Team Agrowon
जागतिक पातळीवर २०२३ हे वर्ष सर्वांत उष्ण ठरले आहे.
या वर्षातील १२ महिन्यांचे सरासरी तापमान १.५ अंशांच्या गंभीर पातळीपर्यंत वाढल्याचे दिसून आल्याचे जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यंदा देखील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत तापमान वाढीचा कल कायम राहिला आहे.
भारतासाठी २०१६ हे वर्ष १९०१ पासून विक्रमी सर्वांत उष्ण ठरले असून, त्यानंतर २०२३ हे दुसऱ्या स्थानावर आहे.
जागतिक हवामान संस्थेने ‘स्टेट ऑफ क्लायमेट’ या वार्षिक अहवालानुसार २०२३ मध्ये जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक कालावधीतील (१८५० ते १९००) सरासरी तापमानापेक्षा जवळपास १.४५ अंशांनी अधिक होते.
हरितगृह वायू पातळी, महासागरातील उष्णता, समुद्र पातळी वाढणे, अंटार्क्टिका समुद्रातील बर्फ कमी होणे आणि हिमनदी मागे हटणे यासह सर्व हवामान निर्देशकांचे उच्चांक देखील मोडले गेले आहेत.
पॅरिस करारानुसार हवामान बदलाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी देशांनी जागतिक सरासरी तापमान वाढ पूर्व-औद्योगिक कालावधीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.