
वाशीम : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये (Irrigation Scheme) वैयक्तिक शेततळे (Farm Pond Scheme) या बाबीचा समावेश करून शेततळ्याच्या अनुदानाच्या (Farm Pond Subsidy) रक्कमेत ५० टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेततळे या घटकाची महाडीबीटी प्रणालीद्वारे तालुकानिहाय लक्षांक देऊन ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
शेततळे पूर्ण झाल्यानंतर योजनेतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर पीएफएमएस प्रणालीद्वारे जमा केले जाणार असून शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर कुठल्यातही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार केली जाईल.
ज्या जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे, काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करावी. शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाईल. शेततळ्यांकरिता किमान १४ हजार ४३३ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत अनुदान अनज्ञेय आहे.
वैयक्तिक शेततळ्यासाठी विविध आठ प्रकारचे आकारमान दर्शविण्यात आले असले तरी शेततळ्याचे आकारमान व होणारे खोदकाम यानुसार अनुदान देय राहील. वाशीम जिल्ह्यास २५५ शेततळ्यांचा लक्षांक प्राप्त झाला असून तालुकानिहाय वितरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळ्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.