Agriculture Technique : दुष्काळात फळबागांना आधार ‘डीफ्युजर’ तंत्राचा

Article by Mukund Pingle : अलीकडील काळात आणि मुख्यत्वे यंदा दुष्काळाची तीव्रता प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘डीफ्युजर’, अर्थात मटका सिंचन तंत्राचा वापर फळबागांमध्ये उपयुक्त ठरत आहे.
Diffuser' Technique
Diffuser' TechniqueAgrowon

Diffuser Technique of Agriculture : अलीकडील वर्षांत सातत्याने दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे. अशावेळी विविध उपायांद्वारे पिके, फळबागा वाचविण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न आहेत. रावळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक येथील प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण अरुण पवार त्यापैकी आहेत.

त्यांची एकत्रित कुटुंबाची १०० एकर शेती आहे. पैकी ६५ एकर डाळिंब व ३० एकर ओडिशी वाणाची शेवगा लागवड आहे.सन २०११ मध्ये दुष्काळात बागा जगविण्यासाठी विकतच्या पाण्याचा खर्च लाखांच्या घरात होता.

त्यामुळे पवार यांनी कोकणात जाऊन आंबा बागेतील डीफ्युजर तंत्राचा वापर अभ्यासला. कोकणातील लाल मातीपासून बनवलेल्या मटक्यांमध्ये तापण्याचे प्रमाण कमी असते. हे मटके विकत घेऊन ४० एकरांपर्यंत आपल्या डाळिंब व शेवगा बागेत उन्हाळ्यात त्याचा वापर केला.

ठिबकच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर उन्हाळ्यातील बहर घेणे त्यामुळे त्यांना शक्य झाले. मालाची गुणवत्ता व उत्पादनवाढ शक्य झाली. सन २०१९ व २०२१ या कालावधीत पाऊसमान चांगले झाल्याने या तंत्रज्ञानाची फारशी गरज भासली नाही.

तंत्रज्ञान ठरतेय फायदेशीर

पवार म्हणाले, की यंदा भूजलपातळी खालावल्याने सिंचन क्षमता कमी झाली आहे. पाच एकरांलाच पाणी पुरेल अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत ‘डीफ्युजर’ तंत्राआधारे १० एकरांवर डाळिंबाचा आंबिया बहर घेण्याचे नियोजन आहे.

पारंपरिक ठिबक सिंचन पद्धतीने पाणी उभे जमिनीत जाते. डीफ्युजर पद्धतीने पाणी आडवे झाडांच्या मुळांच्या कक्षेपर्यंत जाते. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांचा विकास होतो. आता फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाचा चटका वाढत असून, जमीन तापू लागली आहे.

Diffuser' Technique
Agriculture Technique : अमोनिया खत उत्पादनाचे कार्बन उत्सर्जनमुक्त नवे तंत्र विकसित

पाण्याची उपलब्धता कमी व बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे झाडाच्या गरजेनुसार सिंचन व बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवणे या तंत्रामुळे शक्य होईल. त्याच्या मदतीने झाडे पाणी व खते चांगल्या प्रकारे ग्रहण करतात.

दुष्काळात बागा जगविण्यासाठी प्रति दिन प्रति झाड एक किंवा दोन लिटर पाणी पुरेसे असते. पर्णोर्त्सजनासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळात प्रति चौरस मीटर पानांच्या क्षेत्रफळाला दोन लिटर पाणी आवश्यकता असते. एवढ्या पाण्यातून २०० पीपीएम अन्नद्रव्ये डीफ्युजर तंत्राने देता येतात. एकदा खरेदी केलेले डीफ्युजर (मटका) सुमारे २० ते २५ वर्षे टिकू शकतात. त्यामुळे गरजेनुसार पुनर्वापर करता येतो.

पवार यांचाही फायदेशीर अनुभव

राज्यात २००१ ते २००४ दरम्यान भीषण दुष्काळ होता. त्यावेळी गंगासागर-पवारवाडी (ता. मालेगाव) येथील संजय पवार यांची २० एकरांत गणेश व भगवा वाणाची डाळिंब लागवड होती. बागा काढून टाकण्याची वेळ आली होती. सामूहिक शेततळ्यात पाणी मर्यादित होते.

अशावेळी जत (जि. सांगली) भागात जाऊन डीफ्युजर पद्धतीचा अवलंब करणाऱ्या डाळिंब बागायतदारांच्या त्यांनी भेटी घेतल्या.प्रति चौरस मीटर झाडाच्या आकाराला एक डीफ्युजर मटका याप्रमाणे अवलंब केला. गोडी बहर छाटणीपासून १८० दिवसांचे नियोजन व त्यानुसार पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या माध्यमातून केले.

त्याचा मोठा फायदा होऊन त्यांना चांगले उत्पादन व उत्पन्न मिळाले. पुढे २०२३ च्या दरम्यान गारपीट व तेलकट डाग रोगामुळे डाळिंब बागांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले जुन्या बागा काढाव्या लागल्या.आता इतक्या वर्षाच्या कालखंडानंतर पवार यांनी यंदाची दुष्काळी स्थिती पाहता आठ एकर नव्या डाळिंब बागांमध्ये डीफ्युजर तंत्राचा वापर करण्याचे ठरविले आहे.

ते सांगतात की प्रवाही पद्धतीने पाणी द्यायचे तर एका सिंचन आवर्तनाला १० लाख लिटर पाणी, ठिबक सिंचन पद्धतीने पाच लाख लिटर पाणी लागते. त्या तुलनेत ‘डीफ्युजर’ तंत्राआधारे पाण्याची गरज निम्मी होऊन जाते. विद्राव्य खते देता येतात. टँकरने पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना या तंत्राचा वापर फायदेशीर ठरेल असेही संजय म्हणाले.

डीफ्युजर, अर्थात मटका सिंचन दृष्टिक्षेपात

या तंत्रात तीन लिटर क्षमतेचे एक फूट आकाराचे लंब गोलाकार सच्छिद्र भांडे असते. ठिबक सिंचनातून पडणारे पाणी व खते या माध्यमातून थेट मुळांना देणे शक्य होते.

त्यासाठी झाडाच्या शेजारी मुळ्यांच्या कक्षेलगत २ बाय २ फूट आकाराचा खड्डा घेतला जातो. त्यात झाडाच्या गरजेनुसार खते भरून त्यावर मटका बसविण्यात येतो. या माध्यमातून झाडांना अन्नद्रव्य पुरवठा होतो. प्रति मटका ३० ते ५० रुपये खर्च येतो.

Diffuser' Technique
Agriculture Technique : बागायती गव्हाचे व्यवस्थापन तंत्र

तंत्राचे फायदे

ठिबकद्वारे पाणी जमिनीत न झिरपता थेट झाडाच्या मुळ्यांच्या कक्षेत आडव्या पद्धतीने पसरते.

ठिबकद्वारे मटक्यात पडणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.

तापमानात वाढ झाल्यानंतर मुळ्यांच्या कक्षेत आर्द्रता टिकून राहते.

पाण्याच्या झिरपण्यासोबत खतांचा थेट मुळांना पुरवठा होत असल्याने अपव्यय कमी.

पांढऱ्या मुळ्यांचा विकास अधिक.

पाणी व खतांची किमान ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत.

जमिनीत मुळ्यांना अपायकारक सूत्रकृमी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी.

मटक्याच्या पुनर्वापर करून सिंचन प्रणाली

मालेगाव तालुक्यातील जाटपाडे येथे २०१७ मध्ये १५ एकरांत स्वाध्याय परिवाराने वृक्ष मंदिर उभारले आहे. पेरू, चिकू, आवळा आदींची लागवड आहे. या ठिकाणी लागवडीच्या दुसऱ्याच वर्षी दुष्काळ पडला. त्यावेळी झाडे जगविण्यासाठी ‘डीफ्युजर’ तंत्राचा वापर झाला.

ठिबक सिंचनाच्या तुलनेत अवघ्या ४० टक्के पाण्यात ही झाडे जगली. त्यातून उत्पादन वाढ शक्य झाली. या तंत्रज्ञानाच्या सकारात्मक परिणामांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्याआधारे स्थानिक कृषी पद्धती व उपलब्ध मटक्यांचा पुनर्वापर करून पर्यावरण सिंचन प्रणाली विकसित करण्याचा स्वाध्याय परिवाराचा विचार आहे.

अरुण पवार ९८३४९३४६३२, संजय पवार ९१५८४१४७४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com