ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. ए. व्ही. गजाकोस, डॉ. डी. एस. कराळेModern Farming Equipment: नांगरणी ही मशागतीतील सर्वांत महत्त्वाची आणि पायाभूत प्रक्रिया मानली जाते. मागील भागात आपण खोलवर नांगरणीसाठी सबसॉयलर व चिझल नांगर यांची माहिती घेतली. या लेखामध्ये नांगरणीकरिता डिस्क नांगर, मोल्ड बोर्ड नांगर व रिव्हर्सिबल मोल्ड बोर्ड (हायड्रोलिक) नांगर यांचे प्रकार व निवड यांची माहिती घेऊ..रिव्हर्सिबल मोल्डबोर्ड (पलटी) नांगरयाला पलटी नांगर म्हणून ओळखले जाते. या नांगरासाठी ३५ ते ५० अश्वशक्ती क्षमतेचा ट्रॅक्टर आवश्यक असतो.हा नांगराचा आधुनिक प्रकार असून, त्यात दोन मोल्ड बोर्ड संच (डावे व उजवे) असतात. ते वर खाली बसवलेले असतात. यामध्ये हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे किवा हँडलद्वारे नांगराची दिशा बदलता येते. त्यामुळे माती दोन्ही बाजूंनी समांतर पद्धतीने उलथवता येते..रचनाया नांगराची रचना फ्रेम, डबल मोल्ड बोर्ड, फाळ, हायड्रॉलिक सिलिंडर किवा हँडल असते. याचा उपयोग मोठ्या शेतांमध्ये जलद व समतोल नांगरणीसाठी केला जातो. यामुळे वेळ व इंधनाची बचत होते तसेच शेत सपाट राहते.रिव्हर्सिबल नांगर दोन्ही दिशांनी उलथवत असल्याने ट्रॅक्टरच्या अनेक फेऱ्या वाचतात. त्यामुळे साध्या एमबी नांगरापेक्षा रिव्हर्सिबल नांगर अधिक कार्यक्षम, वेळ व इंधन बचत करणारा मानला जातो. मोठ्या क्षेत्रासाठी हा नांगर उपयुक्त आहे..नांगराची निवडनांगराचा मुख्य भाग म्हणजे त्याचा मोल्डबोर्ड (माती उलथवून टाकणारा भाग) होय. मातीच्या प्रकारानुसार आणि आपल्याला जमिनीची मशागत नेमकी कशी करायची आहे, त्यानुसार खालील पैकी योग्य त्या मोल्डबोर्ड प्रकारच्या नांगराची निवड करता येते..Agriculture Technology: ट्रॅक्टरचलित ऊस बड-चिप रोपण यंत्र.१. सामान्य उपयोगाचा मोल्डबोर्ड (General Purpose Mouldboard)हा सर्वांत जास्त वापरला जाणारा प्रकार आहे. याचा आकार मध्यम वक्राकार असतो, ज्यामुळे माती व्यवस्थित कापली जाते आणि चांगली उलथवली जाते.उपयोग : मध्यम आणि हलक्या जमिनीसाठी उपयुक्त.वैशिष्ट्ये : हा मातीचे ढेकूळ फोडण्याचे आणि माती खाली-वर करण्याचे काम समतोल पद्धतीने करतो..२. स्लॅटेड मोल्डबोर्ड (Slatted Mouldboard)या मोल्डबोर्डच्या पात्यामध्ये मधून खाचा किंवा जागा सोडलेली असते. यामुळे मातीचा आणि लोखंडाचा संपर्क कमी होतो.उपयोग : चिकणमाती किंवा भारी काळ्या जमिनीसाठी.वैशिष्ट्ये : चिकट माती मोल्डबोर्डला चिटकून न बसता फटींमधून सरकते. त्यामुळे नांगराचा ओढा (Draft) कमी लागतो आणि ट्रॅक्टरवर ताण येत नाही..३. डिगर मोल्डबोर्ड (Digger Type)हा मोल्डबोर्ड आकाराने आखूड पण जास्त वक्राकार असतो. हा माती वेगाने उलथवून ती विस्कळीत करतो.उपयोग : कडक जमीन आणि खोल नांगरणीसाठी.वैशिष्ट्ये : हा मातीचे मोठे ढेकूळ फोडण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. जिथे जमीन खूप कडक आहे, तिथे हा अधिक उपयोगी आहे..४. स्टबल मोल्डबोर्ड (Stubble Mouldboard)याचा वक्र भाग (Curvature) खूप जास्त असतो, त्यामुळे माती पूर्णपणे उलटली जाते.उपयोग : ज्या जमिनीत पिकांचे अवशेष (उदा. गव्हाचे काड, कपाशीची धसकटे) जास्त आहेत.वैशिष्ट्ये : हा जमिनीवरील कचरा आणि अवशेष मातीखाली दाबण्याचे काम उत्तम करतो. त्यामुळे ते लवकर कुजतात..५. सॉड किंवा ब्रेकर मोल्डबोर्ड (Sod or Breaker Type)हा लांब आणि कमी वक्राकार असतो. हा माती न फोडता एक सलग पट्टीद्वारे माती म्हणून उलथवून देतो.उपयोग : गवताळ जमीन किंवा जिथे मुळांचे जाळे जास्त आहे, अशा जमिनीसाठी वापरतात.वैशिष्ट्ये : हा गवताची पट्टी पूर्णपणे उलटी करून जमिनीखाली गाडतो. त्यामुळे गवत पुन्हा उगवणार नाही..Agriculture Scheme: नांगर, रोटाव्हेटरसह १२ अवजारांसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान; यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन.मोल्डबोर्ड नांगरजमिनीची खोल नांगरणी, तणांचे नियंत्रण आणि माती उलथून टाकण्यासाठी मोल्ड बोर्ड नांगर वापरले जाते.नांगराची रचनामुख्यतः फ्रेम, फाळ (Share), मोल्ड बोर्ड, लँडसाइड यांच्या जोडणीतून एमबी नांगर बनतो.फाळ जमिनीत घुसून माती कापते, तर मोल्ड बोर्ड ती माती उलथून बाजूला टाकतो. त्यामुळे पिकांचे अवशेष जमिनीत मिसळून मातीची सुपीकता वाढते. हा नांगर विशेषतः एकाच बाजूने माती उलथवण्याते काम करतो. त्यामुळे प्रत्येक फेरीनंतर ट्रॅक्टरला वळवावे लागते.मोल्ड बोर्ड नांगर हा साधारण १, २ फाळ किवा ३ फाळ (१ ते ३ बॉटम) मध्ये उपलब्ध आहेत. ते चालविण्यासाठी साधारणतः ३० ते ४५ अश्वशक्ती क्षमतेचा ट्रॅक्टर आवश्यक असतो. साधा मोल्ड बोर्ड नांगर लहान शेतकऱ्यांसाठी सोपा व किफायतशीर पर्याय आहे..तव्याचा नांगरविशेषतः कठीण, चिकट, काळी, दगडी किंवा मुळांनी भरलेल्या जमिनीत प्रभावी मशागतीसाठी डिस्क (तवा) नांगर वापरला जातो. या नांगरामध्ये अवतल (concave) आकाराच्या गोल डिस्क (तव्याप्रमाणे) असतात. त्या जमिनीत फिरत पुढे जाताना माती कापतात, उचलतात आणि उलथवतात. त्यामुळे जमिनीतील कडक थर फोडून, माती भुसभुशीत होते. हवा व पाण्याची झिरपण क्षमता वाढते. हा नांगर जमिनीत जास्त खोल (सुमारे १५ ते ३० सें.मी.) नांगरणी करू शकतो. परिणामी पिकांच्या मुळांची चांगली वाढ होते..हा नांगर तणे पूर्णपणे मातीखाली गाडत असल्याने तण नियंत्रण प्रभावीपणे होते.पिकांचे अवशेष, काडीकचरा व शिल्लर राहिलेली मुळे जमिनीत मिसळण्याचे काम करतो. ते जमिनीला सेंद्रिय खतासारखे उपयुक्त ठरते.ओलसर व चिकट जमिनीत जिथे पारंपरिक नांगर अडकतो, तिथे तवा नांगर सहज काम करतो. त्यामुळे कापूस, ऊस, सोयाबीन, गहू यांसारख्या पिकांसाठी जमीन तयार करताना हा नांगर अत्यंत उपयुक्त ठरतो..निवड करताना...डिस्क नांगराकरिता साधारण ३५ ते ४५ अश्वशक्ती ट्रॅक्टर आवश्यक असतो.हे नांगर ट्रॅक्टरच्या ‘३-पॉइंट लिंकेज’ने जोडले जातात. काही डिस्क नांगरामध्ये हायड्रॉलिक प्रणाली उपलब्ध आहे.आपल्या गरजेनुसार दोन किवा तीन डिस्क असलेले नांगर निवडता येतात..नांगराचे भागडिस्क नांगरांमध्ये एक मजबूत फ्रेम, ब्लेड (तवा), स्टँडर्ड (आर्म), स्क्रॅपर, टेल व्हील (चाक) आणि लिंकेज प्रणाली हे प्रमुख भाग असतात. त्यातील तवा (डिस्क ब्लेड) हे जमिनीला चिरण्याचे मुख्य कार्य करतात. तव्यावर चिकटणारी माती बाजूला काढण्यासाठी स्क्रॅपर जोडलेले असतात.चाक हे नांगरणीची खोली नियंत्रित करते. डिस्क (तवा) नांगर हा कठीण जमिनीची मशागत सुलभ करणारा, तण नियंत्रण करणारा आणि जमिनीची सुपीकता वाढविणारा प्रभावी कृषी अवजार आहे.ज्ञानेश्वर ताथोड ९६०४८१८२२० कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंजाबराव देषमुख कृषी विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.