
पुणे ः सुगी हंगामात शेतीमाल काढणीनंतर (Crop Harvesting) बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्यानंतर दराच्या होणाऱ्या घसरणीतून शेतकऱ्यांचे नुकसान (Farmer's Loss) टाळण्यासाठी ‘शेतीमाल साठवणुकीतून (Agriculture Produce Storage) समृद्धीकडे’ नेण्यासाठी राज्य वखार महामंडळाने (Warehousing Corporation) ‘वखार आपल्या दारी’ अभियान (Vakhar Aplya Dari Campaign) राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत शेतीमाल साठवणुकीतून अल्प व्याजदरात तारण कर्ज आणि साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक दीपक तावरे यांनी दिली.
तावरे म्हणाले, ‘‘राज्य वखार महामंडळाची राज्याच्या विविध भागांत शेतीमाल साठवणूक केंद्रे आहेत. या केंद्रांद्वारे शेतीमाल साठवणूक आणि तारण कर्जाची योजना महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना साठवणूक भाडेदरामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.
ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वखार महामंडळ आणि सहकार विकास महामंडळाद्वारे २० जिल्ह्यांमध्ये वखार आपल्या दारी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २१ ठिकाणी कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. बुधवार (ता. २३)पासून ते मंगळवार (ता. २९) या दरम्यान कार्यशाळा होणार आहेत.’’
कार्यशाळांमधून एका शिबिरामध्ये ६० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, महिला बचत गट यांना सामावून घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे वखार महामंडळाचे अधिकारी, बॅंक प्रतिनिधी शेतकऱ्यांना योजनांचे प्रशिक्षण देणार आहेत.
दीड हजार शेतकऱ्यांना लाभ
गेल्या वर्षीदेखील वखार आपल्या दारी अभियान राबविण्यात आले होते. याद्वारे ३० प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे दीड हजार शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेऊन, शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेतला होता, असे अध्यक्ष तावरे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.