
कडेगाव, जि. सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे (Tembhu Irrigation Scheme) रब्बी हंगामासाठीचे (Rabi Season) पहिले आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गातून आता समाधान व्यक्त होत आहे.
टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी वाळून जाण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे येथील शेतकरी वर्गातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत होती. अनेक वेळा मागणी करूनही टेंभूचे आवर्तन सुरू होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. शेतकरी वर्गातून होत असलेल्या मागणीची दखल घेत टेंभूच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू केले.
त्यासाठी टेंभू टप्पा क्रमांक १ (अ) येथील १९५० अश्वशक्तीचे तीन पंप सुरू करण्यात आले आहेत. टप्पा क्र.१ (ब) येथील २२०० अश्वशक्तीचे तीन पंप सुरू केले आहेत. शिवाजीनगर तलाव टप्पा क्र. २ येथील १७०० अश्वशक्तीचे दोन पंप सुरू करण्यात आले असून येथून पहिल्यांदा सुर्ली कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
वीस दिवसांनंतर कामथी कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे खंबाळे औंध, अपशिंगे, कोतवडे, नेर्ली, कडेगाव, कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, शाळगाव, करांडेवाडी, बोंबाळेवाडी, शामगाव येथील पाणीप्रश्न निकालात निघणार आहे.
मुख्य जोड कालव्यातूनही तालुक्यातील अन्य लाभक्षेत्रातील गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून रब्बीसह अन्य पिकांनाही लाभ होणार आहे. आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील ५५ हजार हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळणार आहे. सध्या योजनेचे पाणी तालुक्यातील शिवाजीनगर तलाव, सुर्ली, कामथी कालव्यातून सोडण्यात येत आहे.
येत्या चार दिवसांत मुख्य जोड कालव्यातून पाणी पुढे हिंगणगाव बुद्रुक तलावातून पुढे माहुली टप्पा क्र. ३ मध्ये व त्यापुढे खानापूर व तासगाव कालव्यात सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे कडेगावसह खानापूर, आटपाडी, सांगोला आदी दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनाही या आवर्तनाचा मोठा लाभ होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.