Crop Damage : अवकाळी घात

Rabi Crop Damage : दुबार पेरणीनंतर प्रतिकूल अशा हवामान परिस्थितीत भरपूर कष्ट आणि मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी रब्बी पिके जोपासली असताना आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने घात केला आहे.
Hailstorm Crop Damage
Hailstorm Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Rabi Season Hailstorm Damage : उत्तरेकडील थंड हवेच्या अभावामुळे थंडी कमी होऊन किमान तापमानात वाढ होऊ लागताच अवकाळी पाऊस आणि राज्याच्या काही भागात गारपीट होऊन शेतीचे नुकसान केले आहे. सध्या अवकाळी पावसाचा तडाखा प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्याला बसतोय. खरीप हंगामातील तुरीची काढणी-मळणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. कापूस शेवटच्या वेचणीसाठी फुटलेला आहे.

हळदीची काढणीही सर्वत्र सुरू आहे. रब्बी हंगामातील गव्हाच्या ओंब्या भरत आहेत. उशिरा अथवा दुबार पेरणीचा गहू पोटऱ्यात आहे. हरभऱ्याचे पिकही घाटे भरण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीस तयार आहे. करडई, रब्बी ज्वारी ही पिकेही काढणीस आलेली आहेत.

आंबा नुकताच मोहरत आहे. संत्रा मृग बहाराची फळे वाढीच्या अवस्थेत तर आंबिया आत्ता कुठे बहरतोय. द्राक्ष घड काही ठिकाणी पक्वतेकडे तर काही ठिकाणी काढणी सुरू आहे. विविध भाजीपाला पिके लागवड ते काढणी अशा अवस्थेत नेहमीच असतात, आत्ताही आहेत. हंगाम असा ऐन भरात असताना हंगामी पिकांसह फळे-भाजीपाला पिकांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकले आहे.

खरीप हंगाम कमी पाऊसमान आणि एकदोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने हातचा गेला. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पिके नुकतीच उगवलेली असताना झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणीनंतर प्रतिकूल अशा हवामान परिस्थितीत अत्यंत कष्ट आणि फवारणीवर बराच खर्च करून शेतकऱ्यांनी रब्बी पिके जोपासली असताना आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने घात केला आहे.

Hailstorm Crop Damage
Hailstrom Crop Damage : गारपिटीत सारे गमावले, आता नव्याने सुरुवात हाच पर्याय

मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्याला दुष्काळाचे चटके बसत आहेत. पाणीटंचाईमुळे मुळातच रब्बी पिकांचा पेरा घटला आहे. पेरलेली रब्बी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी पिके चांगली जोपासली आहेत. मुळात बी-बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके अशा सर्वच निविष्ठांचे दर प्रचंड वाढलेले आहेत.

त्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांना रब्बीत हरभरा, गहू आदी पिकांची दुबार पेरणी करावी लागली आहे. पेरणीनंतरही सातत्याने ढगाळ वातावरण आणि एकदोन वेळा झालेल्या पावसाने पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पर्यायाने फवारणीवरील खर्चातही वाढ झाली आहे. त्यातच नैसर्गिक आपत्तीने शेतीमालाचे उत्पादन घटत आहे.

Hailstorm Crop Damage
Hailstrom Crop Damage : संतप्त गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे निफाडला रास्ता रोको आंदोलन

हाती आलेल्या शेतीमालास दरही अत्यंत कमी मिळतोय. त्यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक संकटात आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आत्ताचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने होत असलेल्या नुकसानीचे तत्काळ पाहणी-पंचनामे करायला हवेत. पाहणी-पंचनाम्यात प्रशासन पातळीवर कुठलीही हयगय होणार नाही, ही काळजी देखील घ्यावी लागेल.

महत्त्वाचे म्हणजे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात त्वरित आर्थिक मदत मिळायला पाहिजेत. नैसर्गिक आपत्तीत अचानक होत्याचे नव्हते होते. हा शेतकऱ्यांवर मोठा आघात असतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत तत्काळ दिलासा द्यायचा असेल तर त्यांना विनाविलंब आर्थिक मदत ही झालीच पाहिजेत.

अलीकडच्या हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्तींनी पिकांचे नुकसान वाढलेले असताना पीक पाहणीपासून ते मदत हातात पडेपर्यंतच्या प्रक्रियेत व्यापक बदल करणे गरजेचे वाटते. ही प्रक्रिया गतिमान होऊन पूर्णपणे पारदर्शी झाली पाहिजेत.

प्रगत तंत्रज्ञानाच्या अवलंबनाने प्रक्रिया गतिमान आणि पारदर्शी करणे शक्य आहे. शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनखर्च वाढत असताना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या रकमेतही वाढ करायला हवी. असे झाले तरच नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्याही यामुळे कमी होण्यास हातभारच लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com