El Nino Impact: मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव वाढल्यास पाऊस कमी पडून त्याचा थेट परिणाम शेती, उद्योग, पिण्याचे पाणी, पशुधन आणि एकंदरीतच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो..भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर आणि शेती मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. शेती, उद्योग वा पिण्यासाठी पाण्याचा भारतातील एकमेव स्रोत हा मॉन्सून आहे. यावरून देशात मॉन्सूनचे महत्त्व आपल्या लक्षात यायला हवे.त्यातच या वर्षी कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मॉन्सूनचे देवभूमी केरळ तसेच महाराष्ट्रातील आगमनाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. शेवटी केरळमध्ये ठरावीक वेळेच्या तीन दिवस उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने दोन दिवसांपूर्वी तळ कोकणातही हजेरी लावली. .Agriculture Planning: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.मॉन्सूनच्या मुंबईतल्या आगमनानंतर उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येतो. हे खरे असले तरी मॉन्सूनचे आगमन व चार महिन्यांत पडणारा पाऊस या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यांच्या भाकितांचे निकषही स्वतंत्र आहेत.वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान, दक्षिण भारतातील चार राज्यांतील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन, दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्या वेळी बाहेर पडणारी दीर्घलहरी उष्णता ऊर्जा, मलेशिया थायलंड पश्चिम किनारपट्टीवर एक ते दीड किमी दरम्यानचे वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब आणि बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडोनेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी उंचीवरील वाहणारा वारा अशा या सहा घटकांच्या सतत निरीक्षणावरून मॉन्सूनचे आगमन आणि वाटचालीचा अंदाज बांधला जातो. .महत्त्वाचे म्हणजे यातील कुठलीच स्थिती सध्या स्थिर जाणवत नसल्याने तो नेमका कसा बरसेल याबाबतचे चित्र स्पष्ट नाही. मॉन्सूनच्या आतापर्यंतच्या वाटचालीत फारसा दम नाही, शिवाय सध्याची जी हवा आहे, ती मॉन्सूनपेक्षा अधिक वादळीच असल्याचे यातील जाणकारांचे मत आहे..Pre Monsoon Preparation: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर टंचाई उपाययोजनांचे नियोजन करा; आयुक्त कविता द्विवेदींचे निर्देश.या वर्षीच्या मॉन्सूनवर एल-निनोच्या सावटाचा अंदाज आधीच वर्तविण्यात आला होता. त्यात आता अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) संस्थेच्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’च्या ताज्या अंदाजानुसार, जून महिन्यात ‘एल-निनो’ सक्रिय होण्याची शक्यता सुमारे ८२ टक्के आहे.एल-निनोचा प्रभाव वाढल्यास पाऊस कमी पडून त्याचा थेट परिणाम शेती, पिण्याचे पाणी, पशुधन आणि एकंदरीतच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. जूनमध्ये एल-निनोच्या प्रभावाने पाऊस कमी पडला म्हणजे पेरण्या लांबणार, पेरण्या वेळेत झाल्या आणि त्यानंतर पावसाचा खंड पडला, तर पीक वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवणार आहे. .दुबार पेरणीसाठी खते, बियाणे कमी पडणार नाहीत, ही काळजी कृषी विभागाने घ्यायला हवी. पावसाच्या चार महिन्यांचा काळात मोठे खंड पडून कधीही पाऊस कमी झाला तर त्याचे प्रतिकूल परिणाम राज्यातील शेतीवर होणार हे नक्की! त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी तसेच पुढील पीक व्यवस्थापन करताना खूप सावध पावले उचलावी लागणार आहेत.येथून पुढे हवामानशास्त्र विभागाला पावसाचे अल्पकालीन अंदाज अधिक अचूकतेने द्यावे लागतील. त्या अंदाजानुसार पेरणी, पीक व्यवस्थापनाचे तंत्र शेती शास्त्रज्ञांनी द्यायला हवेत. शेतकऱ्यांनी पीक पेरणी करताना कमी कालावधीची पिके त्यातही लवकर येणाऱ्या जातींची लागवड करावी. .मूलस्थानी जल संधारणावर भर द्यायला हवा. शक्य तिथे पीक पेरणीसाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धत वापरावी. ही पद्धती कमी अथवा अधिक पावसात देखील पिके वाचविण्याचे काम करते. या वर्षी शेतीतील वाढती जोखीम पाहता पीकविम्याचा आधार देणे क्रमप्राप्त ठरते.कमी पाऊसमान काळात वर्षभर चाऱ्याचे नियोजनही गांभीर्याने घ्यायला हवे. संभाव्य पाणीटंचाई, दुष्काळ लक्षात घेता केंद्र - राज्य शासन पातळीवरही आत्तापासून सक्रिय राहून योग्य ती खबरदारी घेतली तर पाणीटंचाई, दुष्काळाच्या झळांची दाहकता कमी होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.