Horticulture Scheme : फळबाग लागवड योजना ; अनुदानासह शेकऱ्यांना देणार मोफत रोपे
Agriculture Scheme : देशात शेती व्यवसायाला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारांकडून विविध कृषी योजना राबविल्या जात आहेत. बिहार सरकारही शेतीच्या विविध योजना राबवत आहे. फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी बिहार सरकारने एक योजना आणली आहे.
ज्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबाग लागवडीवरील खर्चात बचत होणार आहे. फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकार आता शेतकऱ्यांना मोफत रोपांचा पुरवठा करणार आहे. याशिवाय फळबाग लागवडीसाठी अनुदान देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलत्या हवामानामुळे आणि बाजारातील अनिश्चितेमुळे शेती व्यवसाय जिकरीचा झाला आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी विविध पिकांच्या पर्यायांकडे वळत आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे असल्याचे दिसत आहे. यामुळेच बिहार सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना आणली आहे.
देशात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यासह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग लागवड करतात. फळबाग उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च येतो.
केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या योजनांचा अनेक शेतकरी फायदा घेतात. बिहार सरकारनेही फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोफत रोपे देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाईन अर्ज करून घेता येणार योजनेचा लाभ
राज्य सरकारद्वारा राबविल्या जाणाऱ्या फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.
काय आहे योजना
फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकारने ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत.
पहिल्या वर्षी, ६० टक्के अनुदान दिले जाईल, जे ३० हजार रुपयांपर्यंत असेल. एक हेक्टरमध्ये ४०० रोपे लावण्यासाठी २० हजार रुपये खर्च येणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाईल. दुसऱ्या वर्षी १० हजार आणि तिसऱ्या वर्षीही १० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
केळी उत्पादकांसाठीही योजना
दरम्यान, केळी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.