पुणे ः अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान (Heavy Rain Crop Damage) होत असताना केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर पूर्वसूचना (Crop Damage Intimation) देण्यात अडचणी येत आहेत. दुसऱ्या बाजूला, विमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांकदेखील (Crop Insurance Toll Free number) प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी हैराण झालेले आहेत.
पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून शेत दीर्घकाळ जलमय राहते. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते. अशावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरदेखील पूर्वसूचना देता येतात. मात्र, सध्या सर्व्हरच्या समस्येमुळे सूचना देण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने सूचना देता याव्यात, यासाठी सर्व कंपन्यांमार्फत सूचना अर्जाच्या छापील प्रती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
कृषी उपसंचालक अरुण कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याची पूर्वसूचना मिळाल्याशिवाय विमा कंपनीला पुढील प्रक्रिया पार पाडता येत नाही. पूर्वसूचना मिळाली तरच वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून भरपाई निश्चित करण्यात येते.
त्यामुळे पूर्वसूचना देण्यासाठी पाच पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा जमा केला त्या बँकेच्या शाखेचा वापर पूर्वसूचना देण्यासाठी करता येतो.
कृषी विभागही लक्ष देईना
राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत विमा कंपन्यांकडून पूर्वसूचना स्वीकारल्या जात नाहीत. काही भागांमध्ये कृषी विभागाचे अधिकारीदेखील ‘हे काम आमचे नाही. विमा कंपनीकडे संपर्क साधा,’ असा सल्ला देत आहेत. मात्र, टोल फ्री क्रमांकावरदेखील प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पूर्वसूचना नेमकी कोणाकडे द्यायची, या संभ्रमात शेतकरी आहेत. कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांनी अशावेळी संभ्रमात न पडता सरळ मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे जावे. तेथे पूर्वसूचना स्वीकारल्या जात आहेत.
...या ठिकाणी देता येते पूर्वसूचना
- क्रॉप इन्शुरन्स ॲप
- विमा कंपनी टोल फ्री क्रमांक
-विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय
-कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय
- विमा ज्या बॅंकेत जमा केला त्या बॅंकेच्या शाखेत
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.