Ambon Making Techniques : गाई, म्हशींसाठी अंबोण निर्मितीचे तंत्र

Agriculture Technique : गाई, म्हशींच्या आहारात विविध प्रकारच्या खाद्य घटकांचा समावेश करावा. आहार शुष्क तत्त्वांच्या आधारावर, तसेच जनावरांच्या वजनानुसार द्यावा.
Ambon Making Technique
Ambon Making TechniqueAgrowon
Published on
Updated on

डॉ. जी. एम. गादेगावकर, डॉ. एम. व्ही. खोडके

Animal Nutrition : अंबोणावरील खर्च कमी करण्यासाठी चांगल्या पौष्टिक चाऱ्याची लागवड किंवा उपलब्धता असणे आवश्यक असते. याचे एक उदा. म्हणजे ७ किलो लसूणघास, बरसीम किंवा चवळी घास यासारख्या व्दिदल वर्गातील हिरवा चारा १ किलो अंबोणा एवढे अन्नघटक पुरवू शकतो.१० ते १२ किलो गजराज किंवा ज्वारी, मका, बाजरी या सारखा एकदल हिरवा चारा एक किलो खुराकाएवढे अन्नघटक पुरवू शकतो.

ओलिताची सोय असल्यास १० गायींना एक हेक्टर याप्रमाणे फेरपालटीने हिरव्या चाऱ्याची पिके घेतल्यास हिरव्या चाऱ्याच्या वैरणीने अंबोणात बचत होते. तसेच ४० ते ४५ किलो एकदल आणि व्दिदल हिरव्या चाऱ्याचे मिश्रण ४ ते ५ लिटर दूध देणाऱ्या गाईंना दिल्यास तिच्या सर्व अन्न घटकांची पूर्तता होते.

अशा गाईंना अंबोण देण्याची गरज नसते, परंतु आहारात ३ ते ४ किलो सुका चारादेखील देणे आवश्यक असते. साधारण दहा लिटर दूध देणाऱ्या गाईस ७० ते ७५ किलो द्विदल हिरवा चारा, २ ते ३ किलो मका भरडा, २ ते ४ किलो सुका चारा दिल्यास तिच्या अन्नघटकांच्या गरजा पूर्ण होतात.

दुधाळ जनावरांना आहार देताना

गाई, म्हशींना आहार रुचकर असावा. आहारात विविध प्रकारच्या खाद्य घटकांचा अवलंब करावा. आहार शुष्क तत्त्वांच्या आधार तसेच जनावरांच्या वजनानुसार द्यावा. प्रति १०० किलो वजनास २.५ ते ३ किलो शुष्क भाग खाण्यास द्यावा. यापैकी २/३ भाग वैरणीच्या मार्फत म्हणजेच ओली वैरण, कोरडी वैरण इत्यादी आणि १/३ भाग अंबोणाच्या मार्फत द्यावा.

आहारातील प्रमाणात आणि घटकांत अचानक बदल करू नयेत. जनावरास चवीचे ज्ञान असते. आहारात अचानक बदल केल्यास जनावरे खाद्य खात नाहीत, परिणामी त्यांचे दूध उत्पादन घटते.

हिरवा चारा फुलोऱ्यात असताना जनावरांना खायला द्यावा म्हणजे चाऱ्यातून जास्तीत जास्त अन्नघटक मिळू शकतात. हिरवा चारा पालेदार आणि रोगविरहित असावा.

सुका चारा कुट्टी यंत्राद्वारे बारीक करून द्यावा. त्यामुळे चाऱ्याचे नुकसान होत नाही. सुका चारा जसाच्या तसा दिल्यास मुळाकडचा भाग जनावर खात नाही, परिणामी चारा वाया जातो.

आहारात नियमितपणे असावा. देण्याच्या वेळा बदलू नयेत. त्यांच्या आवश्यकतेनुसार आहार द्यावा. जनावरांना भरपूर पाणी पाजावे. गायींना साधारणपणे ५० ते ६० लिटर पाणी प्रति दिवशी पुरवावे.

दुधाळ जनावरांच्या प्रसूतीनंतरच्या काळात दुग्धोत्पादन अधिक प्रमाणात होते. परंतु जनावर या काळात कमी खाद्य खातात. त्यामुळे या काळात १०० ग्रॅम प्रति जनावर प्रति दिवस या प्रमाणात बायपास फॅट चा वापर करावा, असे केल्याने दूध उत्पादन वाढते. १५ ते २० लिटर दूध देणाऱ्या जनावरांच्या आहारात बायपास प्रथिनांचा समावेश करावा.

Ambon Making Technique
Agriculture Technology : तंत्र जाणले यश हाती आले

उत्तम अंबोणाची वैशिष्ट्ये

१८ ते २० टक्के प्रथिने असावीत. ६५ ते ७० टक्के एकूण पचनीय पदार्थ (ऊर्जा) असावेत. आर्द्रतेचे प्रमाण ११ टक्के पेक्षा जास्त असावे, अन्यथा त्यामध्ये बुरशी होण्याची दाट शक्यता असते.

दुधाळ जनावरांना अंबोण देण्याचे प्रमाण

गाय : १ ते १.५ किलो अंबोण शरीर पोषणासाठी, प्रति अडीच लिटर दूध उत्पादनाकरिता एक किलो अंबोण

म्हैस : १.५ ते २ किलो अंबोण शरीर पोषणासाठी प्रति दोन लिटर दूध उत्पादनाकरिता १ किलो अंबोण

गाभण काळातील शेवटच्या तीन महिन्यांत अंबोण देण्याचे प्रमाण

गाय : १ ते १.५ किलो अंबोण शरीर पोषणासाठी, १.५ किलो अंबोण गर्भाच्या योग्य वाढीसाठी असे एकूण २.५ ते ३ किलो अंबोण द्यावे.

म्हैस : १.५ ते २ किलो अंबोण शरीर पोषणासाठी, २ किलो अंबोण गर्भाच्या योग्य वाढीसाठी असे एकूण ३.५ ते ४ किलो अंबोण द्यावे.

Ambon Making Technique
Agriculture Technique : दुष्काळात फळबागांना आधार ‘डीफ्युजर’ तंत्राचा

दुधाळ जनावरांसाठी देण्यात येणाऱ्या अंबोणाचे नमुने (१०० किलो तत्त्वानुसार)

खाद्य घटक शेकडा प्रमाण

नमुना १ नमुना २ नमुना ३

मका भरडा १५.० ७.५ ७.५

सरकी पेंड ३०.० १५.० २०.०

गहू भुसा २३.० २३.० २३.०

तूर चुनी १५.० १५.० १५.०

उडीद चुनी १५.० १५.० १०.०

ज्वारी भरडा - ७.५ ७.५

खोबरा पेंड - १५.० १५.०

खनिज मिश्रण १.० १.० १.०

मीठ १.० १.० १.०

टीप :

घरच्या घरी उत्तम अंबोण मिश्रण तयार करण्यासाठी पशुपालकांना विविध खाद्य घटक आणि त्यांच्या बाजार भावाविषयी माहिती असावी.

पशुपालकांनी त्यांचा क्षेत्रात सहज उपलब्ध असलेल्या खाद्य घटकांचा अवलंब जास्तीत जास्त करावा, जेणेकरून कमीत कमी खर्चात अंबोण तयार करता येईल.

अंबोण देण्यापूर्वी आठ तास भिजवावे किंवा न भिजवता देखील देता येते. अंबोण दिवसातून दोन वेळा विभागून द्यावे. दुधाळ गाय, म्हशीला शक्यतो दूध काढताना अंबोण द्यावे.

डॉ. जी. एम. गादेगावकर, ९८६९१५८७६०, (पशुवैद्यकीय व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com