महामत्स्य अभियानाला प्रारंभ

मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन
Fisheries
Fisheries Agrowon

मुंबई : सागरी, निमखारे पाणी आणि भूजलाशयातील मत्सोत्पादन (Fish Production) वाढविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी राज्यात ७ ऑगस्टपर्यंत महामत्स्य अभियान (Mahamatsya Abhiyan) राबविण्यात येणार आहे. याबरोबरच प्रथिनेयुक्त आहार, सागरी संपत्तीबद्दल जागृती, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, ई गव्हर्नन्स आदींबाबत या अभियानातून प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या अभियानाचा प्रारंभ मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या हस्ते करण्यात आला. तारापोरवाला मत्स्यालयातील प्रदर्शनिय शोभिवंत मासे कॅमेराद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचविणे, मत्स्यबीज केंद्रांचे सक्षमीकरण व कोळंबी हॅचरी निर्माण करणे, तलावात मत्स्यबोटुकली साठवणूक करणे, मत्स्यबीज उत्पादनामध्ये राज्याला स्वयंपूर्ण करणे, निमखारे पाण्यामध्ये ऍक्वाकल्चर करून मत्स्योत्पादन वाढविणे, स्वयंरोजगार वाढविण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

यावेळी मत्सव्यवसायमंत्री अस्लम शेख म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्याचा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा कल्पकतेने उपयोग करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या साहाय्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेऊन राज्याला मत्स्योत्पादनामध्ये प्रथम क्रमांकांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.’’

मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असून मत्स्यव्यवसाय आणि त्यावर आधारित शोभीवंत माशांची बाजारपेठ राज्यात आहे. मत्स्योत्पादन वाढविण्याबरोबरच पर्यावरण संतुलनावर भर देतानाच पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मासेमारी करणाऱ्यांना बोटुकलीसाठी मदत करण्याबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास समितीमधून मदत देण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील मत्स्योत्पादन आणि मोठा समुद्रकिनारा पाहता राज्य सरकारचे मत्स्य संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही मंत्री अस्लम शेख म्हणाले.

यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com