
राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रसार कसा आणि कोणत्या भागातून झाला? त्याची कारणे काय आहेत?
- राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील चिनावल (ता. रावेर) या गावात लम्पी स्कीन आजाराचा पहिली गाय आढळून आली. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरात राज्यातून तसेच पंजाब, राजस्थान, हरियाना इत्यादी राज्यांतून महाराष्ट्रातील पशुपालक पशूंची खरेदी करतात. तेथून बाधित पशुधन आल्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे.
लम्पी स्कीन आजार किती जिल्ह्यात पसरला आहे? किती पशुधन बाधित आहेत, किती मृत आहेत?
- लम्पी स्कीन आजार राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. या आजाराने ५ हजार ५१ पशुधन बाधित झाले आहे. तर २ हजार ८० पशुधन उपचारांती बरे झालेले आहेत. उर्वरित पशुधानावर उपचार सुरू असून, ८९ पशुधन मृत झाले आहेत.
राज्यातील पशुधन (गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी) किती आहे? यातील किती प्रमाणात बाधित आहेत?
- २० व्या पशुगणेनुसार राज्यात गोवर्गीय पशुधनाची संख्या १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४, म्हैस ५६ लाख ३ हजार ६९२, शेळ्या १ कोटी ६० लाख ४ हजार ८८३, मेंढ्या २६ लाख ८० हजार ३२९ इतके पशुधन आहे. गोवंशीय पशुधनापैकी केवळ ५ हजार ५१ म्हणजेच ०.०३६ टक्का इतके पशुधन लम्पी आजाराने बाधित झाल्याचे आढळून आलेले आहे. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. महाराष्ट्रातील केवळ ६८२ गावांतील ५ हजार ५१ इतक्या पशुधनास बाधा झाली आहे.
आजार नियंत्रणासाठी कोणती लस उपयुक्त आहे? त्यांची उपलब्धता किती आहे? राज्यातील सर्व जनावरांसाठी तात्काळ लसीकरण मोहीम सुरू आहे का?
- लम्पी स्कीन आजारवर ‘गोट पॉक्स’ प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. ही लस अत्यंत प्रभावी असून सद्यःस्थितीत राज्यात एकूण २३ लाख ८३ हजार लसमात्रा उपलब्ध आहेत. पुढील दोन दिवसांत अजून ५० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सध्या संसर्ग क्षेत्राच्या ५ किमी परिघातील पशुधनास प्रथम प्राधान्याने लसीकरण मोहीम सुरू आहे. १५ सप्टेंबर अखेर ९ लाख ८० हजार २४३ पशुधनाचे लसीकरण झालेले आहे.
‘लम्पी’ नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर कोणत्या उपाययोजना केल्या आहे?
- लम्पी स्कीन आजार डास, माश्या व गोचीड या कीटकांपासून पसरत असल्यामुळे कीटक नियंत्रण केल्यास प्रादुर्भाव प्रभावीपणे रोखता येणे शक्य आहे. पशुपालकांना गोठ्यांची स्वच्छता करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार गोठ्यात व परिसरात जंतुनाशक औषधांचा फवारणी तसेच पशुधनावरील बाह्य कीटक, जसे की गोचीड, गोमाश्या इत्यादींच्या नियंत्रणासाठी आवश्यक औषधेही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. तसेच कीटक नियंत्रणासाठी पशुपालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी ग्रामपंचायतीस मदत व मार्गदर्शन करत आहेत. बाधित किंवा संशयित पशुरुग्ण आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीने अथवा संबंधित पशुपालकाने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२३३- ०४१८, राज्यस्तरीय कॉल सेंटरशी १९६२ या टोल फ्री क्रमांवर किंवा जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाला तात्काळ माहिती द्यावी. त्यानुसार स्थानिक पशुवैद्यकीय यंत्रणेमार्फत पुढील कार्यवाही करणे शक्य होईल.
लम्पी स्कीन आजारावर स्वतंत्र लस आली आहे का?
- लम्पी स्कीन आजारावर गोट पॉक्स ही लस परिणामकारक असल्याने त्याचा वापर प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्था आणि हरियानाच्या हिस्सार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन संस्थेकडून लम्पी स्कीन आजारावर लस विकसित करण्यात आली असून, त्याच्या चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत. त्याचे व्यावसायिक उत्पादन नजीकच्या काळात सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र सद्यःस्थितीत गोट पॉक्स ही परिणामकारक लस उपलब्ध असल्याने तिचा वापर सुरू आहे.
लम्पी स्कीन आजार होऊ नये यासाठी पशुपालकांनी तत्काळ काय काळजी घेणे आवश्यक आहे?
- हा केवळ गोवंशातील पशुंना होणारा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे. याचा फैलाव गोचीड, गोमाश्या, डासांमार्फत होत असल्यामुळे जैव सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब पशुपालकांनी गरजेचे आहे. यासाठी गोठ्यात जंतुनाशक औषधांची फवारणी करणे, पशुधनांवरील बाह्यकीटकांचा प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. निरोगी पशुधन बाधित पशुधनाच्या संपर्कात येऊ नये यासाठी बाहेर चरण्यासाठी सोडू नये. पशुपालकांनी गोठ्यातील स्वच्छता राखावी.
लसीकरण वेगाने करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सध्या संसर्ग क्षेत्राच्या ५ किमी परिघातील पशुधनास प्रथम प्राधान्याने मोफत लसीकरण मोहिम स्वरूपात सुरू आहे. महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणारे, तसेच तृतीय व अंतिम वर्षाचे एकूण १ हजार २० विद्यार्थ्यांच्या सेवा तसेच पशुसंवर्धन आयुक्तालय व राज्यातील इतर कार्यालयातील ६६० अधिकाऱ्यांच्या सेवा क्षेत्रीय स्तरावर लसीकरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात रोज ४० हजार पशुधनाचे लसीकरण होत होते. आता मात्र विद्यार्थी आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे रोज १ लाख पशुधनाचे लसीकरण होत आहे. खासगी पशुवैद्यक तसेच पदविकाधारक यांनाही त्यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली आहे. लसीकरणाचा वेग दररोज २ लाखांपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न आहेत.
शेळ्या, मेंढ्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रसार होऊ शकतो का? यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे?
- या आजाराचा प्रादुर्भाव हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा आजार आहे. त्याचा प्रादुर्भाव शेळ्या, मेंढ्यांमध्ये होत नाही.
लम्पी स्कीनमुळे दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, तसेच कोंबड्यामध्येही हा रोग आला आहे अशा अफवा समाज माध्यमावर पसरल्या आहेत...
- लम्पी स्कीन आजार हा केवळ गोवंश पशुधनाला होणारा आजार आहे. पशुपासून मानवास होणारा आजार नाही. या आजारामुळे दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. त्यामुळे मानवी आरोग्यास कोणताही धोका होत नाही. तसेच हा आजार कोंबड्यांमध्ये दिसून येत नाही. समाज माध्यमांवर या प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
लम्पीच्या प्रादुर्भावामुळे दूध संकलनावर परिणाम झाला आहे का?
- लम्पीचा प्रादुर्भाव केवळ ५ हजार ५१ गोवंशीय पशुधनात दिसून आलेला आहे. हा आकडा एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत केवळ ०.०३६ टक्का झाला आहे. त्यामुळे दूध संकलनावर कोणताही परिणाम झालेला नाही. लम्पीचे कारण देऊन दुधाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आहेत.
ऊस हंगाम १५ दिवसांत सुरू होत आहे. ऊसतोडणी कामगारांसोबत बैल आदी जनावरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. त्या दृष्टीने या पशुधनाच्या लसीकरणाची काय खबरदारी घेतली आहे?
- साखर कारखान्यांसाठी ऊसतोडणी कामगारांसोबत स्थलांतरित होणाऱ्या पशुधनाचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्यात येईल. याबाबतच्या सूचना साखर कारखान्यांद्वारा संबंधित ऊसतोडणी मजुरांच्या टोळी प्रमुखांना दिल्या जातील. तर लसीकरण झालेले पशुधनच कारखाना परिसरात दाखल करून घ्यावेत, अशा सूचना कारखान्यांना दिल्या जातील.
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरू होणार का?
- लम्पी स्कीन आजाराचे नियंत्रण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. केवळ गायी, म्हशींचे बाजार बंद करण्यात आलेले आहेत. शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरू ठेवण्यास कोणताही प्रतिबंध करण्यात आलेला नाही.
विविध शहरांत मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. त्याबद्दल काय उपाययोजना केल्या जाणार आहेत?
- याबाबत संबधित नगरपालिका, महानगरपालिकांना सूचना दिलेल्या आहेत. ‘लम्पी’बाधित संसर्ग क्षेत्राच्या ५ किमी परिघात लसीकरण प्रथम प्राधान्याने सुरू आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे लसीकरण करण्यात येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.