Poultry Automation : पोल्ट्रीसाठी स्वयंचलन प्रणाली विकसित

Poultry : चांदवड येथील स्व.सौ.कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी स्वयंचलित पोल्ट्री फार्म आणि त्याचे निरीक्षण यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे.
Poultry Automation
Poultry AutomationAgrowon
Published on
Updated on

मुकुंद पिंगळे

Automation System for Poultry : चांदवड येथील स्व.सौ.कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी स्वयंचलित पोल्ट्री फार्म आणि त्याचे निरीक्षण यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. या गटामध्ये ऋतुजा देशमाने, महिमा कासलीवाल, लिशा जैन व तेजस्विनी मुथा यांचा समावेश होता. या प्रणालीमुळे पोल्ट्रीतील पक्ष्यांचे व्यवस्थापन सोपे व सुरळीत होणार आहे. वातावरणातील बदलांमध्ये अचूकतेने व्यवस्थापन करता आल्याने पक्ष्यांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.

नाशिकसह महाराष्ट्रामध्ये कृषिपूरक व्यवसायामध्ये कुक्कुटपालन क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. या उद्योगाची वार्षिक उलाढाल अडीच हजार कोटींपेक्षा अधिक आहे. या व्यवसायात अनेक संधी दिसत असल्या तरी आव्हानेही मोठी आहेत. त्या विषयी बोलताना ऋतुजा देशमाने हिने सांगितले, की माझ्या वडिलांची (माणिक देशमाने) देवगाव (ता. चांदवड) येथे ३० हजार पक्षी क्षमतेची पोल्ट्री आहे. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात वडील लग्नानिमित्त बाहेर असताना बाह्य तापमान वाढल्यामुळे पोल्ट्रीतील ७० ते ८० पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. त्यामागील कारण काय होते, तर तापमान वाढल्यानंतर शेडवर पाण्याचे फवारे मारण्याची यंत्रणा वेळीच सुरू केली गेली नाही. हाताने पाणी मारायचे तर मानवी श्रम अधिक लागतात. त्या तुलनेत स्वयंचलित यंत्रणा तयार केल्यास कष्ट कमी होतीलच, पण वेळच्या वेळी सर्व गोष्टी झाल्यामुळे होणारे नुकसान टाळणे शक्य होईल, असा विचार सुरू झाला. संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला करावयाच्या प्रकल्पासाठी मी हाच विषय घेण्याचे ठरवले.

असा केला प्रणालीचा विकास
सरांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्मार्ट पोल्ट्री फार्म ऑटोमेशन अँड मॉनिटरिंग सिस्टिम’ हा विषय निश्चित झाल्यानंतर संगणक अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी ऋतुजा देशमाने, महिमा कासलीवाल, लिशा जैन व तेजस्विनी मुथा यांचा एक गट तयार करण्यात आला.
१) सर्वेक्षण - सुरुवातीला चांदवड तालुक्यातील देवगाव परिसरात कुक्कुटपालकांच्या भेटी घेऊन त्यांच्या नेमक्या समस्या जाणून घेतल्या. २) प्रत्यक्ष कामाला सुरुवात - सुरुवातीला विद्यार्थिनींनी कोडिंग पूर्ण केले. यासह महाविद्यालयाच्या कार्यशाळेतच प्रारूप तयार केले. हे प्रारूप तयार करताना तापमान नोंदी, अमोनिया वायू प्रमाण मोजण्यासाठी व पडदे स्वयंचलित पद्धतीने सरकण्यासाठी विविध सेन्सर, मायक्रो कंट्रोलर यांचा वापर केला.
३) प्रणाली विकसन - वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाणारे वेगवेगळे कंट्रोलर दूरवरूनही कार्यान्वित करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले. त्यात वेगवेगळ्या सेन्सरकडून आलेल्या घटकांचे प्रमाण उदा. तापमान, आर्द्रता, अमोनिया वायूंचे प्रमाण इ. दर्शविले जाते. त्यानुसार निर्णय घेणे सोपे जाते.
४) प्रत्यक्ष वापरासाठीचा आर्थिक अंदाज - प्रयोगशाळेमध्ये लहान आकारामध्ये तयार केलेले प्रारूप हे प्रत्यक्षातील ३०० बाय ३० फूट आकाराच्या पोल्ट्रीमध्ये कार्यान्वित करण्यासाठी सुमारे दोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.
५) या संशोधन कार्यासाठी प्रकल्प मार्गदर्शक प्रा. डी. एस. राजनोर, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. संघवी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, उद्योजकता विकास कक्ष प्रमुख प्रा. पी. एम. बोरा, प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड, डॉ. एम. डी. कोकाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे समन्वयक दिनेश लोढा, झुंबरलाल भंडारी आणि सुनील चोपडा यांनी या विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Poultry Automation
Poultry Vaccine : कोंबड्यांचे रक्‍तनमुने घेण्यासाठी खास किट विकसित; शेतकऱ्यांचा खर्च वाचणार

संशोधनाला मिळाले ५० हजारांचे बक्षीस

छत्रपती संभाजीनगर येथील ‘मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मसिआ)’ यांनी आयोजित केलेल्या ‘इनोव्हेटिव्ह आयडिया ॲक्सिलरेटर प्रोग्रॅम’ मध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये या प्रकल्पाला ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. पहिल्या टप्प्यात २० हजार आणि नंतर ३० हजार रुपये असा विभागून निधी मिळाला. संशोधन कार्यादरम्यान प्रवास, शोधनिबंध सादरीकरण यासाठी हा निधी वापरात आला आहे.

Poultry Automation
Silk Cocoon Market : जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली (ॲप) विकसित

प्रणालीचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

- तापमानाला अनुसरून पंखा, लाइट, पडदे हे स्वयंचलित चालू किंवा बंद होतात.
- कुक्कुटखाद्य, लसीकरण नोंदीसह प्रति दिवसाचे कामकाज व नोंदीचे जतन.
- मोबाईल अॅपद्वारे प्रत्यक्ष वेळेवर पक्षिगृह तापमान, आर्द्रता, वायू पातळी यांच्या नोंदींची उपलब्धता शक्य.
-विविध लसीकरणाच्या नोटिफिकेशन प्राप्त होतात.
-खाद्य मोजणी हे मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध
-कुलिंग पॅड्स ऐवजी वॉटर फॉगरचा वापर केल्याने शेतकऱ्यांना खर्चात बचत झाली.
-पक्षीगृहातील योग्य अनुकूल तापमानामुळे पक्ष्यांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होते.

ग्रामीण भागात शेती व पूरक उद्योगात अनेक समस्या आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून कमी खर्चात प्रभावी पर्याय देणे ही काळाची गरज आहे.त्यासाठी हे संशोधन आम्ही हाती घेतले. भविष्यात त्याला व्यावसायिक स्वरूप देऊन कामकाज करण्याची इच्छा आहे.
-महिमा कासलीवाल, ग्रुप लीडर व संशोधक विद्यार्थिनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com