुकसान कमी होते.
- फॉस्फेटचाही अधिक चांगला वापर केला जातो.

Agriculture Fertilizing
Organic Fertilizers : पाणी धारणा क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा

द्रवरूप खते वापरण्याच्या सामान्य पद्धती :

अ) पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक खते (स्टार्टर सोल्यूशन्स) ः या पिकांच्या मुळांच्या व सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये उदा. नत्र, स्फुरद आणि पालाश (N, P2O5, K2O) यांचे द्रावण १:२:१ आणि १:१:२ च्या प्रमाणात तयार केले जाते. अलीकडे ही द्रावणे तयार स्वरूपात उपलब्ध असतात. त्यांच्या वापर रोपवाटिकामध्ये कोवळ्या रोपांना, विशेषतः भाजीपाल्यांसाठी केला जातो.

फायदे : पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी योग्य. वेगळी मिश्रणे तयार करण्याची गरज नाही.
तोटे : फॉस्फेटचे स्थिरीकरण (फिक्सिंग) जास्त असते. स्वतः मिश्रण तयार करण्यासाठी अतिरिक्त श्रम करावे लागतात.

ब) पानांवर खताची फवारणी (फोलियर ॲप्लिकेशन) :

वाढीच्या एका टप्प्यानंतर झाडांच्या पाने त्यावर पडलेली विद्राव्य पोषकद्रव्ये शोषून घेऊ शकतात. पानांपर्यंत सरळ अन्नद्रव्ये पोहोचविण्यासाठी पानावर दिसणाऱ्या अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार खतांच्या योग्य त्या मिश्रणाची फवारणी केली जाते. सूक्ष्म अन्नद्रव्ये (उदा. लोह, तांबे, बोरॉन, जस्त आणि मँगेनीज) पुरविण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.
इशारा ः फवारणीच्या द्रावणाची तीव्रता योग्य पातळीवर असणे आवश्यक, अन्यथा पाने जळल्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते.

क) सिंचन पाण्याद्वारे खत पुरवठा (फर्टिगेशन) :

पिकाच्या वाढीसाठी पाणी दिले जातेच. या सिंचनाच्या पाण्यात विरघळणारी खते देता येतात. हे पाणी व विद्राव्य खत थेट पिकाच्या जवळ दिल्यास खते व पाणी दोन्ही वाया जात नाहीत. त्यासाठी सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती उदा. ठिबक किंवा तुषार सिंचन अधिक उपयोगी ठरतात. ही खते देण्यासाठी वेगवेगळ्या फर्टिगेशन यंत्रणा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यासाठी वाढीच्या अवस्थांनुसार विद्राव्य खतांच्या वेगवेगळ्या ग्रेडही आता उपलब्ध झालेल्या आहेत.

ड) मातीमध्ये इंजेक्शन :
जमिनीत खते आवश्यक खोलवर सोडण्यासाठी विशिष्ट दाबांने खाली सोडली जातात. अशी द्रव खते एकतर दाब किंवा गैर-दाब प्रकारची असू शकतात. गैर दाब द्रव खते ही मग केवळ पृष्ठभागावर किंवा सरीमध्ये देण्यासाठी वापरली जातात. उदा. निर्जल अमोनिया १२-१५ सें.मी.च्या खोलीवर अरुंद सरीमध्ये टाकून ताबडतोब मातीआड करावा लागतो.

इ) हवाई मार्गे खते देणे :
अतिदुर्गम भाग किंवा डोंगराळ भागावर फवारणी यंत्रे किंवा सिंचनाच्या सोयी पोहोचवणे शक्य नसते. अशा वेळी विमान, ड्रोनद्वारे खतांची फवारणी केली जाते. या पद्धती परदेशांमध्ये जंगलामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसल्यावर केल्या जातात. आपल्याकडे अद्याप या पद्धती तितक्याशा रुळलेल्या नाहीत.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com