
सोलापूर : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानाचा (Farmer incentive Subsidy) लाभ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील सुमारे २० हजार ९४६ शेतकऱ्यांना झाला असून, त्यांच्या खात्यावर ९१ कोटी ७ लाख रुपये जमा झाले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर हे पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त होत आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्जे भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली होती. पण त्यानंतरही अनुदान मिळाले नव्हते. पण आता नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने त्याबाबत गांभीर्य बाळगत शेतकऱ्यांना ही मदत देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जिल्हा सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडील अशा नियमित कर्जे भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याची सूचना दिली.
त्यानुसार सोलापूर जिल्हा बँकेकडील ४३ हजार ७४३ शेतकऱ्यांची यादी तयार झाली होती. पण त्यात एक, दोन व तीन वर्षे नियमित कर्ज भरणाऱ्या अशा शेतकऱ्यांची वर्गवारीची यादी तयार कऱण्यात आली. त्यातून सरकारच्या निकषात बसणाऱ्या २३ हजार ७१० शेतकऱ्यांची पहिली यादी अंतिम करण्यात आली.
त्यातून २० हजार ९४६ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनच दिवसांपूर्वी ९१ कोटी ७ लाख रुपये जमा झाले आहेत. आता राष्ट्रीयीकृत बँकेकडेही यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. तिथल्या नियमित कर्जदारांनाही लवकरच ही मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
माळशिरस, माढ्यात सर्वाधिक लाभार्थी
नियमित कर्जे भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही माढा, सांगोला, माळशिरस तालुक्यांत आहे. तर तुलनेने करमाळा, अक्कलकोट, बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांत थकबाकीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्यात येते आहे. त्यानंतरच हे पैसे जमा करण्यात येत आहे. पण ही संख्याही आता अगदी किरकोळ आहे. हे कामही लवकरच पूर्ण होईल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.